चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांवर पुन्हा निशाणा; पाहा काय म्हणाले!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 July 2020

राज्यात दोन मुख्यमंत्री सध्या कार्यरत आहेत. एक 'मातोश्री'मध्ये बसतात, तर दुसरे राज्यभर फिरतात.

पुणे : राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार अयशस्वी ठरत आहेत, हे त्यांच्याच मंत्रिमंडळातील काही सहकारी दाखविण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.२६) येथे केला. राज्यात दोन मुख्यमंत्री असून एक 'मातोश्री'त बसले आहेत, तर दुसरे राज्यभर फिरत आहेत, अशीही टिप्पणी त्यांनी केली. 

कॅनॉलमध्ये वाहत चाललेल्या 'त्या' मायलेकींच्या मदतीला धावला देवदूत!​

कात्रजमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, अजित पवार हे अयशस्वी ठरत आहेत, असे त्यांचेच सहकारी दाखविण्याच्या प्रयत्नात आहेत, हे त्यांना समजत कसे नाही, याचेच आश्चर्य वाटते. कारण राज्यात दोन मुख्यमंत्री सध्या कार्यरत आहेत. एक 'मातोश्री'मध्ये बसतात, तर दुसरे राज्यभर फिरतात. पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, राज्य सरकारने या शहराला चांगली वागणूक दिलेली नाही, असाही आरोप पाटील यांनी केला. 

पुणे जिल्हा परिषदेने खाजगी हॉस्पिटलशी करार करावा; वळसे-पाटील यांनी का केली मागणी?​

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीबाबत विचारणा केली असता, चार महिन्यांनी ठाकरे यांनी पत्रकारांना तोंड दाखविले अन् तेही सामनाच्याच... अन्य दूरचित्रवाणी वाहिन्यांना ते मुलाखत का देत नाहीत, कारण तेथे संजय राऊत यांच्यासारखे स्तुतिपाठक नाहीत. त्यामुळे ते त्यांनाच मुलाखत देतात. हे सरकार टिकणार, असे ठाकरे यांना वारंवार सांगावे लागत आहेत. एकिकडे अशोक चव्हाण नाराज होतात आणि दुसऱ्या दिवशीच नाराजी गेली, असे म्हणतात. त्यामुळे हे सरकार टिकेल का, असाच प्रश्न आहे. त्यामुळेच ते अधिकाऱ्यांच्या बदल्या करीत नाहीत, असेही पाटील यांनी म्हटले. सातवीचा मुलगाही राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत निबंध लिहू शकतो, असाही दावा त्यांनी केला. 

'कारगिल विजय दिवस' लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्यावतीने साजरा​

पंकजा मुंडेंना केंद्रात मिळणार जबाबदारी

पंकजा मुंडे यांना केंद्रात चांगली जबाबदारी द्यावी, असे देवेंद्र फडणवीस आणि मी सांगितले आहे, याचा पुनरूच्चार पाटील यांनी केला. विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी उपस्थित राहायचे नाही, हा आदेश भाजप सरकारनेच काढला होता, असे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले असता, आम्ही तो रद्दही केला होता, असे त्यांनी सांगितले. नवा आदेश या सरकारने काढला आहे. ते आमच्या बैठकांवर मर्यादा आणू शकतील, पण प्रवासावर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात कोरोनाचे संकट वाढत असताना, अजित पवारांनी विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनाही बैठकांना बोलवावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP state President Chandrakant Patil again criticized Deputy CM Ajit Pawar about Pune Corona