Video : पुण्यातील कोरोनास्थितीबाबत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडले गाऱ्हाणे; केल्या 'या' मागण्या

Chandrakant_Patil
Chandrakant_Patil

पुणे : कोरोनाबाधितांवरील उपचार सुविधा केंद्रांचे विक्रेंदीकरण करावे, खासगी हॉस्पिटलला राज्य सरकारने पीपीई किट, मास्क आणि औषधे उपलब्ध करून द्यावीत, तसेच शहरात तीन जम्बो हॉस्पिटल उभारण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी विचारात घेऊन तोपर्यंत ऑक्‍सिजन बेडस्‌ आणि व्हेटिंलेटर उपलब्ध करून द्यावेत, अशा विविध मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी (ता.३०) दिली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, "पुणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा वाढविण्याची गरज आहे. ऑक्‍सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेले बेड ही आगामी काळाची मोठी गरज आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण सापडल्यानंतर रुग्णांना बेड मिळायला पाहिजे, त्यांना सुविधा मिळायला पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उपचार सुविधा निर्माण केल्या पाहिजेत.

जम्बो हॉस्पिटलसाठी महापालिकेला द्यावा लागणाऱ्या हिस्स्याच्या निधीबाबत विचारले असता पाटील म्हणाले, "पुणे महापालिकेने मागील साडे तीन महिन्यात कोरोनासाठी सुमारे ३०० कोटी खर्च केले आहेत. या तुलनेत राज्य सरकारकडून अगदी नगन्य रक्कम आली आहे. कोरोनामुळे महसूल कमी झाला आहे, जम्बो हॉस्पिटलसाठी महापालिकेचा हिस्सा हा सुमारे ७५ कोटी रुपयांचा आहे. महापालिका तो निधी देण्यास तयार आहे. परंतु शासनाने महापालिकेचा काही हिस्सा उचलावा, एवढीच आमची मागणी आहे. मात्र जम्बो हॉस्पिटल झाले पाहिजेत.'' 

शरीरामध्ये ऍन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत का नाही, याची तपासणी करण्याची सुविधा फक्त दिल्ली आणि मुंबईमध्ये आहे. त्यामुळे ही सुविधा पुण्यातही उपलब्ध करून देण्यात यावी. जेणेकरून नागरिकांना कळेल आपल्या शरीरात ऍन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत का नाही. यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असेही पाटील यांनी सांगितले. 

खासगी हॉस्पीटलला मोफत किट आणि मास्क द्या 
पीपीई कीट, मास्क, औषधे, इंजेक्शन हे वापरण्याच्या वस्तू शासनाने खासगी आणि सरकारी अशा दोन्ही रुग्णालयांना द्यावी. त्या रुग्णालयांनी फक्त बेडचे चार्जेस, डॉक्‍टरांची फी आणि पॅरामेडिकल चार्जेस आदींचेच बिल आकारावे. पीपीई किटची किंमत काही रुग्णालये १३०० रुपये लावत आहेत. धारावीमध्ये याची किंमत १५० रुपये आहे. ज्या रुग्णालयांना ज्या ब्रॅन्डचे पीपीई किट हवे असेल ते पुरविण्यात येईल. १० पाहिजे असतील, तर १२ पीपीई किट पुरविण्यात येईल. यामुळे खासगी रुग्णालयांनासुध्दा परवडेल आणि रुग्णांना येणारे बील सुध्दा कमी येईल. या पार्श्‍वभूमीवर कंन्झुमेबल वस्तूंचे चार्जेस रुग्णालयांनी लावता कामा नये, अशी लेखी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

सध्या कुठलाही प्रस्ताव नाही 
शिवसेनेसोबत जाण्याची तयारी असल्याचे वक्तव्य यापूर्वी पाटील यांनी केले होते. त्यावर विचारले असता, ते म्हणाले, "माझे वाक्‍य उलटे केले गेले. जर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार आले. येईल का हे माहिती नाही. परंतु जरी ते आले, तरी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. देव्रेंद फडणवीस यांनी जो खुलासा केला आहे. तेच माझे म्हणणे आहे. सध्या कुठलाही प्रस्ताव नाही.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com