esakal | ‘दी मराठा सेंच्युरी’ पुस्तक इतिहासप्रेमी व अभ्यासकांसाठी उपलब्ध
sakal

बोलून बातमी शोधा

‘दी मराठा सेंच्युरी’ पुस्तक

‘दी मराठा सेंच्युरी’ पुस्तक इतिहासप्रेमी व अभ्यासकांसाठी उपलब्ध

sakal_logo
By
गणाधीश प्रभुदेसाई

पुणे: ‘‘देवघराकडुन दादाकडे गेले. जाऊन पोटात डोई घातली. म्हणो लागले की मजला वांचवावे. तो दादास करुणा आली. गाडद्यास म्हणु लागले कीं लेकरास मारु नका. तो सुमेरसींगाने उत्तर दील्हे, तुम्ही वेडे आहात की यांस वाचवीतात.’’...हे वर्णन आहे इतिहासातील प्रसिद्ध ‘ध चा मा’ या प्रसंगाचे. असे अनेक प्रसंग, त्यासंबंधीची पत्रे, चित्रे व मुद्देसूद माहिती मिळू शकते ‘दी मराठा सेंच्युरी’ या पुस्तकातून.

हेही वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट

पेशाने डॉक्टर असलेले व नौदलातून सर्जन कमांडर म्हणून निवृत्त झालेले डॉ. उदय कुलकर्णी यांचे ‘दी मराठा सेंच्युरी’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक इतिहासप्रेमी व अभ्यासकांसाठी उपलब्ध झाले आहे. इतिहासावर आधारित आत्तापर्यंतचे हे त्यांचे आठवे पुस्तक आहे. मराठ्यांच्या १०० वर्षांच्या कालखंडातील महत्त्वाच्या घडोमोडींचा या पुस्तकात उल्लेख आहे. १६४६ ते १८२९ या दरम्यान घडलेल्या ऐतिहासिक घडामोडींपैकी काही महत्त्वाच्या घटना सारांशाने या पुस्तकात मांडल्या आहेत. ‘तीन ते चार वर्षांपासून यावर त्यांचे काम सुरू होते.

गेल्या चार महिन्यांत १४ नवीन लेख लिहून मांडणी केली. ६८ कृष्णधवल व १६ रंगीत छायाचित्रांचा या पुस्तकात समावेश आहे. यातील काही चित्रे दुर्मीळ व पहिल्यांदाच प्रकाशात आली आहेत. त्या काळातील काशी यात्रा, खेळ, लग्नाची तयारी असे काही उत्सुकता वाढविणारे विषय यात आहेत. पुण्याबद्दल चार अध्याय या पुस्तकात आहेत,’ अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

हेही वाचा: किरीट सोमय्यांचा सांगली दौरा;पाहा व्हिडिओ

लग्न समारंभाची तयारी

लग्नाची तयारी कशी असते हे सर्वांना माहीत आहे. पण सवाई माधवराव पेशवे यांच्या लग्नाची तयारीचे वर्णन वाचण्यासारखे आहे. त्या काळात किती बारीक-सारीक गोष्टींचा विचार केला जात होता, हे आपल्याला समजून येते. येणारे पाहुणे, त्यातील खास व अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, त्यांची राहण्याचीच नव्हे तर अंघोळीपासून कपाळाला लावणारे गंध, ते कपड्यांवर सांडू नये यासाठी घेण्यात आलेली विशेष काळजी, पिण्याचे गरम व थंड पाणी, भाताचे प्रकार, गोडधोड, कोशिंबिरी, लोणचे आदी सर्व गोष्टीचे कसे नियोजन होते, हे या पुस्तकातून समजते.

हेही वाचा: पुणे : जिल्ह्यात येत्या बुधवारी मंडळस्तरावर फेरफार अदालती

मराठा नौदलाची उभारणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या नौदलाची सविस्तर माहिती यात दिलेली आहे. २० जहाजांपासून ८० जहाजांपर्यंतचा प्रवास, त्यासाठी कारागीर कुठून आणले, भंडारी आणि कोळी समाजाची कशी मदत घेतली हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. पहिली २० जहाजे बांधण्यासाठी व्हिएगस नावाचे पोर्तुगीज पिता-पुत्र यांना महाराजांनी काम दिले. त्यांच्याबरोबर सुमारे ३०० पोर्तुगीज कामगार आणले. मात्र, काही काळानंतर पोर्तुगीज सरकारने त्यांना काम सोडून परत आपापल्या ठिकाणी परतण्याचे फर्मान सोडले. पण तोपर्यंत भंडारी व कोळी समाजातील लोकांनी जहाजबांधणीचे कसब शिकून घेतले होते. पुस्तकातील हा भाग त्याकाळात नौदल उभारणी नेमकी कशी झाली याबाबत मार्गदर्शन करते.

इतर महत्त्वाचे विषय...

  • नवकोट नाना

  • स्वराज्याच्या लढाईची २५ वर्षे

  • पेशवेकालीन पाणीपुरवठा

  • रामशास्त्री

  • १८व्या शतकातील काशीयात्रा

  • गंगाधर शास्त्री यांचा खून

हेही वाचा: कर्जाला कंटाळून मुलीचा खून ; आई-वडिलांची आत्महत्या

"मराठ्यांचा इतिहास तसा उपेक्षित राहिला आहे. पण जोपर्यंत तुम्हाला मराठ्यांचा इतिहास समजणार नाही, तोपर्यंत भारताचा इतिहास समजूच शकणार नाही. माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीवर आगामी पुस्तकाचे काम सुरू आहे. या ५०० पानी पुस्तकात सखोल माहिती देण्याचा प्रयत्न राहील."

- डॉ. उदय कुलकर्णी, लेखक

loading image
go to top