संप्रदायांमुळेच आपली संस्कृती समृद्ध

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

‘एखाद्या विषयाला जास्त स्पष्ट करण्यासाठी, समाजाला नीतिमान करण्यासाठी आणि सत्याविषयी चर्चा व्हावी म्हणन संप्रदाय निर्माण होतात. आपली संस्कृती या संप्रदायांमुळे समृद्ध झाली.

पुणे - ‘एखाद्या विषयाला जास्त स्पष्ट करण्यासाठी, समाजाला नीतिमान करण्यासाठी आणि सत्याविषयी चर्चा व्हावी म्हणन संप्रदाय निर्माण होतात. आपली संस्कृती या संप्रदायांमुळे समृद्ध झाली. नाथ संप्रदायाचा सर्व संप्रदायांवर थोडा फार प्रभाव आहे,’ असे मत डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले. 

‘नाथ संप्रदायाचा इतिहास व परंपरा’ हे वा. ल. मंजूळ लिखित व ‘सकाळ प्रकाशन’च्या या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. देगलूरकर आणि आळंदी देवस्थानचे विश्‍वस्त अभय टिळक यांच्या हस्ते झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्ञानराज औसेकर महाराज, ‘सकाळ’ प्रकाशनचे प्रमुख आशुतोष रामगीर आणि संपादक ऐश्वर्या कुमठेकर उपस्थित होते. ‘नाथ संप्रदायाचा महाराष्ट्रावरील प्रभाव’ या विषयावर डॉ. देगलूरकर बोलत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘‘या पुस्तकाद्वारे डॉ. मंजूळ यांनी अवघड विषय सोप्या भाषेत मांडला आहे. देशात अनेक संप्रदाय निर्माण झाले. ते एकमेकांच्या विरोधात नाहीत. नाथ संप्रदायाचा राज्याशी संबंध आल्यानंतर त्याचा येथे देखील मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. राज्यातील काही धार्मिक स्थळांचा विचार केला असता त्याची व्याप्ती स्पष्ट होते. नाथ संप्रदायाच्या उदयाचा विचार केला असता देशातील अनेक भागांतील लोक त्याचा उगम आमच्याकडेच झाला, असा दावा करतात. कारण तो इतका आपलासा आहे.’

सिंहगड परिसर सुन्न:दोन वर्षांच्या चिमुरडीची अत्याचार करून हत्या, नराधमाला रायगड जिल्ह्यातून अटक

मंजुळ म्हणाले, ‘‘ ज्ञानेश्‍वर माऊलींमुळे भक्ती आणि नाथ संप्रदायाचा आळंदीत संगम झाला. या सह अनेक मुद्दे लक्षात आल्यानंतर त्यावर काहीतरी लिहले पाहिजे, याचा विचार डोक्यात होता. काही वर्षांपूर्वी मी ‘सकाळ’मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत होतो. या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा ‘सकाळ’ शी नाळ जोडली गेली याचा आनंद आहे.’’ 

'राज्यपालांचा मी लाडका मंत्री, पण वाद सोडवू शकत नाही'

‘नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय’ यांच्यातील संबंधावर टिळक म्हणाले, ‘‘आपल्याकडे इतिहासाबद्दल अत्यंत भावुक उमाळा आहे. पण त्याचा अभ्यास करण्यासाठी जी चिकाटी लागते व त्याला जोड असलेले संस्थात्मक आणि आर्थिक पाठबळ लागते ते आपल्याकडे मिळत नाही. नाथ संप्रदाय हा राज्याचे सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक संचित आहे. त्याचा अधिक सखोल अभ्यास व्हायला हवा.’’

या संदर्भ पुस्तकाची किंमत २८० रुपये असून ते ‘सकाळ’ पुस्तक दालन तसेच राज्यातील प्रमुख विकेत्यांकडे उपलब्ध आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: book publish Sects enrich our culture dr gb deglurkar