Video : पुण्यात भरली रिक्षा सौंदर्य स्पर्धा; ती लावण्यवती, कोल्हापूरची!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

- सजावट स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या रिक्षांनी जिंकली मनं.

पुणे : 'ती आली, तिने पाहिले अन्‌ तिने जिंकले', असे आपण एखाद्या सौंदर्यवतीबद्दल नेहमीच बोलतो. पण, रविवारी एका अनोख्या लावण्यवतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होते, बाराव्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे! त्यामध्ये लावण्यवती ठरली, कोल्हापूरची रिक्षा! सजावट स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या रिक्षाचालकांनी आणलेल्या या रिक्षांनी उपस्थितांची वाहवा मिळविली. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा 

तुम्ही पुण्यात आतापर्यंत काळ्या-पिवळ्या रिक्षा पाहिल्या असतील. दुसऱ्या शहरात गेल्यास कुठे हिरव्या तर, कुठे पिवळ्या रिक्षांमध्ये कदाचित बसलाही असाल. पण या स्पर्धेत सहभागी झालेल्या रिक्षा या खास प्रवाशांसाठी एअर कुलर, फ्रिज ठेवलेल्या आणि आकर्षक होत्या. महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघ यांच्यातर्फे "माझी रिक्षा, सुंदर रिक्षा' या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा आयोजित केली होती.

भाजपच्या सापळ्यातून सुटका; शिवसेैनिकांना बळ

खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. रिक्षेचे सौंदर्य किती खुलवता येते, प्रवाशांना कशाप्रकारे सेवा उपलब्ध करून देता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही स्पर्धा. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले 55 रिक्षाचालक या स्पर्धेत सहभागी झाले होते. 

महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, "या स्पर्धेला प्रतिसाद वाढत आहे. पहिल्या वर्षी 10 स्पर्धक सहभागी झाले होते. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याची प्रेरणा या स्पर्धेतून इतर रिक्षाचालकांना मिळेल.'' ही स्पर्धा बघण्यासाठी दोन ते अडीच हजार रिक्षाचालक आले होते. त्यांच्यापैकी "लकी ड्रॉ' काढून 50 चालकांना मोफत रिक्षा गणवेश देण्यात आला. 

स्पर्धेचा निकाल : 

- प्रथम ः एमएच 09 इ एल 0035 राजीव खटीक (कोल्हापूर) 
- द्वितीय ः एमएच 09 ए एल 4545 दीपक पवार (कोल्हापूर) 
- तृतीय ः एमएच 12 डिटी 2586 विवेक खराडे (पुणे) 

सुंदरतेबरोबर सेवाही

स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या कोल्हापूरच्या राजीव खटीक यांनी रिक्षामध्ये एअर कुलर, फ्रिज ठेवला आहे. तसेच कोल्हापूरच्या भोवताली पर्यटनस्थळांचीही माहिती अतिशय आकर्षक पद्धतीने प्रवाशांना देण्यात आली आहे. तसेच, या रिक्षातून अपंग आणि गर्भवतींना मोफत सेवा दिली जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auto Beauty Competition held in Pune Auto of Kolhapur win Prizes