Video : सीएए व एनआरसीची काळा कायदा म्हणून नोंद होईल : ऊर्मिला मातोंडकर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

महात्मा गांधी यांनी सर्वांवर प्रेम करायला शिकवले आहे. मात्र त्यांचे हे विचार आजही काही लोकांना भावत नाहीत. आपला कायदा हा जात, धर्म, भाषा, प्रदेशावर नागरिकत्व ठरविणारा नाही. त्यामुळे सीएए व एनआरसीची नोंद काळा कायदा म्हणून होईल,'' असे मत अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

पुणे : "महात्मा गांधी यांनी सर्वांवर प्रेम करायला शिकवले आहे. मात्र त्यांचे हे विचार आजही काही लोकांना भावत नाहीत. आपला कायदा हा जात, धर्म, भाषा, प्रदेशावर नागरिकत्व ठरविणारा नाही. त्यामुळे सीएए व एनआरसीची नोंद काळा कायदा म्हणून होईल,'' असे मत अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन' या विषयावर महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात मातोंडकर बोलत होत्या. सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड, बिशप थॉमस डाबरे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. ऊर्मिला सप्तर्षी, कॉंग्रेसच माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यावेळी उपस्थित होते. "सत्याग्रही' मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन, तर "एनआरसी' या शेखर सोनाळकर लिखित पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

भारतात कोरोना विषाणूचा पहिला बळी; केरळमध्ये आढळला रुग्ण

मातोंडकर म्हणाल्या, "15 टक्के मुस्लिम समाजाचे भय 85 टक्के हिंदूंना दाखवले जात आहे. त्या माध्यमातून हिंदूंवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीएए हा रौलेट कायद्यासारखा काळा कायदा आहे. हा कायदा केवळ मुस्लिम नाही तर गरिबांच्या विरोधात आहे. नागरिक म्हणजे देश आहे. केवळ संसद नाही.''

खरंच, पाकिस्तानातील गैरमुस्लिमांची संख्या २३% वरुन ३.७%वर घसरली का?

सेटलवाड म्हणाल्या, "नागरिकत्व सुधारणा कायदा जाती-धर्मात रेषा निर्माण करणार आहे. जगात कुठेही नागरिकांना कागदपत्रांच्या आधारे पारखले जात नाही. कागदपत्रांच्या आडून जमिनी हडप करून त्या उद्योगपतींना देण्याचा कट सीएए, एनआरसी, एनपीआर आणण्यामागे आहे. सरकार चालवता येत नाही, रोजगार निर्माण करता आला नाही. तसेच अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिम वाद करण्यात येत आहे.'' बिशप डाबरे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. निधीच्या शांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

तर पुन्हा निवडणूक होऊ द्या
"सरकार नागरिकांना आरोपीच्या पिंज-यात उभे करणार असेल तर पुन्हा निवडणूक होऊ द्या. जनतेचा अपमान करू नये, हे राज्यकर्त्यांना ठासून सांगण्याची वेळ आली आहे. मायभुमी काढून घेत ती सरकार त्यांच्या मालकांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यांना अक्कल नसते ते नक्कल करतात. या कायद्यामुळे 40 कोटी लोक देशोधडीला लागतील, असे डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले.

घोषणाबाजी करणारे ताब्यात
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ गांधी भवन बाहेर आंदोलन करणा-या हिंदू राष्ट्र सेनेच्या 30 ते 35 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सभेच्या पार्श्‍वभूमीवर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAA and NRC will be listed as black law says Urmila Matondkar