गिरीश बापटांच्या टीकेला अजितदादांचे सडेतोड उत्तर

मिलिंद संगई
Saturday, 11 July 2020

खासदार गिरीश बापट यांनी पुण्याच्या लॉकडाउनसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय एकतर्फी असल्याची टीका केली होती. एकाही आमदार व खासदाराला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचे बापट म्हणाले होते, त्याचा अजित पवार यांनी खुलासा केला.

बारामती (पुणे) : पुण्याच्या लॉकडाउनसंदर्भात आपण घेतलेला निर्णय हा एकतर्फी नाही, तर व्यापक लोकहित व प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचा विचार करूनच घेतला आहे, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. 

पुणे लॉकडाउनवरून गिरीश बापट अजित पवारांवर बरसले

खासदार गिरीश बापट यांनी पुण्याच्या लॉकडाउनसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय एकतर्फी असल्याची टीका केली होती. एकाही आमदार व खासदाराला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचे बापट म्हणाले होते, त्याचा अजित पवार यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, लॉकडाउनचा निर्णय घेताना पुणे शहराची सध्याची परिस्थिती, कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या, लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन न करणे, तसेच प्रशासनाकडूनही ज्या सूचना आल्या होत्या, त्याचा व्यापक विचार केलेला आहे. हा निर्णय कोरोनावर मात करण्याच्या उद्देशानेच घेतला आहे. त्या मुळे त्यात एकतर्फी असायचे काही कारण नाही. 

अमोल कोल्हे सांगतात, कोरोनाच्या लढाईत...माझी ढाल, माझा मास्क...

मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव यांच्यासह सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांनाही याची कल्पना होती. फोनवरून जे लोकप्रतिनिधी उपलब्ध झाले, त्यांनाही याची कल्पना दिली होती. त्यात पुण्याच्या महापौरांनाही याची माहिती दिली होती. या संकटावर मात करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची शासनास आवश्यकता आहे. राज्य सरकार म्हणून आम्हीही सर्व बाजूंचाच विचार नेहमी करत असतो. मात्र, हे करताना व्यापक जनहिताला प्राधान्य द्यावे लागते. प्रसंगी कठोर निर्णयही घ्यावे लागतात, असे अजित पवार म्हणाले. 

एका लग्नाची मोठी गोष्ट...वऱ्हाडींसह नवरा- नवरीचंही जुळलं कोरोनाशी नातं 

केवळ भारतातच नाही, तर जगाच्या पाठीवर अनेक देशांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनसारख्या उपाययोजना अंमलात आणलेल्या आहेत. त्यामुळे त्याचाच अवलंब भारतातही अनेक राज्ये करीत आहेत. आर्थिक स्तरावर अनेकांचे नुकसान होत आहे, याची जाणीव आहे, मात्र तरीही लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
 - अजित पवार, उपमुख्यमंत्री 

 Edited by : Nilesh Shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar's reply to Girish Bapat's criticism