esakal | पुण्यातून हवाई वाहतूक सुरू राहणार; विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Air transport will continue from Pune airport

पुण्यातून हवाई वाहतूक सुरू राहणार; विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : धावपट्टीचे नूतनीकरण करायचे असल्यामुळे २६ एप्रिल ते ९ मे दरम्यान लोहगाव विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द झाला आहे. त्यामुळे सध्याच्या काळातही विमानतळावरून वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र, या निर्णयाची माहिती प्रवाशांना नसल्यामुळे सोमवारी १० विमानेच विमानतळावर आली आणि रवाना झाली. प्रवाशांची संख्याही घटल्यामुळे १० विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम होणार असल्यामुळे विमानतळ १४ दिवस बंद करण्याचा निर्णय या पूर्वी जाहीर झाला होता. त्यानुसार विमान वाहतूक कंपन्यांनी या कालावधीतील आरक्षणे घेतली नव्हती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द झाल्याची माहिती प्रशासनाने विमान वाहतूक कंपन्यांना कळविली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांना प्रवासी उपलब्ध झाले नाहीत. तसेच प्रवासी अत्यल्प असल्यामुळेही विमाने सोडण्याचे प्रमाण कमी झाले.

हेही वाचा: पुणे शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ११ एप्रिलपासून ओहोटी सुरू

हैदराबाद, दिल्ली, नागपूर, कोलकत्ता मार्गावरील विमानांच्या दहा फेऱ्या सोमवारी रद्द झाल्या. मंगळवारीही दिवसभरात दिल्ली, चेन्नई, लखनौ, हैदराबाद, बंगळुरू मार्गावरील विमानांच्या एकूण नऊ फेऱ्या पुणे विमानतळावरून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, धावपट्टीचे काम सुरू असल्यामुळे रात्री आठ ते सकाळी आठ दरम्यान विमान वाहतूक बंद राहणार आहे. या निर्णयात कोणताही बदल झालेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.

कोरोनामुळे देशातील अनेक राज्यांत लॉकडॉउन लागू असला, तरी विमान वाहतूक केंद्र सरकारने बंद केलेली नाही. राज्य सरकारनेही विमान वाहतुकीला आडकाठी केलेली नाही. त्यामुळे वीकेंड लॉकडॉउनमध्येही विमान वाहतूक सुरू आहे. मात्र, विमान प्रवास करण्यापूर्वी ‘आरटीपीसीआर’ चाचणी करणे प्रवाशांना बंधनकारक आहे.

हेही वाचा: थोडा रुसवा, थोडा फुगवा संसाराचा भन्नाट गोडवा!

पाच मार्गांवरील रेल्वेगाड्या रद्द

प्रवासी संख्या कमी असल्यामुळे आगामी पंधरा दिवस पुढील रेल्वेगाड्या रद्द केल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे. त्यात मुंबई-कोल्हापूर (२८ एप्रिल ते ११ मे), मुंबई-पुणे (२७ एप्रिल ते १० मे), पुणे-नागपूर (२८ एप्रिल ते १० मे), मुंबई-सोलापूर (२८ एप्रिल ते ११ मे) आणि नागपूर-पुणे (२७ एप्रिल ते ९ मे) या गाड्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: विनावापर ऑक्सिजन सिलिंडर गोदामात जमा करा; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

loading image
go to top