esakal | Pune Rain : ३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले; नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Rain_Damage

हवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्‍यांमधील बहुतांश गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या चार तालुक्‍यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

Pune Rain : ३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले; नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने चारजणांचा बळी गेला असून, एक व्यक्‍ती बेपत्ता आहे. पूरस्थितीमुळे बारामती आणि इंदापूर तालुक्‍यातील 925 कुटुंबांतील तीन हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यातील शेतपिकांचे आणि घरांच्या पडझडीबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांमध्ये बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शंभर महसुली मंडळापैकी 68 मंडळांमध्ये 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. हवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्‍यांमधील बहुतांश गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या चार तालुक्‍यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

Pune Rain : २५ सप्टेंबरची पुनरावृती टळली; यंदा जास्त पाऊस होऊनही नुकसान कमीच​

बचाव कार्यासाठी मुळशी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थही पोचले आहे. बारामती तालुक्‍यात एनडीआरएफचे एक पथक पाठविण्यात आले आहे. कऱ्हा नदीला पूर आल्यामुळे बारामती तालुक्‍यातील कसबा, खंडोबानगर, पंचशील, साठेनगर गावांमधील दोन हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. सोनगाव येथे पाण्यात अडकलेल्या 20 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तसेच, इंदापूर तालुक्‍यातील सन्सर, लासुर्णे, निमगाव केतकी, नीरा-नरसिंहपूर यासह अन्य गावांतील एक हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. प्रशासनाकडून त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

घराचं स्वप्न पूर्ण करण्याकडं खरेदीदारांचा मोर्चा; विक्रीत झाली मोठी वाढ!

डॉक्‍टरसह दोन नर्सेसची सुटका 
पूरस्थितीमुळे दौंड तालुक्‍यातील चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक डॉक्‍टर आणि दोन नर्सेस अडकून पडल्या होत्या. ते तिघेजण जीव मुठीत घेऊन रात्रभर आरोग्य केंद्राच्या छतावर बसून होते. बचाव पथकाने प्रयत्न करून गुरुवारी पहाटे त्यांची सुखरूप सुटका केली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 

 Video : 'अहो सुप्रियाताई, महापालिकेत तुमचीच सत्ता होती!'

पाण्यात वाहून गेल्यामुळे चौघांचा मृत्यू 
दौंड तालुक्‍यात दुचाकीवरून जाणारे चौघेजण पाण्यात वाहून गेले होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. शहाजी गंगाधर लोखंडे, अप्पा हरीबा धायतोंडे, कलावती अप्पा धायतोंडे यांचा मृतदेह हाती लागला आहे. तर, सुभाष नारायण लोंढे हे बेपत्ता आहेत. तसेच, हवेली तालुक्‍यात वाघोली येथे दुचाकीवर जाताना पाण्यात वाहून गेल्यामुळे अशोक अहेलवार या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. शेतपिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)