मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पुणेकरांना आवाहन तर, महापालिकेला मदतीची तयारी

उमेश शेळके
Thursday, 30 July 2020

कोरोनाच्या रुग्णांना औषधे माफक दरात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. डॅश बोर्डवरील माहिती गतीने उपलब्ध करून द्यावी. सोसायट्यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना चांगली वागणूक द्यावी यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

पुणे  : पुण्यात वाढत्या रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टीने हॉस्पिटलमधील बेडची संख्या वाढविण्यासाठी महानगरपालिकेनेच पुढाकार घ्यावा. त्यासाठी राज्यशासन महापालिकांना आर्थिक मदत करेल,' असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले. गाफील राहू नका, असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणेकरांना केलंय.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत आज बैठक झाली. कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ , पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. 

आमदारांनी केल्या या सूचना 
कोरोनाच्या रुग्णांना औषधे माफक दरात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. डॅश बोर्डवरील माहिती गतीने उपलब्ध करून द्यावी. सोसायट्यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना चांगली वागणूक द्यावी यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे. पुण्यासाठी व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, औषधसाठा उपलब्ध करून द्यावा. खासगी रुग्णालयांचे बेड उपलब्धतेची माहिती अद्ययावत ठेवावी, कोविड केअर सेंटर मधील भोजनाचा दर्जा चांगला ठेवावा. प्रतिबंधात्मक नियम पाळण्याबाबत जनजागृतीवर भर द्यावा. माहिती, शिक्षण आणि संवाद यावर भर द्यावा. कोरोना तपासणीसाठी फिरते तपासणी केंद्र सुरू व्हावे, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अद्ययावत वैद्यकीय उपकरणे व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. 

आणखी वाचा - कोरोनाबाबत पुण्याच्या महापौरांनी दिली धक्कादायक माहिती 

मुख्यमंत्री म्हणतात..... 

 • व्हेंटिलेटर, पी पी ई किट, एन 95 मास्क पुरेशा प्रमाणात पुरवठा करणार 
 • महापालिकांना कोरोना प्रतिबंधासाठी आर्थिक मदत देणार 
 • प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स बनविणार. 
 • कोरोना उपाययोजनामध्ये सुसूत्रता आणणार 
 • व्हेंटिलेटर, पी पी ई किट, एन 95 मास्कसाठी पाठपुरावा करणार, 
 • 1 सप्टेंबर नंतरही कोरोना प्रतिबंधक साधनांचा पुरवठा करावा 
 • आमदार व खासदारांनी याबाबत केंद्राला विनंती करण्याचे आवाहन. 
 • रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करणार 
 • प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी होणार 

खासगी प्रयोगशाळांना दिली ही सूचना 
तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बऱ्याचदा रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येत आहे. असे होऊ नये यासाठी खासगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना तो परस्पर अहवाल न देता महापालिका यंत्रणेला द्यावा, असे आदेश ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. 

आणखी वाचा - पुण्यातून आली आनंदाची बातमी, दहा दिवसांत रुग्ण संख्येत पडला फरक

पुणेकरांनो गाफील राहू नका 
राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करताना सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असून गाफील राहता कामा नये, असे आवाहन पुणेकरांना ठाकरे यांनी केले. यात लोकसहभाग महत्त्वाचा असून, मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्सिंग, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याबाबत महापालिकेने नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच उपचारापासून रुग्ण वंचित राहू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी राबविण्यासाठी विकेंद्रीकरण करावे, असेही ते म्हणाले. 

पुण्यासाठी प्रशासनाला दिलेल्या सूचना 

 • जम्बो रुग्णालयाचे काम गतीने करावे. 
 • बेड व्यवस्थापन संगणकीय प्रणालीमध्ये करावे. 
 • आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. 
 • झोपडपट्टीत छोटी घरे असल्यामुळे गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक अलगीकरणांवर भर द्यावा. 
 • ऑक्सिटजनयुक्त रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray pune tour press conference