...हम नहीं सुधरेंगे!

Hand-Wash
Hand-Wash

‘कोरोना’ला प्रतिबंध, ही एक सामूहिक जबाबदारी आहे; पण बेशिस्तीच्या प्रादुर्भावामुळे या प्रयत्नांना मर्यादा येत आहेत. मास्क न वापरणे आणि वाटेल त्या ठिकाणी पान-तंबाखूच्या पिचकाऱ्या मारणे, या दोन्ही गोष्टी ‘कोरोना’ला निमंत्रण देणाऱ्या आहेत. त्याची कसलीही फिकीर नसलेले लाखभर लोक दंडात्मक कारवाईत पुण्यात सापडतात, हे शहरातील स्थिती किती विदारक आहे, याचे निदर्शक आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात नवीन ‘कोरोना’बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे; परंतु याचा अर्थ परिस्थिती आटोक्‍यात आली आहे, असे मात्र नाही. संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाखांपेक्षा अधिक लोकांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला असून, त्यांतील सात हजारांचा मृत्यू ओढवला आहे. वयाने लहान-थोर, महिला-पुरुष, इतर गंभीर आजार असलेले वा पूर्ण निरोगी... अशी वेगवेगळी पार्श्‍वभूमी असलेल्यांपैकी कोणासाठी हा आजार जीवघेणा ठरेल आणि कोण त्यातून सहीसलामत बाहेर पडेल, याविषयी ठोस काही सांगता येत नाही. शंभर वर्षांचे आजोबा ठणठणीत बरे होतात आणि कोणताही आजार नसलेला एखादा तरुण मृत्युशरण जातो, अशी टोकाची परिस्थिती आहे. त्यामुळे, ‘कोरोना’वर उपचार घेण्याची वेळ येण्याऐवजी तो आपल्यापर्यंत पोचू नये, याची काळजी घेणे, हाच खरा उपाय आहे. मग पुणेकर याबाबत खरोखर जागरूक आहेत काय?...

साधी, सोपी त्रिसूत्री
‘कोरोना’वर तूर्त कोणतेही प्रतिबंधात्मक औषध नाही. ‘तोंडावर मास्क वापरणे - साबणाने वेळोवेळी हात धुणे - घराबाहेर इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे’ ही साधी-सोपी आणि अल्पखर्चिक अशी त्रिसूत्री आहे. (हात धुण्याची सोय उपलब्ध नसेल, तेव्हा सॅनिटायझरचा पर्याय आहे.) या उपायांचे पालन केल्यास, महाभयानक ‘कोरोना’ विषाणू स्वतःच दूर राहील. महापालिका, सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था हे सर्व वारंवार कंठशोष करून सांगत आहेत; पण तरीही अनेकांच्या बाबतीत ‘कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच’. ती काही सरळ होत नाही! म्हणजे ही बेजबाबदार मंडळी कोणाला जुमानतच नाहीत.

शिस्तीचे तीन-तेरा
‘पुणे तेथे काय उणे’ असे नेहमी कौतुकाने सांगितले जाते. यात अर्थातच शहराच्या चांगुलपणाच्या, गुणगौरवाच्या गोष्टी अभिप्रेत आहेत. त्यात नाइलाजाने दोषांचाही समावेश करायची वेळ आली आहे. सुसंस्कृत, सुशिक्षित, उच्चभ्रू, कलागुणसंपन्न हे वर्णन लागू असलेले असंख्य नागरिक पुण्यात वास्तव्यास आहेत. तथापि, ‘सार्वजनिक बेशिस्त’ हे या शहराचे मोठे न्यून आहे. 

त्याचे प्रत्यंतर रस्त्यावरील रहदारीत पावला-पावलांवर येते. वाहतुकीचे, स्वच्छतेचे वा इतरही नियम आपण सोडून इतरांसाठी आहेत, असा अंधसमज अनेकांचा आहे. त्यांची अंगभूत बेपर्वाई त्यांच्या अन्य सामाजिक वर्तनातही दिसते. ‘कोरोना’च्या विस्ताराला ही ‘हम नहीं सुधरेंगे’ प्रवृत्ती कारणीभूत आहे.

