बारामतीत झालं होतं खिल्जीच्या सैन्याशी घनघोर युद्ध; 700 वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात

संतोष शेंडकर
Monday, 11 January 2021

राजस्थान, देवगिरीचे पारिपत्य करून दक्षिणेकडे चाललेल्या मलिक काफूरच्या नेतृत्वाखालील अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्याला माणगंगा-नीरा-भीमा च्या तटावरील योद्ध्यांनी गुणवडी येथे अडविले

सोमेश्वरनगर - बारामतीचा इतिहास काय असा प्रश्न आता इतिहासजमा होणार आहे. याबाबत आता थेट 13 व्या शतकातील युद्धाचा इतिहास उजेडात आला आहे. 'तरडोली' येथील तुर्कांविरोधात केलेली लढाई नुकतीच समोर आली असताना आता सगर योद्ध्यांनी हिंदुस्थानवर आक्रमण करणारा क्रूरकर्मा अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्याशी घनघोर युध्द केल्याचा इतिहास समोर आला आहे. नीरा-भीमा नदीच्या तटावर 20 जानेवारी 1311 साली झालेल्या घनघोर युद्धात करणसिंग गावडे या महावीरासह अनेकांना वीरगती प्राप्त झाल्याची नोंद युद्धगीतात आढळली आहे. याशिवाय बारामतीतील सोनगावनजीक गुणवडीचे दत्तमंदिर आणि होळची ढगाईमाता यांचा आणि शिर्सुफळच्या गढीचा इतिहासही समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण आणि विदर्भ याच प्रांतात सध्याचा शेगर (इतिहासात सगर मराठा) समाज मोठ्या संख्येने आढळतो. समाजातील तरूणांच्या 'क्षत्रिय सगर राजपूत (सगर मराठा) सेवा संघ' या संघटनेमार्फत स्वतःच्या शिवकालीन इतिहासाचा शोध घेताना समशेरबहाद्दर संताजी आटोळे, सरलष्कर जनकोजी कोकणे, सेट्याजी खोमणे यांचा इतिहास आढळला. तर आता गुजराथ आर्कलॉजिकल सोसायटी, भिलवाडा, लंडन येथे सापडलेल्या कागदपत्रांमध्ये झाकला गेलेला मध्ययुगीन इतिहासही समोर येत आहे. बारामतीचाही इतिहास पेशेव्यांचे सावकार बाबूजी नाईक यांच्यापुढे फारसा जात नव्हता मात्र आता मध्ययुगात थेट अल्लाउद्दीनच्या मलिक काफूरला आणि तुर्की आक्रमकांना अंगावर घेतल्याचा जाज्वल्य इतिहास समोर आला आहे. 

हे वाचा - 'कोरेगाव भीमा'च्या आरोपपत्रातून संभाजी भिडेंचं नाव वगळलं; रिपब्लिकन युवा मोर्चाचा आरोप

तरडोली येथे 1498 साली तुर्की आक्रमकांशी लढाई झाल्याचे नुकतेच समोर आले होते. आता युध्दगीते, दोहा या स्वरूपातील चार चौपाईया आढळल्या आहेत. 

"नीरा नदी बडी सोहामनी, भीमा घाट का मिठ्ठे नीर|
नीरा के तट मे लढे, वो करण गावडे महावीर||"

असे वर्णन असणारे युध्दगीत 1452 मध्ये अरूणसिंह याने गुरजातचा राजा मरतानजी वाघेला याच्यासमोर गायले असल्याचा उल्लेख आहे. 20 जानेवारी 1311 रोजी राजस्थान, देवगिरीचे पारिपत्य करून दक्षिणेकडे चाललेल्या मलिक काफूरच्या नेतृत्वाखालील अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्याला माणगंगा-नीरा-भीमा च्या तटावरील योद्ध्यांनी गुणवडी येथे अडविले. जय दुर्गामाते अशा घोषणा देत योध्दे तुटून पडले. करणसिंह गावडे पुढे होत नूरशाहसोबत लढले आणि खिलजी बादशहाला घाव दिला. महिला विधवा झाल्या. 

"शीश कटा हाथ हरण, धड लडा गावडे करन| 
सौ सौ मारिया दुश्मन को, भीमराव करण दोनो बालवीर है||"

असे विरश्रीयुक्त वर्णन आहे. तीन पहर झालेल्या या घनघोर लढाईचा 'संदेशा' प्रसिद्ध मध्ययुगीन कवी अमीर खुसरो याने बादशहाला दिला असेही म्हटले आहे. याशिवाय "हिन्तवतनचा जवामर्द, शूरवीर तू शिरसुफल का" या उल्लेखांवरून तसेच "ऐसा नरसिंह गढी मे, योध्दा बडा सगर गावडे करणबीर" या उल्लेखावरून करनसिंह गावडे हे शिर्सुफळला सध्या अस्तित्वात असलेल्या गढीतील असावेत असा अंदाज केला जात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अभ्यासक रणजित ताम्हाणे, मिलिंद वायाळ म्हणाले, मागायला गेलो एक डोळा आणि शंभर मिळाले असे मिळालेल्या कागदपत्रांवरून वाटते आहे. होयसळ, पांड्य, काकतीय यांचा पराभव करायला निघालेल्या मलिक काफूरशी गुणवडी येथे अकराशे सगर योध्दे भिडले आणि विरश्रीपूर्ण इतिहास घडला. यात 22 योध्दे हुतात्मा झाल्याची आणि तीन सती गेल्याची नोंद आहे. आम्ही 20 जानेवारीला गुणवडीतील दत्तोबा देवस्थानसमोर शौर्यदिन साजरा करणार आहोत. आजही राजस्थान, माळवा प्रांतात याच्या लोककथा सांगितल्या जातात. 

एजंट खुनी हल्ल्याचा कट उघडकीस; कुविख्यात गुन्हेगाराला दिली होती १० लाखांची सुपारी​

गुणवडी आणि होळच्या मंदिरांचा इतिहास
"दत्त दश मंदिर मूल, महादत्त मंदिरे राह गावडे" असा चौपाईयामधे उल्लेख आहे. गुनवडी येथील हे मंदिर आजही गावडेंचा दत्तोबा म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आजही तीन 'सती' शिळा आहेत. चौपाईयामध्ये 'पद्मीनीनोने दिया देहदान' हा उल्लेख शिळांशी संबंध जोडणारा आहे. तसेच ढगाईभक्त सवाराम व दत्तपुजारी राजमुत्याम असाही उल्लेख असल्याने ढगाईमातेचा (होळ, तालुका बारामती) इतिहासही समोर येण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baramati 700 year history fight with khilji army on bank of neera bhima river