'कोरोना' ही स्वतःला सिद्ध करण्याची योग्य संधी; सीओईपीच्या दीक्षांत समारंभात कुलगुरुंनी दिला कानमंत्र

Dr_Nitin_Karmalkar
Dr_Nitin_Karmalkar

पुणे : कोरोनाच्या वैश्‍विक साथीमुळे उद्योग विश्‍वातील नवीन रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर आजवर मिळविलेल्या ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या आधारे आवडीच्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याची हीच योग्य संधी आहे, असा सल्ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अभियांत्रिकीच्या पदवीधारकांना दिला. 

शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौदाव्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. या वेळी सीओईपीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक प्रा. बी. बी. अहुजा, संचालक मंडळाचे सदस्य डॉ. आनंद देशपांडे आदी उपस्थित होते. पदवीधारक, विद्यार्थी आणि पालक ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाला उपस्थिती होते. आत्मनिर्भर भारतामध्ये विद्यार्थ्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना डॉ. करमळकर म्हणाले, "ऑनलाईन शिक्षणासाठी सध्या वापरात येणारी सर्व साधने ही विदेशी आहेत. त्यांना भारतीय पर्याय देण्याचे काम तुम्ही करू शकता. भविष्यात येणाऱ्या आव्हानांसाठी शिक्षक किंवा मार्गदर्शक तुमची तयारी करून घेऊ शकतो, पण त्यासाठी सज्ज तुम्हालाच व्हायचे असते. समाजाची गरज ओळखून त्यांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या नवसंशोधन किंवा नवनिर्मीतीतूनच समाजाचे देणं पूर्ण करता येईल.'' स्टीव्ह जॉबची शिकवण विद्यार्थ्यांना सांगताना डॉ. करमळकर यांनी दुसऱ्याचे स्वप्न जगण्यापेक्षा स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात स्वतःचे स्वप्न जगण्याचा सल्ला दिला.

नवोन्मुख कल्पनाशक्तीतून नवतंत्रज्ञान विकसित करण्याचे सामर्थ्य युवकांमध्ये असल्याचे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, "विद्यार्थ्यांनी आता नोकरीची वाट न पाहता प्रत्यक्ष उद्योगांसोबत काम करायला हवे. समाजाची गरज ओळखून खऱ्या अर्थाने ग्लोकल म्हणजे ग्लोबल आणि लोकल उपाय शोधणे गरजेचे आहे. एकप्रकारे संपूर्ण जग तुमच्यासमोर बाजार म्हणून खुलं आहे. त्याच्या आकांक्षेला पुरून उरेल असे दर्जेदार काम तुम्ही करा.'' नवकल्पना आणि नवसंशोधनाची संस्कृती सीओईपीमध्ये अधिक रुजविण्यासाठी आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, तज्ज्ञ उपलब्ध करणार आहे. केवळ देशातीलच नाही, तर जगातील सर्वोत्तम संस्था बनविण्याचा प्रयत्न असल्याचे पवार म्हणाले.

कार्यपद्धती बदलण्याची गरज : 
आपल्या शिकण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. सिंगापूर इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी आणि इस्राईलच्या आयडीसी संस्थेमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे शिकत आहे. सिंगापूरच्या इंस्टिट्यूटमध्ये तर मर्सिडीज बेंझ, बीएमडब्लू, रोल्सरॉईस आदी उत्पादक कंपनीचे आशियाचे मुख्यालय आहे. तिथेच प्राध्यापक आणि विद्यार्थी शिकतात. इस्राईलमध्ये उद्योगक्षेत्रात काम करणारे तंत्रज्ञ शिकविण्याचे काम करतात. त्यांच्या उपलब्धतेनुसार तीथे वर्ग भरतात. जगातील उत्तम संस्थांची कार्यपद्धती आपण शिकायला हवी आणि आपल्या आवश्‍यकतेनुसार तिची अंमलबजावणी करायला हवी, असे पवार म्हणाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com