अनोखं स्टार्ट-अप! दोन पुणेकरांनी रुग्णांना बेड्स देण्यासाठी सुरू केली कंपनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bed Information for Corona Patients provide by ICRN Startup in Pune

रुग्णांना बेड्स देण्यासाठी दोन पुणेकरांनी सुरू केलं स्टार्ट-अप

पुणे : जवळच्या एखाद्या व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यावर पुढील उपचार करण्यासाठी बेड कुठे मिळेल? हा प्रश्न सध्या अनेकांना सतावतो आहे. त्यासाठी कित्तेक फोन करीत रुग्णाला घेऊन अनेक दवाखाने फिरावे लागत असल्याची स्थिती सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. एवढे करूनही बेड उपलब्ध होईलच याची शाश्वती नाही. त्यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची होणारी ही ससेहोलपट थांबविण्यासाठी पुण्यातील दोन उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे. आपण राहात असलेल्या परिसरात किंवा शहरात नेमका कुठे आणि कोणत्या प्रकारचा बेड उपलब्ध आहे याची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केले आहे. त्यावर काही क्षणात बेडची बाबतची रिअल टाईम इन्फॉर्मेशन उपलब्ध होऊ शकते.

30 वर्षीय चिन्मयी डुंबरे आणि त्यांचे सहकारी 38 वर्षीय आरिफ अमिरानी यांनी मिळून हे प्लॅटफॉर्म तयार केले आहे. इंडिया क्रिटिकल रिसोर्स नेटवर्क (ICRN - India Critical Resource Network) असे त्यांच्या स्टार्टअपचे नाव असून त्यांच्या covidpune.com/reach या संकेतस्थळावर बेड बद्दलची सर्व माहिती अगदी सहजपणे उपलब्ध आहे. मार्च अखेरीस सुरू झालेल्या या प्लॅटफॉर्मच्या आत्तापर्यंत 11 लाखाहून अधिक नागरिकांनी वापर केला आहे. केवळ बेडच नाही तर प्लाझ्मा आणि रुग्णवाहिका कोठे उपलब्ध होऊ शकते याची देखील माहिती या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

हेही वाचा: सासू नंतर सुनेचा चारच दिवसात कोरोनामुळे मृत्यू; दौंड तालुक्यातील घटना

या प्लॅटफॉर्मबाबत चिन्मयी यांनी सांगितले की, "सरकारी यंत्रणा देखील अशा पद्धतीची माहिती पुरवत आहे. मात्र ती माहिती अत्यंत क्‍लिष्ट स्वरूपाची असते. त्यामुळे नागरिकांना त्याचा वापर करणे थोडे मुश्कील होते. आम्ही तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवर सर्व माहिती रियल टाईम बेसिसवर असून ती नागरीकांना अगदी सोप्या पद्धतीने हाताळता यावी, याची काळजी आम्ही घेतली आहे. त्यासाठी संकेतस्थळ लोकल भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. केवळ पायाभूत सुविधा उपलब्ध असून चालणार नाहीत तर त्याचा वापर कसा करता येईल, याची माहिती नागरिकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोचविणे आवश्यक आहे. तेच काम आम्ही या प्लॅटफॉर्मद्वारे करीत आहोत.

हेही वाचा: ससूनमधील ३२ व्हेंटिलेटर ‘प्राणहीन’

अशी मिळते बेडची माहिती : 

covidpune.com/reachया संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर त्यावर आपल्याला बेड हवा असलेल्या परिसराचा पिनकोड नंबर नमूद करावा. त्यानंतर वेबसाइटवर असलेल्या विविध फिल्टरच्या माध्यमातून नेमका कशा पद्धतीचा बेड हवा हे नमूद करावे. सर्व माहिती भरल्यानंतर त्वरित बेड कुठे उपलब्ध आहे, याची माहिती संकेतस्थळावर मिळते. त्याच बरोबर बेड उपलब्ध असणाऱ्या हॉस्पिटलचे नाव, पत्ता आणि फोननंबर त्यात असतो. तसेच शहर निहाय प्लाझ्मा व रुग्णवाहिका कुठे उपलब्ध आहेत, याबाबतची माहिती देखील संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

या राज्यात व शहरात उपलब्ध आहे सुविधा : 

राज्य : आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तमिळनाडू, पश्चिमबंगाल, तेलंगणा

शहरे : पुणे, नाशिक, नागपूर, सुरत, दिल्ली, राजकोट, गांधीनगर, बीड, अहमदाबाद, वडोदरा, बंगळुरू

स्वतःला भेडसावलेली समस्या तंत्रज्ञानाचा वापर करून सोडवली :

चिन्मयी यांचे 72 वर्षीय वडिल 'सकाळ साप्ताहिक'चे माजी संपादक सदा डुंबरे यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करून पुढील उपचार करणे गरजेचे होते. मात्र बेड कुठे उपलब्ध आहेत याची पुसटशी देखील कल्पना त्यांना नव्हती. त्यामुळे नातेवाईक-मित्रमंडळी यांना फोन करा, जवळच्या रूग्णालयात जाऊन चौकशी करा, अशी कसरत त्यांना करावी लागली. मुळात अशा प्रसंगी वेळेची खूप कमी असते. त्यामुळे पटापट निर्णय घेतला तरच रुग्णाचा जीव वाचू शकतो. स्वतःला आलेल्या अनुभवातून प्रेरणा घेत या स्टार्टअपची सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे स्टार्टअप माझे वडील आणि त्यांच्यासारख्या हजारो कोरोना रुग्णांना समर्पित असल्याचे चिन्मयी यांनी सांगितले.

हेही वाचा: कोरोनानंतरच्या ‘साइड इफेक्टकडे’ द्या विशेष लक्ष!

स्टार्टअपची व्याप्ती : 

- देशभरातील एकूण 15 लाख वापरकर्ते

- सध्या एका मिनिटाला 300 ते 500 वापरकर्ते

- गेल्या आठवड्यात हीच संख्या दर मिनिटाला 1000 ते 1200 होती

- बेडबाबत चौकशीचे दिवसाला किमान शंभर मेल

- 6 राज्य आणि 11 जिल्ह्यांमध्ये सुरू आहे सेवा

''कोरोना बाधित रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांची उपचारांसाठी सुरू असलेली धावपळ अद्यापही संपलेली नाही. त्यामुळे सर्वांना योग्य उपचार आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेली माहिती पुरवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच इतर अनेक शहरात आम्ही आमचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहोत. त्यातून रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळणे शक्य होईल.विखुरलेली माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. ''

- आरिफ अमिरानी, सह-संस्थापक, आयसीआरएन

Web Title: Bed Information For Corona Patients Provide By Icrn Startup In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top