Big Breaking : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली घोषणा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

पुणे, मुंबई, कोल्हापूर, अमरावती यासह इतर भागात कोरोनाची स्थिती भिन्न असली तरी संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय घेतला जाणार आहे.

पुणे : राज्यातील सुमारे नऊ लाख विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत विद्यापीठ, महाविद्यालयात अंतीम वर्षात शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या सेमिस्टरला पडलेल्या गुणांवरून सरासरी काढून पास केले जाणार आहे. फेसबुक लाईव्हमध्ये रविवारी (ता.३१) रात्री ही घोषणा केली. 

उद्धव ठाकरे म्हणाले, "अंतीम वर्षाची परीक्षा द्यावी असे वाटत होते, पण ती जुलै, आॅगस्ट मध्ये घेणे शक्य नव्हते. स्थिती सुधारणेपर्यंतविद्यार्थी ताटकळत रहायचे का? हे योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांने आतापर्यंत सर्व अभ्यासक्रम शिकलेला असताना परीक्षेसाठी थांबवून ठेवणे योग्य नाही. त्यासाठी प्रत्येक सेमिस्टरला पडलेल्या गुणांची सरासरी काढून पास केले जाणार अाहे. ज्यांना कमी गुण पडले आहेत, असे वाटत असेल त्यांना नंतर परीक्षा देऊन गुण वाढविण्याच्या संधी दिली जाईल असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे!

राज्य सरकारने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परीक्षा संदर्भात ८ मे रोजी धोरण स्पष्ट केले. यामध्ये केवळ अंतीम वर्षाच्या व अंतीम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार अाहे, तर प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यांकनावर आधारीत गुण देऊन उत्तीर्ण केले जाईल असे जाहीर केले होते. पण त्यानंतर १९ मे रोजी राज्यात विद्यापीठ व महाविद्यालयात अंतीम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा न देण्याबाबत आणि ग्रेड देऊन उत्तीर्ण करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) पत्र पाठवून मार्गदर्शन करावे अशी मागणी सरकारने केली आहे. त्यानंतर राज्यात परीक्षेवरून राजकारण सुरू झाले. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ट्विटरद्वारे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परीक्षा देण्यासाठी नियोजन करावे, परीक्षा रद्द करणे योग्य नाही असे निर्देश दिले होते." शिक्षणसंस्था चालक, शिक्षण तज्ज्ञ यांनी ही परीक्षा न घेतल्यास याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील, हा निर्णय आता फायद्याचा वाटत असला तरी यात धोका आहे, त्यामुळे योग्य नियोजन करून परीक्षा घ्या अशी मागणी केली आहे. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लेखी परीक्षा रद्द करण्यास विरोध केला आहे. तर, युवासेना, मासू,  युक्रांद यासह इतर संघटनांनी परीक्षा होऊ नये, तसेच यूजीसी'च्या नियमांचे उल्लंघन होणार नाही असे सांगितले आहे. परीक्षा घेण्यावरून राज्यात दोन गट पडले. 
काही विद्यापीठांनी परीक्षेची तयारी सुरू केली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. 

- पुणेकरांनो सावधान! फेसबुक अकाऊंट हॅक होतायत अन्...

२५ मे रोजी उदय सामंत यांनी कुलगुरूंची बैठक घेतली. जर  तुम्हाला परीक्षा व्हाव्या वाटत असतील तर २-३ दिवसात प्रारूप आराखडा तयार करण्याचे कुलगुरूंच्या समितीला दिले होते. 
त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सींगद्वारे दुपारी १२. ३० वाजता बैठक घेतली. त्यामध्ये सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील सर्व विद्यापीठांची परस्थिती, कोरोनाचा प्रभाव, कुलगुरूंची भूमिका, परीक्षा घेण्यासाठी काय तयारी केली आहे?, विद्यार्थी सुरक्षा, मानसिकता यावर चर्चा करण्यात आली. 

याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, "अंतीम वर्षाच्या परीक्षेबाबत कुलगुरूंशी चर्चा करण्यासाठी आज बैठक झाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य, कोरोनाचा धोका, करावा लागणारा प्रवास यावर चर्चा केली. त्यानंतर  आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या अंतीम पातळीवर आलेलो आहोत. मात्र, यामध्ये कोणताही कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये म्हणून कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी यावर निर्णय घेतला जाईल."

पुणे, मुंबई, कोल्हापूर, अमरावती यासह इतर भागात कोरोनाची स्थिती भिन्न असली तरी संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय घेतला जाणार आहे. या अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर 'कोवीड बॅच' असा शिक्का बसणार नाही. मुलांच्या करियरचा विचार करून निर्णय घेतला जाईल.

- शासनाच्या आदेशाचा विद्यार्थ्यांना फटका; गरवारे महाविद्यालयाचे २०० विद्यार्थी अकरावीत नापास

काही कुलगुरूंची भूमिका परीक्षेच्या बाजूने
आजच्या बैठकीत राज्यातील काही कुलगुरूंना परीक्षा व्हावी अशी भूमिका मांडली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'कोरोनाची स्थिती सतत बदलत आहे. जुलैमध्ये परीक्षा होतील असे वाटत नाही. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपविली पाहिजे. त्यादृष्टीने विविध पर्याय पडताळून पाहावेत. अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गूण किंवा श्रेणी प्रदान करण्यासाठी कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. 

- 'मित्रों' हे ऍप वापरत असाल तर सावधान... वाचा सविस्तर बातमी

घटनाक्रम :
- यूजीसीने लाॅकडाऊन काळात देशात कशा पद्धतीने परीक्षा घ्याव्यात यासाठी समिती नेमली आहे. 
- राज्य सरकारनेही कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षेसंदर्भात अहवाल तयार करण्यात समिती नेमली
-यूजीसीची नियमावली आल्यानंतर ५ मे रोजी कुलगुरूंची बैठक घेऊन  दोन दिवसात वेळापत्रक जाहीर केले जाईल अशी उदय सामंत यांची घोषणा.
- ८ मे रोजी  केवळ अंतीम वर्षाच्या व अंतीम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. 
- विविध विद्यार्थी संघटनांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली
- १९ मे रोजी अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द करून ग्रेड देण्यासाठी 'यूजीसी'ला सामंत यांचे पत्र
-  २५ मे रोजी उदय सामंत यांनी कुलगुरूंची बैठक घेतली. परीक्षेचा आराखडा सादर करण्याच्या सूचना
- ३० मे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुलगुरूंची बैठक घेतली. 
- सर्वांची मते जाणून घेण्यात आली, पण अजून दोन ते तीन दिवसांनी निर्णय घेतला जाईल. 
- ३१ मे रोजी फेसबुक लाईव्ह मध्ये परीक्षा रद्दची घोषणा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Uddhav Thackeray announced the cancellation of examinations of students studying in the final year of university and college