'अंतिम' परीक्षेतील अडचणी पाठ सोडेनात; एजन्सीच्या क्षमतेचा करा खुलासा

ब्रिजमोहन पाटील
Monday, 19 October 2020

रविवारी सकाळी परीक्षा सुरू झाल्यानंतर एम.कॉम.चा मर्कंटाईल लॉचा पेपर होता. विद्यार्थ्यांना पेपर येत नसल्याने तो नंतर 11 वाजता घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांची पाठ सोडेना अशीच अवस्था झाली आहे. रोज त्याच त्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत. त्यामुळे परीक्षा घेणाऱ्या एजन्सीची परीक्षा घेण्याची क्षमता होती का याचा खुलासा करा, अशी मागणी नेट, सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीने पुणे विद्यापीठाकडे केली आहे. तर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे.

NEET 2020 : विद्यार्थ्यांना 'मराठी' नकोशी; परीक्षा देणाऱ्यांची संख्या घटली पाच पटीनं!​

रविवारी सकाळी परीक्षा सुरू झाल्यानंतर एम.कॉम.चा मर्कंटाईल लॉचा पेपर होता. विद्यार्थ्यांना पेपर येत नसल्याने तो नंतर 11 वाजता घेण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, दुपारी 1 वाजून गेला तरी अनेक विद्यार्थ्यांना लॉगइन होत नसल्याने पेपर सोडवता आला नसल्याने ते चिंताग्रस्त झाले होते. या विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणी सांगण्यासाठी गुगल फॉर्म भरा, त्यानंतर विद्यापीठाकडून इमेल येईल,त्यानुसार परीक्षा होईल सांगण्यात आले. पण अनेक विद्यार्थ्यांना इमेल आला नाही, असे मध्यवर्ती भागातील एका महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सांगितले. इतर विषयांच्या पेपरलाही लॉगइनची समस्या आली आहे.

आता कांदा आणणार डोळ्यात पाणी; जुन्या कांद्याच्या दराने गाठला उच्चांक!​

"परीक्षा सुरू होताना विद्यार्थ्यांना लॉगइन करताना अडचणी येत आहेत, त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न आहे, अनेकांनी व्यवस्थित पेपर दिला आहे. तरीही विद्यार्थ्यांना त्यांना येणाऱ्या अडचणी गुगल फॉर्मद्वारे विद्यापीठाकडे नोंदवाव्यात. त्यांचे निराकरण केले जाईल. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये.''
- डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा

"ऑनलाइन परीक्षेत सातत्याने अडचणी येत असल्याने विद्यार्थी, प्राध्यापकांना मानसिक त्रास होत आहे. तसेच निकालावरही होण्याची शक्‍यता आहे. जी एजन्सी परीक्षा घेत आहे, त्यांची क्षमता नसतानाही काम दिले आहे का? याचा खुलासा विद्यापीठाने करावा, तोपर्यंत पर्यंत परीक्षा स्थगित करावी.''
- सुरेश देवडे पाटील, नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समिती

Navratri Festival: गरबा-दांडियाही झाला डिजिटल; यंदा गरबा स्पर्धा होणार ऑनलाईन​

- अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्‍न आल्याचा विद्यार्थ्यांना आरोप
- लॉगईन होण्यासाठी तीन तासापेक्षा जास्त काळ लागला
- एकाच विषयाचा पेपर दोन वेळा सोडविला, पण समबीट पाच वेळा
- लॉगइन केले तरी, पेपर उपलब्ध होत नाही.
- परीक्षा देत असताना अचानक पेपर बंद पडतो, पुन्हा नव्याने प्रश्‍न येतात.

रविवारी झालेल्या परीक्षेची आकडेवारी :- 
पेपर संख्या - 223
ऑनलाइन अपेक्षित विद्यार्थी - 125276
परीक्षा देणारे - 115233
ऑफलाइनसाठी अपेक्षित विद्यार्थी - 15423
परीक्षा देणारे - 13881

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Committee demanded Pune University to disclose about agency conducting the exams