रेल्वे अधिकाऱ्याचे कपडे शिवायला देऊन करायचे फसवणूक; मग...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

  • रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून, कपडे शिवण्यास देऊन तरुणांना फसविणाऱ्यांना अटक 

पुणे : रेल्वेमध्ये लिपीक पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून, नागरीकांचा विश्‍वास बसण्यासाठी त्यांना रेल्वे अधिकाऱ्यांच्या पोषाखाचे कापड शिवण्यासाठी देत आर्थिक फसवणुक करणाऱ्या टोळीला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विश्वजित शिवाजीराव माने (वय 52, रा चव्हाणमळा, आष्टा, वाळवा, सांगली), हनुमान शिवाजी तानवडे (वय 22, रा पिंगेवाडी, शेवगाव, नगर), महेश कारभारी ससे (वय 25, रा ससेवाडी, जेऊर,नगर), अजित खंडागळे (रा. वाई) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हंसराज दत्तोबा जाधव (वय 44, रा लातुर) यांनी फिर्याद दिली आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वर्षाला होतात तब्बल एवढे कोटी रुपये खर्च

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या नातेवाईकांसह वैष्णोदेवी येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी तेथे त्यांची एका महिलेशी ओळख झाली. त्यानंतर संबंधित महिलेचा जाधव यांच्या आत्याच्या मुलास रेल्वेत नोकरी मिळवून देण्याबाबत फोन आला. त्यानुसार, जाधव व त्यांचे नातेवाईक संबंधीत महिलेस स्वारगेट येथे भेटले. त्यावेळी तिने माने याची ओळख करुन दिली. माने याने दिल्लीमध्ये राहणाऱ्या आपल्या खंडागळे नावाच्या मित्राची रेल्वेत ओळख असून तो नोकरी लावून देतो, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्या पुतण्याची माहिती त्यांना दिली. त्यानंतर माने याने फिर्यादी यांना पुणे रेल्वे स्थानकावर बोलावून पहिल्यांदा 50 हजार रुपये घेतले. त्यावेळी त्यांच्या पुतण्याची रेल्वे रुग्णालयातच वैद्यकीय तपासणीही करुन घेतली. त्यानंतर पुन्हा माने याच्या बॅंक खात्यावर 25 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यास रेल्वे अधिकाऱ्याच्या पोषाखाचे कापड व बनावट नियुक्तीपत्रही दिले. त्यानंतर माने याने फिर्यादीच्या पुतण्याच्या मित्राकडूनही एक लाख रुपये घेतले.

पाकिस्तानीच म्हणतात, 'सरकार लाज वाटू द्या, भारताकडून काहीतरी शिका'

फिर्यादीच्या पुतण्याने नियुक्तीपत्राची तपासणी केली, तेव्हा ते बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातुन प्रारंभी माने यास, त्यानंतर उर्वरीत तिघांना अटक केली. पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सोनवणे,भीमा हगवणे, प्रशांत डोईफोडे, अनिल टेके, सुनिता राठोड, मिलिंद आळंदे, धीरज कपिले, बेबी थोरात यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested for cheating youngsters by displaying job aspirations in railway