पुण्यासाठी पुढचे १५ दिवस महत्त्वाचे

पुण्यासाठी पुढचे १५ दिवस महत्त्वाचे

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. प्रशासनाने ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करावे. हॉटस्पॉटमधील बंधने पाळावीत. ग्रामीण भागातही ऑक्सिजन बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. तसेच रेमडेसिव्हिरबाबत कडक धोरण राबवा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, पुण्यात झालेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीत दिले. लॉकडाउनमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, कोरोनाची साखळी तोडणे तितकेच महत्त्वाचे असून, त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. तसेच, व्यापारी संघटनांच्या प्रमुखांसोबतही चर्चा करून त्यांनाही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यात येईल. त्याला व्यापाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. 

विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक पार पडली. यानंतर पवार म्हणाले, 'केंद्रांकडून पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध होतील, असे आश्वासन केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी दिले आहे. केंद्रीय पथकाकडून सद्यस्थितीत व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड॒ससाठी अधिक नियोजन करावे लागेल, असे निरीक्षण नोंदविले आहे. त्यानुसार प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत.' 

केंद्र सरकारकडून सहकार्य : पवार 
केंद्राने हे दिले नाही अशी आम्ही तक्रार करायची. तर, केंद्राने सगळे दिले, असे त्यांनी सांगायचे. अशी टोलवाटोलवी न करता केंद्र सरकारने व्हेंटिलेटर देण्याबाबत निर्णय घेतला आहे. जावडेकर यांनी संरक्षण विभागाकडून बेड॒ससह संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, असे पवार यांनी सांगितले. 

सरकारचे अपयश नाही 
केंद्र सरकारने इशारा देऊनही राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत गांभीर्याने घेतले नाही, हे सरकारचे अपयश आहे का? या संदर्भात पवार म्हणाले, पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यात केंद्र आणि राज्यासह सर्वांचेच योगदान आहे. मात्र, सध्याच्या लाटेत संसर्गामुळे बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत लसीकरणाचा कार्यक्रम गतीने राबविण्यात येत आहे. 

व्यापारी संघटनांसोबत रविवारी चर्चा 
व्यापारी संघटनांनी लॉकडाउनला विरोध करीत सोमवारपासून दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पवार म्हणाले, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त हे रविवारी व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. या बैठकीत वस्तुस्थिती आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यास व्यापारी आवाहनाला प्रतिसाद देतील, असा विश्वास आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com