पुणेकरांनो, मुळशीत येताय? पोलिसांकडून होईल कडक स्वागत...

धोंडिबा कुंभार
शनिवार, 4 जुलै 2020

पौड पोलिसांनी आज मुळशी तालुक्यात येणाऱ्यांची कडक तपासणी व चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी भूगाव, घोटावडे फाटा व पौड आदी तीन ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे.

पिरंगुट (पुणे) : पर्यटकांनो, मुळशीत येताय...तर सावधान...पौड पोलिसांनी आता कडक कारवाईचा बडगा उचलला आहे. आज पौड पोलिसांकडून तालुक्यात तीन ठिकाणी नाकाबंदी सुरू केली असून, कारवाईला सुरवात केली.  त्यामुळे शहरातून तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांना चाप बसायला लागला आहे. 

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

पौड पोलिसांनी आज मुळशी तालुक्यात येणाऱ्यांची कडक तपासणी व चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी भूगाव, घोटावडे फाटा व पौड आदी तीन ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत चालल्याने पौड पोलिसांनीच आता कडक पावले उचलली आहेत. लॅाकडाउनचे उल्लंघन करणारांवर आणि मोकाट फिरणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. तोंडाला मास्क न लावणे, विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणे, गर्दी करणे, सोशल डिस्टन्स न पाळणे आदी वर्तनांबद्दल आता थेट गुन्हे दाखल करायला सुरवात केली आहे. आज सकाळी या कारवाईला सुरवात झाली. पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल लवटे , रेखा दुधभाते, श्रीकांत जाधव आणि पोलिस कर्मचारी या कारवाईसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

कोंढापुरीत पर्यावराणासाठी झटताहेत ग्रामस्थ
 
मुळशी तालुक्यात सध्या पावसाळ्यानिमित्त पर्यटकांचा ओढा वाढला आहे.  आज शनिवार व उद्या रविवारचा दिवस असल्याने तालुक्यात शहरातून पर्यटक येतील, हे गृहीत धरून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भूगाव , घोटावडे फाटा व पौड आदी तीन ठिकाणी तपासणी नाकी सुरू केली आहेत. या तपासणी नाक्यांवर वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. मास्क न वापरणारे आणि लॅाकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे.

कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचे एेकूनच आला हार्ट अॅटॅक
 

मुळशी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे संचारबंदी प्रभावी राबविण्यासाठी भूगाव , घोटावडे फाटा व पौड येथे नाकाबंदी सुरू केली आहे. कोळवण, मुळशी, घोटावडे, पिरंगुट, मुठा, लवासा, ताम्हिणी आदी भागात 
रात्रंदिवस गस्त सुरू केलेली आहे. सूचना देऊनही अनावश्यकरित्या वाहने घेऊन रस्त्यावर फिरताना आढळतात. अनेकजण मास्क न घालता फिरतात. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे काम चालू आहे. कोरोना थांबविण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असून, प्रत्येकाने स्वयंशिस्त राखली पाहिजे.  
 - अशोक धुमाळ
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पौड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Check posts at three places by police in Mulshi taluka