मुलाच्या लग्नातील पाहुणचार धनंजय महाडिकांना महागात; तिघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 February 2021

कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्यावर्षी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पुणे : मुलाच्या रिसेप्शनमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते धनंजय महाडीक यांच्यासह तीन जणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महाडिक यांचा मुलाचा रविवारी (ता.21) रात्री हडपसर परिसरातील लक्ष्मी लॉन्समध्ये शाही रिसेप्शन सोहळा पार पडला होता. त्यात कोरोना विषय नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे धनंजय महाडीक, लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि लॉन्सचे व्यवस्थापक निरूपल केदार यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.

पुणे : साखरपुड्यात राडा; जेवणावरून झालेला वाद तिघांच्या जीवावर बेतला​

भादवि कलम 188, 269, 271 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 आणि महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना 2020 चे कलम 11 अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरात लक्ष्मी लॉन्स आहे. त्यात रविवारी रात्री धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नाचा रिसेप् सोहळा पार पडला. या कार्यक्रमास सुमारे एक हजार नागरिक उपस्थित होते. कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या आदेशाचे पालन न करता गर्दी जमवून सामाजिक अंतराचे देखील पालन केले नाही.

पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा​

लग्न सोहळ्यासारख्या कार्यक्रमांना ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बोलावून झालेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, याची जाणीव असूनही त्यांनी अशा प्रकारे गर्दी जमवल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिसेप्शनमध्ये आलेल्या मंडळींपैकी अनेकांनी मास्क घातले नव्हते. त्याचे चित्र या ठिकाणी पहिला मिळाले. तसेच सोशल डिस्टंसिंगचा देखील फज्जा उडाला होता. या सोहळ्यास राज्यातील सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली होती. 

अल्पवयीन पीडितेसह आई झाली फितूर, तरीही बलात्कारी बापाला शिक्षा​

नियम कडक केल्यानंतर पहिलाच गुन्हा :
कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्यावर्षी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाचा आकडा कमी झाल्याने कारवाई थंडावली होती. मात्र पुन्हा रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने नियम कडक केल्यानंतर रिसेप्शनबाबत दाखल करण्यात आलेला हा पहिलाच गुन्हा आहे. थेट माजी खासदारावरच कारवाई झाल्याने यापुढील काळात लग्न, रिसेप्शन किंवा पूजा असे कार्यक्रम असलेल्यांचे धाबे दणाणले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case filed against BJP leader Dhananjay Mahadik for violating corona rules at reception