साहेब, तेवढा मच्छरांचा बंदोबस्त करा...

Alandi
Alandi

आळंदी (पुणे) : आरोग्य सुविधा प्रभावी नसल्याने आळंदीत मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढत्या मच्छरांमुळे शहरात डेंगी, चिकुनगुणिया सदृश्य तापांचा उद्रेक झाला. पालिका प्रशासन स्वच्छता रोजच्या रोज केल्याचे सांगते. नागरिक मात्र, आमच्याकडे पावडर, जंतूनाशक फवारणी आणि फॉगिंग आलीच नाही, असे सांगतात. लॉकाडाउनमुळे कामधंदा बंद झाल्याने हातात पैसा नाही. परिणामी मच्छरांमुळे आजार बळावल्यावरच खर्च कोण करणार, असा सवाल करत, साहेब, तेवढा मच्छरांचा बंदोबस्त करा, अशी मागणी आता आळंदीकर करत आहेत.

आळंदीत गेल्या महिनाभरात चिकुणगुणिया, डेंगी आणि कॉलराने नागरिक बाधित आहे. सुरूवात देहूफाटा येथून झाली. आता भराव रस्ता, मरकळ रस्ता, गोपाळपुरा, भागिरथी नाला परिसरात नागरिकांना अंगदुखी, ताप यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना डेंगी, चिकुणगुणिया पॉझिटिव्ह रिपोर्टही आले. कोरोनाबरोबर डेंगी, चिकुणगुणियासदृश्य तापाच्या आजारांनीही आळंदीत ठाण मांडले आहे. मच्छर चावल्यामुळे ताप आल्यावर रूग्णालयात कोविड तपासणी केल्याशिवाय भरती करून घेत नाही. याचबरोबर डेंगीचा ताप आहे की कोरोनाची लागण, यामुळे नागरिकांमधे संभ्रम आहे. त्यातच रूग्णालयात व डॉक्टरही तपासणीसाठी सकारात्मकता दाखवत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

अशातच पालिकेचा आरोग्य विभाग शहर स्वच्छतेसाठी प्रभावीपणे यंत्रणा राबवित नसल्याचे चित्र आहे. दुपारच्या वेळेस अनेक कामगार पालिकेच्या जुन्या इमारतीच्या आवारात निवांत गप्पांचा फड रंगवत असल्याचे चित्र आहे. कोणत्या वाॅर्डात कोणता सफाई कर्मचारी काम करतो, याचे नियोजन ना नगरसेवकांना माहित ना नागरिकांना. जंतूनाशक पावडरची फवारणी आणि फॉगिंग मशिनद्वारे धुरळणी केली जात नाही, अशी आळंदीकरांची ओरड आहे.

गोपाळपुरातील मीरा भोसले यांनी सांगितले की, पालिकेत अनेकदा दुरध्वनी केला तर उचलत नाहीत. नदी परिसरात राहत असल्याने नदीतील जलपर्णीमुळे मच्छर वाढले. जलपर्णी काढत नाही आणि औषध फवारणी नाही. यात्रा किंवा पुढारी आल्यावर जसे रस्त्यावर पावडरचा खच असतो, तो इतर वेळी का नाही. आधिच हाताला काम नाही. त्यात आजारी पडल्यावर पैसे कोठून खर्च करायचे. पालिकेत कोणी वाली नसल्याचे चित्र आहे. 

मंदिर परिसरातील गावठाणात महाद्वार रस्त्यावर अनेक तापाचे रूग्ण केवळ मच्छरांमुळे झाले. आधिच मंदिरापुढील व्यावसायिक गेली चार महिन्यांपासून बंद आहे. परिणामी आर्थिक विवंचनेतील लोकांनी औषधासाठी पैसे कोठून आणायचे. डेंगी व चिकुनगुणियासारखे आजार किमान 20-25 हजार रुपयापर्यंत बिल नेते. घरातील दोघांना बाधा झाली, तर खर्च कसा करायचा, असा सवाल अविनाश गुळुंजकर यांनी केला. 

डेंगी स्वच्छ पाण्यातील मच्छरांमुळे होतो. पाणी साठवू नका, असे गुळगुळित उत्तर पालिका देते. वस्तुता पालिका दिवसाआड आणि तोही अपुरा पाणीपुरवठा करते. वापरासाठी पाणी साठवले नाही, तर कोरोनासारख्या आजारापासून वाचण्यासाठी हात वारंवार कशाने धुवायचे, असा प्रश्न नागरिकांना पडल्याचे आळंदी विकास मंचचे कार्यकर्ते प्रसाद बोराटे यांनी सांगितले.

याबाबत मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले की, विभागवार फॉगिंग करून नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या स्वाक्ष-या घेतल्या जात आहेत. डेंगी आणि कोरोना एकत्र असल्यामुळे थोडे धोकादायक आहे. आरोग्य विभागाला पुन्हा स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेण्याचे आदेश दिला जाईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com