शो मस्ट गो ऑन...

शो मस्ट गो ऑन...

रेस्टॉरंट सुरू करण्यास सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे; पण ती सगळी लगेचच सुरू होतील, अशी शक्‍यता दिसत नाही. त्यामागील कारणे, सद्यःस्थिती याविषयी...

राज्य सरकारने सोमवारपासून (ता. ५ पासून) हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. ठप्प झालेल्या या व्यवसायाला चालना देण्यासाठी काही व्यावसायिकांनी यापूर्वीच खाद्यपदार्थांची पार्सल सेवा सुरू केली आहे. मात्र, त्यातून अगदी जुजबी उलाढाल होत असल्याने, हा ‘दुधाची तहान ताकावर भागविण्याचा’ प्रकार ठरला आहे. आता मात्र ग्राहकांना खऱ्या अर्थी तेथील दारे खुली होत आहेत.

दिलासादायक सुचिन्ह
‘कोरोना’चे सावट नक्की कधी दूर होईल, याची खात्री नाही. लोकांनी सुरुवातीचे एक-दोन महिने लॉकडाउनचे सर्व निर्बंध स्वीकारले. मात्र, हा कालावधी लांबत गेल्यावर त्यांची अस्वस्थता वाढत गेली. अनेकांची रोजी रोटी रोजच्या कामावर अवलंबून आहे. त्यांचा रोजगार बुडाला. प्रारंभी, विविध स्वयंसेवी संस्था-संघटनांनी पुढाकार घेऊन हजारो गरजूंना शिधा, जेवणाची पाकिटे पुरवली; पण या साह्याला मर्यादा असतात. दातृत्वाच्या संवेदना पुढे बोथट होत जातात आणि मदतीचा ओघ आटत जातो. अनेक ठिकाणी याची प्रचिती आली. त्यामुळे रोजगाराच्या वाटांतील अडथळे लवकरात लवकर दूर करणे, याला पर्याय नाही. हॉटेलांना मिळालेली परवानगी, हे त्यादृष्टीने एक सुचिन्ह आहे.

नागरिकांची गैरसोय
हॉटेल चालू होणे, ही केवळ जिव्हासौख्य अनुभवण्यासाठी गर्दी करणाऱ्या खवय्यांची गरज आहे, असे नाही. या व्यवस्थेवर चहा-नाश्‍ता, जेवणासाठी अवलंबून असलेला वर्ग मोठा आहे. कॉट बेसिसवर राहणारे विद्यार्थी, कुटुंबासोबत नसलेले परगावचे नोकरदार, घरी एकटे असणारे ज्येष्ठ नागरिक, अन्य शहरांतून कामानिमित्त हजारोंच्या संख्येत पुण्यात ये-जा करणारे लोक या सर्वांची सध्या पंचाईत होत आहे. त्यांना सोमवारपासून दिलासा मिळणार आहे.

अर्थचक्रावर परिणाम
पुण्यातील हॉटेल उद्योगात एरवी कोट्यवधींची उलाढाल होत असते. तेथे काम करणारे वेटर, आचारी, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षारक्षक, हिशेबनीस या सगळ्यांची अलीकडे आर्थिक कोंडी झाली आहे; परंतु हे फक्त त्यांच्यापुरते मर्यादित नाही. एखादा उद्योग ठप्प होतो, तेव्हा त्याचे परिणाम त्याच्याशी निगडित इतर व्यावसायिकांवरही होतात. ही एक साखळीच असते. किराणा माल, दूध, मासे-मटण, भाजी, फळे, शीतपेये यांचा हुकमी ग्राहक म्हणजे हॉटेलचालक. गेले सहा महिने त्यांच्याकडील मागणी शून्यावर आली आहे. त्यामुळे उत्पादक, वितरक, व्यापारी, शेतकरी यांच्या अर्थकारणावर थेट परिणाम झाला आहे. हॉटेल चालू झाल्यावर या अर्थचक्राला गती मिळेल.

नियमांचे पालन आवश्‍यक
बाहेर वावरताना एकमेकांत पुरेसे अंतर ठेवणे, मास्क योग्य रीतीने परिधान करणे, हात वेळोवेळी साबणाने धुणे किंवा सॅनिटायझर वापरणे... घराबाहेर पडले, की या गोष्टी अनिवार्य आहेत. त्यांत कोठेही निष्काळजीपणा झाल्यास आजाराचे संक्रमण होण्याचा धोका निश्‍चित असतो. त्यामुळे आपले कर्मचारी आणि ग्राहक सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करीत आहेत किंवा कसे, याची काळजी हॉटेलचालकांना घ्यावी लागणार आहे.

