‘न्यू नॉर्मल’ला हवी संयम, शिस्तीची जोड

धनंजय बिजले
Sunday, 27 September 2020

लॉकडाउननंतर ‘न्यू नॉर्मल’ पद्धतीने जनजीवन सुरू होण्याची अपेक्षा होती; पण नागरिकांनी ‘न्यू नॉर्मल’ आणि ‘नॉर्मल’ यातील धूसर सीमारेषाच समजून घेतली नाही. त्याचे परिणाम आता सर्वांनाच भोगावे लागत आहेत. येत्या काळात संयम व शिस्तीचे पालनच पुण्याला सध्याच्या दारुण स्थितीतून बाहेर काढू शकेल...

लॉकडाउननंतर ‘न्यू नॉर्मल’ पद्धतीने जनजीवन सुरू होण्याची अपेक्षा होती; पण नागरिकांनी ‘न्यू नॉर्मल’ आणि ‘नॉर्मल’ यातील धूसर सीमारेषाच समजून घेतली नाही. त्याचे परिणाम आता सर्वांनाच भोगावे लागत आहेत. येत्या काळात संयम व शिस्तीचे पालनच पुण्याला सध्याच्या दारुण स्थितीतून बाहेर काढू शकेल...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होण्याचे नावच घेत नाही, असे सध्याचे चित्र आहे. नुकताच झालेला गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांनी अतिशय साधेपणाने साजरा केला, मात्र तरीही गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. रुग्णवाढीचा वाढता आलेख हेच दर्शवितो. पुण्यात ९ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्याच महिन्याच्या शेवटी लॉकडाउन सुरू झाले. तीन महिन्याच्या लॉकडाउननंतर हळूहळू ‘अनलॉक’ला सुरुवात झाली. या काळात रुग्णसंख्या आटोक्‍यात राहिली. मार्च ते ऑगस्ट या कालावधीत शहरातील रुग्णसंख्येचा आलेख हळूहळू वाढत होता. मात्र, गणेशोत्सवानंतरच्या पंधरा दिवसात त्यात कमालीच्या वेगाने वाढ झाली. पुण्यात दोन सप्टेंबरला उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ५४ हजार ७६० होती. पंधराच दिवसांत १७ सप्टेंबरला ती थेट ८१ हजार ५४० झाली. यावरून रुग्णसंख्येच्या वाढीचा वेग सहज लक्षात येतो.

'तेलंही गेलं अन् तूपही गेलं'; कर्ज मिळालं नाहीच, पण हातचे गमावले १५ लाख 

वाढता आलेख 
प्रशासन; तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले; पण नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तो संयमाने साजरा केला नाही, हेच वाढत्या रुग्णसंख्येवरून स्पष्ट होते. या निमित्ताने लोक खरेदीसाठी, नातेवाईकांच्या घरी सण साजरा करण्यासाठी प्रथमच मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. यात ज्येष्ठांची संख्या लक्षणीय होती. केवळ पुण्यातच नव्हे, तर पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातही सर्वसाधारणपणे हेच चित्र होते. त्याचे दृश्‍य परिणाम आता दिसू लागले आहेत. कारण या महिन्यात जिल्ह्यांत रुग्णसंख्येचा आलेख वाढत चालला आहे. गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यांत मृतांच्या आकड्याने तीनदा नव्वदी पार केली आहे. याकडे सर्वांनीच गांर्भीयाने पाहायला हवे.

पुणेकरांनी थकवले महापालिकेचे १२०० कोटी; माहिती अधिकारातून समोर आली माहिती

नागरिकांची बेफिकीरी 
कोरोनानंतर जग पूर्णपणे वेगळे असणार आहे. मार्चपूर्वीची परिस्थिती आता किमान दोन वर्षे तरी पुन्हा अनुभवता येणार नाही, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत; पण त्याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. लॉकडाउननंतर ‘न्यू नॉर्मल’ पद्धतीने जनजीवन सुरू होण्याची अपेक्षा होती; पण नागरिकांनी ‘न्यू नॉर्मल’ आणि ‘नॉर्मल’ यातील धूसर सीमारेषाच समजून घेतली नाही. त्याचे परिणाम आता सर्वांनाच भोगावे लागत आहेत. आजूबाजूला सहज नजर टाकल्यास लोक सर्रासपणे मास्कविना फिरताना आढळतात. पुण्यात या काळात पोलिसांनी ६५ हजारांहून अधिक लोकांवर मास्क न वापरल्याप्रकरणी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल तीन कोटी दहा लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिसांवर अशा प्रकारे कारवाई करण्याची वेळ यावी, हे नागरिकांच्या बेफिकीरीचे लक्षण आहे. सोशल डिस्टंसिंगचा तर पार फज्जा उडाला आहे. चौकाचौकात, चहाच्या दुकानासमोर लोक घोळक्‍याने गप्पा मारताना आढळतात. दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर असावे, असे तज्ज्ञ सांगतात; पण हा सल्ला आपल्यासाठी नाही असाच ग्रह प्रत्येकाने करून घेतला आहे.

लग्न की करिअर ? मुलींपुढे पडला प्रश्‍न​

..तरच पुण्याचे आरोग्य पूर्ववत 
शहरातील हॉस्पिटल्समधील दारुण स्थिती, अत्यावश्‍यक औषधांचा तुटवडा लक्षात घेऊन प्रत्येकाने आता स्वयंशिस्त लावून घेतलीच पाहिजे. आता खासगी; तसेच सार्वजनिक कार्यालयांतील उपस्थिती वाढली आहे, किंबहुना ती वाढतच जाणार आहे. दुकाने पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. पीएमपीच्या बसेस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. त्यातच आगामी काळात नवरात्रोत्सव, दसऱ्यासारखे सण येत आहेत. अशा वेळी ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैली प्रत्येकाने अवलंबल्यास स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे.

'एमसीव्हीसी'च्या विद्यार्थ्यांचे भविष्य येणार धोक्यात; अभ्यासक्रम बदलण्याचा राज्य सरकारचा घाट!

कोरोनावरील लस उपलब्ध होईपर्यंत प्रत्येकाने सण, उत्सव, विवाह सोहळे, वाढदिवस साजरे करताना संयमच बाळगला पाहिजे. गेल्यावर्षी ज्याप्रमाणे आपण यात सहभागी झालो, तसेच यावेळी करून चालणारच नाही. २४ सप्टेंबरला पुण्यात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या साठ हजारवर पोचली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्याचा विचार केल्यास तुलनेने ती कमी आहे. रुग्णसंख्येचा आलेख कमी येण्याची ही सुरुवात असल्याचे हे लक्षण आहे. रुग्णसंख्येचा आलेख उतरता ठेवायचा असेल आणि पुण्याचे आरोग्य पूर्ववत करायचे असेल, तर त्याची जबाबदारी केवळ प्रशासनावर ढकलून चालणार नाही. प्रत्येकाने त्याला हातभार लावलाच पाहिजे. केवळ सण-उत्सवच नव्हे, तर कोणतीही सार्वजनिक कृती करताना त्याला संयमाची व शिस्तीची जोड दिल्यासच सध्याच्या दारूण परिस्थितीतून मार्ग निघणार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dhananjay bijale lockdown new normal lifestyle