

बंगालमध्ये भाजपचे सरकार
राष्ट्रवाद्यांचे असेल : अधिकारी
परंपरा-संस्कृतीचे जतन करून व्यवस्था बदलणार
सिलीगुडी, ता. २० (पीटीआय) : ‘‘पश्चिम बंगालमधील भाजपचे सरकार हे राष्ट्रवाद्यांचे असेल. हे सरकार भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे जतन करेल अन् राज्यातील संपूर्ण व्यवस्था बदलण्यासाठी काम करेल,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी केले.
उत्तर बंगालमधील जनतेने भाजपला दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिकारी यांनी मुख्यमंत्री म्हणून या भागाचा पहिला दौरा केला. यावेळी ते म्हणाले, की नवनिर्वाचित सरकार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने ठराविक कालमर्यादेत पूर्ण करेल. हे सरकार जनतेचे आणि राष्ट्रवाद्यांचे असेल. आम्हाला केवळ सत्ताधारी पक्षाला सत्तेतून हटवायचे किंवा राज्याचे नेतृत्व बदलायचे नव्हते तर संपूर्ण व्यवस्था बदलायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिलीगुडी येथील भाजप कार्यालयात बोलताना मुख्यमंत्री अधिकारी म्हणाले, की ‘संकल्पपत्रा’तील घोषणांची अंमलबजावणी सुरू झाली असून सरकार आणि पक्षामध्ये उत्तम समन्वय राहील. नवीन सरकारने ‘अन्नपूर्णा योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत महिलांना मिळणारे मासिक अर्थसाहाय्य १५०० रुपयांवरून ३००० रुपये करण्यात आले आहे. तसेच सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास आणि राज्यात ‘आयुष्मान भारत योजना’ लागू करण्याची घोषणाही त्यांनी केली.
राज्यातील बदललेल्या परिस्थितीत आता तृणमूल काँग्रेसने प्रस्थापित केलेली घराणेशाही, पक्षाची एकाधिकारशाही, ‘सिंडिकेट’, ‘कट मनी संस्कृती’ किंवा ‘माफिया राज’ अस्तित्वात राहणार नाही. तसेच पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही प्रकारच्या देशविरोधी कारवायांना थारा दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारादरम्यान वारंवार या मुद्द्यांचा उल्लेख केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी आणि भारत सेवाश्रम संघाचे संस्थापक स्वामी प्रणवानंद यांची स्वप्ने हे सरकार पूर्ण करेल, असा विश्वास अधिकारी यांनी व्यक्त केला.
‘उत्तर बंगालच्या विकासाकडे विशेष लक्ष’
उत्तर बंगालच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही देऊन अधिकारी यांनी सांगितले, की उत्तर बंगाल विकास मंत्री दर आठवड्याला एक दिवस सिलीगुडी येथील कार्यालयात उपस्थित राहतील, असेही त्यांनी जाहीर केले. शुभेंदू अधिकारी यांचे बागडोगरा विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने उत्तर बंगालमधील ५४ पैकी ४० जागा जिंकून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. २००९ पासून या भागातील जनतेने भाजपला खंबीर साथ दिली असून, या सरकारच्या विकासकामांमध्ये उत्तर बंगालला प्राधान्य दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.