हॉटेलचालकांपुढील अग्रक्रम
अर्थात आता परवानगी मिळाली आहे, म्हणून पहिल्या दिवसापासून सगळी रेस्टॉरंट पूर्ववत चालू होतील, असे अजिबात नाही. पुण्यातील हाॅटेल व्यावसायिक संघटनेचे साडेआठशे सभासद आहेत. त्यापैकी सुमारे ८५ टक्के हॉटेल भाडेतत्त्वावरील जागेत आहेत. ‘व्यवसाय बंद; पण खर्च चालू’ अशा विपरीत परिस्थितीत ते तग धरू शकत नाहीत. परिणामी किमान एक चतुर्थांश हॉटेल सध्या कुलूपबंद आहेत. कित्येकांचा कर्मचारी वर्ग त्यांच्या गावी निघून गेला आहे. बव्हंशी आचारी उत्तर प्रदेश, बिहारसारख्या परराज्यांतील आहेत. त्यांना तेथून परत येण्यासाठी तूर्त रेल्वेसेवा उपलब्ध नाही. त्यांच्याखेरीज स्वयंपाकघरच सुरू करता येत नसल्याने, त्यांना विमानाने आणण्याची व्यवस्था अनेक मालकांनी केली आहे.

नवी विटी; नवे राज्य!
सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून घेणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करून ते तंदुरुस्त आहेत याची खातरजमा करणे, पूर्ण जागा निर्जंतुक करून घेणे अशी बरीच कामे हॉटेलचालकांच्या पुढे आहे. हॉटेलमधील फक्त निम्म्या आसनव्यवस्थेचा वापर करण्याचे बंधन आहे. त्यामुळे कमाईला मर्यादा आहे. एकच मेन्यू कार्ड अनेकांनी हाताळणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्याला डिजिटल पर्याय ठेवावे लागतील. मोबाईल फोनवर ‘क्‍यूआर कोड’ स्कॅन करून पदार्थांची यादी पाहता येईल, अशी व्यवस्था करणे असा एक मार्ग आहे. हे सर्व करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करावी लागणार आहे. ‘नवी विटी, नवे राज्य’ या उक्तीप्रमाणे व्यवसायाचा डाव पुन्हा मांडावा लागणार आहे. एवढे सगळे करूनही एक मुख्य प्रश्‍न आहे - ग्राहकांचा प्रतिसाद किती मिळणार?

‘ग्राहक देवो भव’
पुण्यात देश-परदेशातील लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. हा वर्ग हॉटेल, तसेच खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, टपऱ्या यांचा हक्‍काचा ग्राहक आहे; पण शिक्षण संस्था बंद असल्याने तो जणू गायब झाला आहे. ‘आयटी’ कंपन्यांतील असंख्य कर्मचारी घरूनच काम सांभाळत आहेत. ही मंडळी पूर्वीसारखी बाहेर पडत नाहीत. तसेच, सणवारानिमित्त, सुटीच्या दिवशी खरेदीसाठी कुटुंबासमवेत बाहेर पडण्याचे प्रमाण कमी आहे. परिणामी, त्यांचे ‘हॉटेलिंग’ही माफकच राहील, अशी स्थिती आहे. त्यामुळे सरकारी परवानगीचा एक अडथळा पार झाला असला, तरी देवरूपी मानला जाणारा ग्राहक कधी प्रसन्न होईल, यावर बरेच काही अवलंबून आहे! 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

एकेक पाउल महत्त्वाचे
आपले हॉटेल आता सुरू न करता आणखी वाट पाहावी, असे काहींना वाटते. तथापि, पुढे कधी तरी सगळे मार्गी लागेल, या भरवशावर सध्या शांत बसून राहणे कितपत व्यवहार्य होईल? कारण विद्यमान अनिश्चितता किती काळ टिकून राहील, याचे नेमके भाकीत कोणी वर्तवू शकत नाही. हे लक्षात घेता, पुढचा प्रवास खडतर असला, तरी मार्गक्रमण सुरू केलेच पाहिजे. शेवटी, प्रवास कितीही मोठा असला तरी एकेक पाऊल पुढे टाकल्यावरच अंतिम उद्दिष्टापर्यंत पोचता येते. 

प्रतीक्षा एक मृगजळ
हॉटेल व्यावसायिकांनी प्रथम पार्सल सेवा करून पहिले पाऊल टाकले. आता ५० टक्के क्षमतेने ते प्रत्यक्ष खुले करणे, हा त्यापुढील टप्पा आहे. नेहमीपेक्षा फार तर निम्मेच उत्पन्न मिळणार असेल, तर ते कसे परवडणार, हा अनेकांचा प्रश्न आहे. मात्र, काहीच हालचाल न करणे हे अजिबातच न परवडणारे असू शकते, अशीही त्याची दुसरी बाजू आहे. कारण आणखी काही दिवसांनी सर्व काही आलबेल होईल, ही प्रतीक्षा म्हणजे केवळ मृगजळ ठरू शकते. शेवटी परिस्थिती कशीही असो, ‘शो मस्ट गो ऑन’ हे विसरून चालणार नाही!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com