कृत्रिम बुद्धिमतेच्या मदतीने होणार कोरोनाचं झटपट निदान; पुणे विद्यापीठाने घेतला पुढाकार!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

या तंत्रज्ञानामुळे कोविडची चाचणी कमी खर्चात, कमी वेळेत होऊ शकेल आणि जास्तीत जास्त लोकांची चाचणी आपल्याला करता येईल.

पुणे : कोरोनाशी लढण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध उपक्रमांद्वारे काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविडचे निदान कमी खर्चात आणि कमी वेळेत करता यावे, यासाठी स्टार्टअपशी करार केला आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटीलिजन्स) च्या मदतीने एक्स-रे, सिटी स्कॅनद्वारे कोविडचे निदान करण्याऱ्या दीपटेक मेडिकल इमॅजिंग प्रा. लि. या स्टार्टअप कंपनीसोबत पुणे विद्यापीठ जोडले गेले आहे. 

योग विद्येच्या शिक्षणाकरिता बारामतीत मिळणार ही सुविधा​

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर दीपटेक मेडिकल इमॅजिंग प्रा. लि चे सहसंस्थापक अजित पाटील यांनी 'लेटर फॉर इंटेंट'वर स्वाक्षरी केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, डॉ. सुरेश गोसावी, डॉ. अरविंद शाळीग्राम, दीपटेक मेडिकल इमॅजिंग प्रा. लि. चे सहसंस्थापक अनिरुद्ध पंत आणि डॉ. अमित खरात उपस्थित होते. 

डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एक्स-रे, सिटी स्कॅनद्वारे कोविडचे निदान कमी खर्चात आणि कमी वेळेत करणारे तंत्रज्ञान तयार करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे कोविडची चाचणी कमी खर्चात, कमी वेळेत होऊ शकेल आणि जास्तीत जास्त लोकांची चाचणी आपल्याला करता येईल.

लोकमान्यांच्या शंभर वर्षांपूर्वीच्या पुतळ्याला राजमान्यतेची प्रतिक्षा...​

हे तंत्रज्ञान सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेसच्या माध्यमातून पुणे शहरातील हॉस्पिटल्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न आम्ही करणार असून यामध्ये जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर आमचा भर असणार आहे. पुढील एक ते दीड महिन्यात या तंत्रज्ञानाचा प्रयोग आम्ही पाच हजार रुग्णांवर करणार आहोत. त्यानंतर आम्ही या तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या तंत्रज्ञानाचा वापर करून समाजासाठी खूप उपयोग होऊ शकेल. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने चेन्नई शहरात एक लाख रुग्णांची क्षयरोगाची चाचणी यशस्वीरीत्या केली आहे. 

२८९२ कोटींच्या कर्जापायी अनिल अंबानींनी गमावले मुख्यालय; येस बँकेने केली कारवाई​

पुणे शहरात कोविड वर उपचार सुरु असणाऱ्या सर्व रुग्णालयांनी कमी खर्चात आणि कमी वेळेत कोरोनाचे निदान करणाऱ्या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा. समाजाच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या अशा उपक्रमात आम्हाला सहकार्य करावे. 
- डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका, इनक्यूबेशन सेंटर, पुणे विद्यापीठ

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University has signed agreement with a startup for diagnosed Covid 19