पुणेकरांनो, अशी आहे वाहतूक बंदी; विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी दिला प्रसाद!

Pune-Traffic-Ban
Pune-Traffic-Ban

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश असतानाही सोमवारी (ता.२३) शहरामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन पोलिस प्रशासनाने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पोलिसांनी अचानक घेतलेल्या या भुमिकेमुळे पोलिस व नागरीकांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडले. तर काही ठिकाणी पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच चोप दिला.

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या आदेशानुसार सोमवारी (ता.23) पहाटे 5 वाजल्यापासूनच जमावबंदीचे आदेश दिले होते. असे असतानाही नागरिक शहरात बेफिकीरपणे फिरत होते. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी वाहतूक बंदीचा निर्णय घेतला. पोलिस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी याबाबतचा आदेश काढला. आदेशानुसार, शहरातील कोणत्याही रस्त्यावर, गल्लीत कुठलेही वाहन आणता येणार नाही, असे डॉ. शिसवे यांनी सांगितले. ३१ मार्च रात्री बारा वाजेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. 

दरम्यान पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील चौकाचौकात बैरिकेड उभे करुन वाहनचालकांना अडविन्यास सुरुवात झाली. जंगली महाराज रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरासह औंध, बानेर, बोपोडी, खडकी, सिंहगड रस्ता, घोरपडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक यासह उपनगरमधील सर्व भागात पोलिसांनी वाहने अडवुन नागरीकांकडे विचारणा करण्यास सुरुवात केली.

अनपेक्षितपणे हा प्रकार घडत असल्यामुळे पोलिस व नागरकांमध्ये अनेक ठिकाणी बाचाबाची, किरकोळ भांडणे झाली. सिंहगड रस्ता परिसरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. तर अन्य ठिकाणी पोलिसांनी नागरीकांना, वाहनचालकांना विनाकारण फिरू नका, अशा सूचना दिल्या. महत्वाचे काम असेल तर पोलिसांना सांगा. विनाकारण शहरात फिरू नका. कोरोनाचा संसर्गाला अटकाव घालण्यासाठी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नागरिकांना त्यांची खासगी वाहने देखील रस्त्यावर आणता येणार नाहीत. अत्यावश्यक सेवेसाठी मात्र हे आदेश लागू नसतील. पोलिसांची वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच रुग्णालयात काम करून आपले कर्तव्य पार पाडणारे डॉक्टर, परिचारिका, पॅरा मेडिकल स्टाफ, यांच्यासह जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्तींसाठी हे आदेश लागू राहणार नाहीत, असेही सह पोलिस आयुक्त डॉ. शिसवे यांनी सांगितले. 

शहरात जमावबंदी सुरू असली तरी अनेक ठिकाणी वाहतूक सुरू होती. नागरिकांनी जमावबंदी पूर्णपणे मनावर न घेतल्याने पोलिसांना हे पाऊल उचलावे लागले आहे. नागरिकांना कोणतेही वाहन रस्त्यावर आणता येणार नाही. 
- डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त

यांना असेल शहरात बंदी :

- सायकल तसेच पारंपारिक व अपारंपारिक इंधनावर चालणाऱ्या मोटार सायकल (गिअरसह)
- सर्व  प्रकारची तीनचाकी वाहने, चार चाकी हलकी वाहने (कार), 
- ट्रक, टेम्पो, डंपर, खासगी बस
- सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी (अॅप आधारित ओला, उबेर व इतर)

यांना असेल वाहतुक बंदीमध्ये सूट :

- तातडीचे रुग्णवाहतुक व हॉस्पीटलमधील डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ (फक्त कामावरील)

- अत्यावश्यक सेवा (उदा. वीज, पाणी पुरवठा, दूरसंचार, अग्निशमन, बँक व एटीएम)

- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या पायाभूत विकासाशी संबंधित उद्योग  (फक्त कर्तव्यार्थ व तातडीचे असल्यास)

- जीवनावश्यक सेवा, वस्तू व माल यांची वाहतूक करणारी वाहने

- प्रसारमाध्यम व त्यांचे प्रतिनिधी (फक्त कामावरील)

- पोलीस व आरोग्य विभाग तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापनाशी संबंधित (केवळ कामावरील)

- जिल्हाधिकारी तसेच पोलिस आयुक्त यांनी परवानगी दिलेल्या व्यक्ती

- कोरोनाच्या जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com