

लांबच्या प्रवासामुळे विद्यार्थी हैराण
‘सीईटी’चे केंद्र लांब ः कडक उन्हात पालकांचीही ओढाताण
सकाळ वृत्तसेवा
श्रीरामपूर, ता. १४ : राज्यात सध्या सुरू असलेल्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) नियोजनाचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत आहे. आपल्याच शहरात किंवा गावात परीक्षा केंद्रांची सुविधा उपलब्ध असतानाही, विद्यार्थ्यांना १०० ते २५० किलोमीटर अंतरावरील केंद्रांचे वाटप केल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सध्या राज्यात उष्णतेची लाट असून, पारा ४० पार गेला आहे. अशा कडक उन्हात लांबचा प्रवास करणे विद्यार्थ्यांसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना बसच्या मर्यादित सोयींमुळे खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. काही ठिकाणी बसची सुविधा नसल्याने पालक आपल्या पाल्यांना दुचाकीवरून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून परीक्षा केंद्रावर नेत आहेत. पहाटेच घराबाहेर पडावे लागत असल्याने विद्यार्थ्यांची मोठी धावपळ होते. त्याचा थेट परिणाम त्यांच्या परीक्षेतील कामगिरीवर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, श्रीरामपूर परिसरात महाविद्यालये आणि पुरेशी तांत्रिक क्षमता असलेली परीक्षा केंद्रे उपलब्ध आहेत. असे असतानाही येथील विद्यार्थ्यांना काष्टी, बोटा किंवा थेट दुसऱ्या जिल्ह्यातील केंद्रे देण्यात आली. या गोंधळामुळे प्रवासाचा खर्च, वेळ आणि मानसिक ताण वाढला असून, प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्रवास खर्च आणि परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी करावी लागणारी धावपळ यामुळे पालकांना आर्थिक फटका सोसावा लागतो. पाल्यासोबत राहण्यासाठी पालकांना आपला संपूर्ण दिवस कामातून सुटी घेऊन खर्च करावा लागतो. जवळ केंद्र मिळाले, तर विद्यार्थ्यांचा वेळ वाचला असता आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करता आले असते, अशी भावना पालकांनी व्यक्त केली.
----------
विद्यार्थ्यांसाठी ‘सीईटी’ परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते; मात्र परीक्षा केंद्र दूर मिळाल्यामुळे प्रवासाचा ताण अधिक जाणवत आहे. जवळच्या भागात केंद्रे उपलब्ध असतानाही दूरच्या ठिकाणी केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
-यश पवार, विद्यार्थी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.