महाविकास आघाडी सरकार लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय; दरेकरांचा घणाघात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 February 2021

महापालिकेत १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. या काळात जेवढे काम झाले नाही तेवढे काम मागील ४ वर्षात भाजपच्या नगरसेवकांनी केले.

कात्रज (पुणे) : राज्य सरकार कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवरून नागरिकांना दिलासा द्यायचे सोडून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. कात्रज परिसरातील सुखसागरनगर, गोकुळनगर, साईनगर येथे नगरसेविका रंजना टिळेकर आणि माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक होते.

पुण्यात उद्यापासून पुन्हा निर्बंध; संचारबंदीची वेळ जाहीर, शाळा-महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय

दरेकर म्हणाले, कोरोनाबाबत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी वेगवेगळी वक्तव्ये करू नये. कुठल्या तरी जुलमी राजवटीसारखी कृती हे राज्यातील सरकार करत आहे. केंद्रातील सरकार नागरिकांची काळज करत आहे. तर राज्यातील सरकार फडणवीस सरकारने आणलेल्या योजनांना स्थगिती देण्यात गुंतले आहे. राज्यातील जनतेला भावनिक आवहनापेक्षा, संवादापेक्षा क्षमतेने कृती करण्याची आवश्यकता आहे. परंतु, या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार कमी पडत आहे.

पुणेकरांना कोरोनाची पर्वाच दिसत नाही; मार्केटयार्डात तुडुंब गर्दी!​

टिळेकर म्हणाले, 'महापालिकेत १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. या काळात जेवढे काम झाले नाही तेवढे काम मागील ४ वर्षात भाजपच्या नगरसेवकांनी केले. कात्रज-कोंढवा रस्ता आम्ही मंजूर केला. परंतु, महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर निधी उपलब्ध करुन दिला नाही. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम संथगतीने चालू आहे. तरी आपण महापालिकेच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत असल्याचे टिळेकर यांनी सांगितले.

यावेळी नगरसेविका, वृषाली कामठे, मनिषा कदम, राणी भोसले, नगरसेवक वीरसेन जगताप, स्वीकृत नगरसेवक तुषार कदम, सतीश मारकड, अनिल येवले, राजाभाऊ कदम, प्रमोद टिळेकर, चेतन टिळेकर आदींसह भाजपचे प्रभाग क्रमांक ४१चे पदाधिकारी उपस्थित होते.

Corona Update: पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा तीन हजारांचा आकडा ओलांडला​

राज्यात भाजप हाच क्रमांक एकचा पक्ष
राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक पक्षाला राज्यात क्रमांक एकचा पक्ष व्हायचे आहे. तशा घोषणा प्रत्येक पक्षाचे नेते करत आहेत. पण, राज्यात सध्या भाजप हा क्रमांक एकचा पक्ष असून ते वेळोवेळी सिद्ध झाले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीत भाजप हाच क्रमांक एकचा पक्ष ठरला असून यापुढे तीनही पक्षांनी एकत्रित ताकद लावली तरी भाजप हाच पक्ष पुढे असेल असे दरेकर म्हणाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Pravin Darekar criticized Mahavikas aghadi govt for increasing no of corona patients