पोलिस भरती नियमांच्या फेरबदलाबाबत 'मॅट' उत्तर देणार?

Maharashtra-Police
Maharashtra-Police

पुणे : राज्याच्या गृहमंत्रालयाने पोलिस भरती प्रक्रियेच्या नियमांमध्ये केलेल्या फेरबदलाबाबत दोन उमेदवारांनी औरंगाबादच्या महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणामध्ये (मॅट) याचिका दाखल केली आहे. त्यानुसार, 'मॅट'ने राज्य सरकारला 30 दिवसांमध्ये याबाबतचे उत्तर देण्याचा आदेश दिला आहे. 

पोलिस भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र कॉन्स्टेबल नियम 2011 अस्तित्वात आहे. त्याप्रमाणे राज्यातील पोलिस भरती प्रक्रिया राबविली जात असे. संबंधित नियमामध्ये अगोदर 100 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जात असे. त्यामध्ये 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविले जात होते. मात्र, राज्य सरकारने 18 जानेवारी 2019 व 4 जुलै 2019 या दिवशी शासन निर्णय दिला.

त्यानुसार, पूर्वीच्या नियमांमध्ये बदल करीत लेखी परीक्षेसाठी 100 गुण ठेवले. तसेच, ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे जाहीर केले. याबरोबरच शारीरिक चाचणी केवळ 50 गुणांसाठी केली. राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत राज्यातील हजारो उमेदवारांनी तीव्र विरोध दर्शविला होता. 

या पार्श्‍वभूमीवर त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या भीमराव शिरसीपुरक आणि ज्योती सानी यांनी औरंगाबादच्या 'मॅट'मध्ये याचिका दाखल केली होती. त्यांच्यावतीने ऍड. श्रीकांत ठाकूर आणि ऍड. मुकुलानंद वाघ यांनी 'मॅट'मध्ये बाजू मांडली. 

कशावर घेतला आक्षेप? 

पोलिस उपनिरीक्षक, सीआरपीएफ, एसआरपीएफ व अन्य सर्व भरती प्रक्रियेसाठी शारीरिक चाचणी 100 गुणांची घेतली जाते. मात्र, पोलिस शिपाई या पदाची शारीरिक चाचणी 50 गुणांसाठी करून कोणत्याही प्रकारचे पात्रता निकष ठेवले नसल्याबद्दल याचिकाकर्त्यांनी आक्षेप नोंदविला होता. संबंधित निर्णय हा महापोर्टलच्या फायद्यासाठी घेतला असून, त्यामुळे लाखो उमेदवारांवर अन्याय होणार असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, 'मॅट'ने त्यांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर राज्य सरकारला 30 दिवसांच्या आत याबाबत उत्तर देण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 18 डिसेंबर 2019 रोजी घेतली जाणार आहे. तसेच, पोलिस भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच 100 गुणांची शारीरिक चाचणी व त्यास 40 गुणांचे पात्रता निकष ठेवण्याची मागणी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com