अवैध धंद्यांवरील कारवाईत ताडी व गावठी दारू जप्त; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

निलेश बोरुडे
Thursday, 21 January 2021

हवेली पोलिस ठाण्याकडे नांदेड,किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी व इतर गावांतील अनेक अवैध व्यावसायिकांची यादी असताना व इतरही अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असताना केवळ तीनच अवैध व्यावसायिकांवर कारवाई करुन इतरांना मोकाट का सोडण्यात येत आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

किरकटवाडी(पुणे) : पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या 'काही' अवैध धंद्यांवर  कारवाई करत हवेली पोलिसांनी 23 लिटर गावठी दारू व 8 लिटर ताडी जप्त केली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मीबाई बापू राठोड ( वय 50 वर्षे, रा.लमाणवस्ती, खडकवासला,ता.हवेली.), संतोष दत्तात्रय पायगुडे( वय 36 वर्षे, रा.गोळेवाडी, डोणजे ता. हवेली) आणि अनिल भिमराव दुपारगुडे (वय 30 वर्षे,रा. जे.पी.नगर, नांदेड,ता.हवेली.) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अवैध व्यावसायिकांची नावे आहेत.

हेही वाचा - जो बायडन यांचं मंत्रिमंडळ 'डन'; असं झालंय खातेवाटप 

हवेली पोलिस ठाण्याकडे नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी व इतर गावांतील अनेक अवैध व्यावसायिकांची यादी असताना व इतरही अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असताना केवळ तीनच अवैध व्यावसायिकांवर कारवाई करुन इतरांना मोकाट का सोडण्यात येत आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

 अर्जावरुन कारवाई
अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असून त्यावर कारवाई करण्यात यावी असा अर्ज एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने  हवेली पोलिस ठाण्यात दिला होता.त्या अर्जावरुन सदर कारवाई करण्यात आली अशी माहिती मिळत आहे, परंतु सर्व अवैध धंद्यांवर कारवाई न करता 'जवळचे' टाळून कारवाई करण्यात आली असे चित्र दिसून येत आहे. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास बाबर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश धनवे, राजेंद्र मुंढे, दिलीप गायकवाड यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा - माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नवे निवासस्थान समुद्रकिनारी; 1100 कोटी डॉलर्स किंमत
 

 ताडी व गावठी दारू येते कोठून?
यापुर्वीही अनेक वेळा हवेली पोलिसांनी कारवाई करुन ताडी व गावठी दारू जप्त केलेली आहे मात्र कारवाई नंतर काही दिवसांनी पुन्हा हे अवैध व्यवसाय सुरू होतात. त्यामुळे ताडी व गावठी दारू तयार करण्याची ठिकाणं शोधून त्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.

ताडीच्या नावाखाली विकले जातेय जीवघेणे रसायण
परिसरामध्ये विकली जाणारी ताडी ही नैसर्गिक झाडापासून नव्हे तर रासायनिक पावडर पासून तयार करण्यात येते, तसेच ही रासायनिक ताडी आरोग्यास अत्यंत हानिकारक असताना त्यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.या बनावट ताडीमध्ये क्लोरल हायड्रेट, सॅक्रीन आणि पांढरा रंग येण्यासाठी पावडर वापरली जाते.

भारत-अमेरिका मैत्रीचं नवं पर्व; PM मोदींचा US राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना खास संदेश!​

"अवैध व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जशी माहीती मिळेल त्याप्रमाणे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. कोणत्याही अवैध व्यावसायिकाची गय केली जाणार नाही." -सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charges were filed against the three for on illegal trade of taadi and liquor