कर्जमुक्ती योजनेच्या लिंकवर कॅंडी क्रश; प्रभारी सहकार आयुक्त निलंबित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

  • प्रभारी सहकार आयुक्त सतीश सोनी निलंबित
  • कर्जमुक्ती योजनेच्या लिंकवर कॅंडी क्रश गेममुळे खळबळ

पुणे : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर योजनेची चित्रफीत उघडण्याऐवजी कॅंडी क्रश गेम उघडत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीसाठी तयार केलेल्या योजनेत सहकार खात्यानेच अडथळा आणल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने प्रभारी सहकार आयुक्त सतीश सोनी यांना निलंबित केले आहे.

म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'

सोनी यांच्याकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकासोबतच सहकार खात्याचा प्रभारी अतिरिक्त कार्यभार होता. त्यांच्या निलंबनानंतर नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांच्याकडे सहकार आयुक्तपदाचा पूर्णवेळ कार्यभार सोपविण्यात आला आहे.

सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेल्या चित्रफितीमध्ये ही बाब निदर्शनास आली होती. राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर गेल्यानंतर योजनेची चित्रफित उघडण्याऐवजी कॅंडी क्रश उघडला जात असल्याबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशीत प्रभारी सहकार आयुक्त सतीश सोनी यांच्या कृतीमुळे राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीत व्यत्यय निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या लिंकची सुविधा उपलब्ध करून देताना चुकीची लिंक जाऊ नये, याबाबत विशेष खबरदारी घेणे गरजेचे होते. तरीही त्यांनी एकाच दिवशी दोन प्रकारची वेगवेगळी पत्रे तयार केली. एका पत्रामध्ये चुकीचा युआरएल टाकून कृषी आयुक्तांना ते पत्र ई-मेलवर पाठवून त्यांची दिशाभूल केली. आणि नंतर दुसऱ्या पत्रावर कृषी आयुक्तांची पोचपावती घेतली. ही चूक अनावधानाने झालेली नसून हेतुपुरस्सर याची शक्यता नाकारता येत नाही. या चुकीच्या लिंकमुळे योजनेची बदनामी झाली. तसेच ही बाब निस्तारण्यासाठी सरकारला खुलासे सादर करावे लागले. सोनी यांनी त्यांना सोपविलेल्या कामांमध्ये अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोनी यांना निलंबित करण्यात आले असून, सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुंबई येथील मुख्यालय सोडता येणार नाही, असे राज्य सरकारच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistant Commissioner Satish Soni suspended