ऑनलाइन शाळा अन्‌ नाना कळा! 

Panchnama
Panchnama

‘हॅलो, हॅलो, माझे बोलणं ऐकू येतंय का? हॅलो, नीट लक्ष द्या... माझं बोलणं...माझं बोलणं.... ऐकू... माझं बोलणं.... टीव्हीचा आवाज कोठून येतोय. आधी टीव्ही बंद करा.’’ मॅडमचा आवाज टिपेला पोचला होता. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाचा ऑनलाइन क्‍लास घेताना मॅडमची अगदी दमछाक होऊन जायची. त्यातच एखादा ‘मॅडम, तुमचा आवाजच येत नाही’ असं म्हणायचा आणि पुढची दहा-पंधरा मिनिटे मॅडम आवाजाची टेस्ट करत बसायच्या. मुलं मात्र डोळे मिचकावत बसायची. कॉलेजमध्ये लेक्‍चर असायचे तेव्हा सगळे विद्यार्थी कॅंपसमध्ये फिरत असायचे. आता ऑनलाइन क्‍लास 
असले की मुले फेसबुक व इन्स्टाग्रामवर फिरून यायची. बाकी सगळं सारखं असलं तरी फिरणं कॉमन असायचं.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘निमिष. तू बोल. निमिष आहे का? निमिष ...निमिष...’’ ओरडून मॅडमचा घसा दुखायला लागला.  
‘मॅडम, निमिष आताच दुकानातून किराणा माल आणायला गेलाय. मी दहावीत शिकणारा त्याचा भाऊ बोलतोय. मला त्याने येथे बसायला सांगितलंय. तुम्ही शिकवा बिनधास्त.’’

‘अरे बाप रे! आतापर्यंत परीक्षेला डमी विद्यार्थी बसायचे. आता ऑनलाइन क्‍लासमध्येही डमी विद्यार्थी बसायला लागले का? अजून कोणा-कोणाचे बहीण-भाऊ, आईवडील क्‍लासला बसले आहेत.’’ मॅडमने वैतागून म्हटले. तेवढ्यात शिटीचा आवाज आला.  
‘शिटी कोणी वाजवली. क्‍लासला बसलाय का रोडरोमिओ बनून रस्त्यावर हिंडताय.’’
‘मॅडम ती कुकरची शिटी आहे.’’ एका मुलीने सांगितले. 
‘स्वराली, कुकरच्या अजून दोन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद कर. मी जरा देवळात जाऊन येते,’ स्वरालीच्या आईचे हे वाक्‍य सगळ्या क्‍लासने ऐकले.
‘धीरज, तुझं लक्ष आहे का क्‍लासमध्ये?’’ मॅडमने विचारले. 
‘हो मॅडम, स्वरालीच्या कुकरची आताच तिसरी शिटी वाजली. स्वराली कुकर बंद कर. आईचा निरोप विसरलीस काय.’’ धीरजने असे म्हटल्यावर मॅडमने त्याला फैलावर घेतले. ‘‘तू क्‍लासला येतोस का दुसऱ्यांच्या घरच्या शिट्या मोजायला येतोस.’’

‘मॅडम, स्वराली एक नंबरची विसराळू आहे. तिला मदत करावी म्हणून मी कुकरच्या शिट्या मोजत बसलो होतो.’’
‘काय रे आता कसा एकमेकांना आवाज ऐकू येतोय. मी बोलत असते, तेव्हा माझाच आवाज तुम्हाला ऐकू येत नाही.’’ मॅडमने रागाने म्हटले.
‘मॅडम, रेंजचा प्रॉब्लेम असेल बहुतेक. तुम्ही मोबाईल किंवा सिमकार्ड बदला.’’ एका विद्यार्थ्याने सुचवले. 
‘त्यापेक्षा मी तुमचा वर्गच बदलते. बरं ते जाऊ द्या. आता तरी माझा आवाज ऐकू येतोय ना. ’’
‘हो मॅडम.’’ 
‘बरं, आजचं लेक्‍चर संपवतेय. कोणाला काही शंका आहेत का?’’
‘हो मॅडम. लेक्‍चर चालू असताना मध्येच जी तरुणी तुम्हाला चहा द्यायला आली होती. ती तुमची मुलगी आहे का?’’ एका विद्यार्थ्याची ही शंका ऐकताच मॅडमने फोनच स्वीच ऑफ केला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com