साडेपाच कोटींचा दंड
घराबाहेर पडल्यावर मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पथके नेमली आहेत. नियमभंग केल्यास पाचशे रुपये दंड आकारला जातो. त्यांनी आतापर्यंत सत्तर हजार जणांकडून साडेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. याच्याशी संबंधित दुसरेही उदाहरण आहे. सरकारी कार्यालयांत, सार्वजनिक जागी अस्वच्छता करणारे, थुंकणारे लोक शोधण्याची जबाबदारी महापालिकेने काही अधिकारी- कर्मचाऱ्यांवर सोपविली आहे. त्यांनी शहर घाण करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजार, याप्रमाणे गेल्या सात महिन्यांत दोन कोटी रुपयांचा दंड केला आहे. पालिकेच्या या चमूत फक्त तीस जण आहेत. ते संपूर्ण शहरात किती ठिकाणी लक्ष ठेवणार? त्यांची संख्या जास्त असती, तर ही रक्कम कित्येक पटींनी वाढली असती. कारण ‘कोटींत दंड भरू; पण सरळ वागणार नाही,’ असा जणू काही लोकांचा संकल्पच आहे!

चूक एकाची, भुर्दंड दुसऱ्यांना!
मास्क न वापरणे आणि वाटेल त्या ठिकाणी पान-तंबाखूच्या पिचकाऱ्या मारणे, या दोन्ही गोष्टी ‘कोरोना’ला निमंत्रण देणाऱ्या आहेत. त्याची कसलीही फिकीर नसलेले लाखभर लोक प्रत्यक्ष सापडतात, हे शहरातील स्थिती किती विदारक आहे, याचे निदर्शक आहे. आपल्या चुकीमुळे स्वतः ‘कोरोना’च्या जाळ्यात अडकायचे, रुग्णालयाची वारी ओढवून घ्यायची आणि नंतर बिल मोठे आले म्हणून ‘शंख’ करायचा, याला काही अर्थ नाही. उपचाराचा खर्च ही त्यांच्या बेशिस्तीची त्यांनी मोजलेली किंमत आहे, असे म्हणता येईल; परंतु त्यांच्यामुळे इतरांनाही हा भुर्दंड सोसायला लागतो, तेव्हा त्याचे काय?

सणवारात दक्षता घेण्याची गरज
पुण्यात रोज सरासरी चाळीसहून अधिक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. त्यातच, डिसेंबर-जानेवारीत ‘कोरोना’ची दुसरी लाट येण्याची शक्‍यता विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी वर्तवली आहे. आता दसरा-दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. मागे गणेशोत्सवात रस्त्यांवर अकारण झालेल्या गर्दीमुळे ‘कोरोना’चा प्रसार वाढला होता. त्याची पुनरावृत्ती आगामी सणवारात होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. 

‘यांच्या’पासून दूर राहा
आपण स्वतः सगळे नियम पाळलेच पाहिजेत आणि इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करायला हवे. जे त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत- मग ते मित्र, सहकारी, नातेवाईक कोणीही असोत, त्यांच्यापासून शब्दशः चार हात दूर राहावे. कारण ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ असे म्हटले जात असले, तरी काही ‘नग’ असे असतात, जे स्वतः ठेचकाळले तरी त्यातून काही बोध घेत नाहीत.

...तर ‘कोरोना’ची चिंताच नको  
साखरपुडा, लग्नसमारंभ वा अन्य कार्यक्रम यांत स्वतःला सुरक्षित ठेवून सहभागी होता येत असेल, तरच जावे, अन्यथा एक वेळ वाईटपणा वाट्याला आला तरी हरकत नाही; जीव सर्वाधिक मोलाचा आहे, हे लक्षात घ्यावे. ही पथ्ये पाळली, तर ‘कोरोना’च्या कोणत्याही लाटेची चिंता करण्याचे कारण नाही!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com