esakal | पुण्यात 9 वर्षात वाढला साडे चार टीएमसी पाण्याचा वापर
sakal

बोलून बातमी शोधा

water
  • नऊ वर्षात वाढला साडे चार टीएमसीचा वापर

  • प्रतिवर्ष सरासरी अर्धा टीएमसी मागणी वाढत आहे.

  • २०२०-२१ मध्ये सर्वाधिक १८.३८ टीएमसीचा वापर

  • पाणी गळती, अनधिकृत नळजोड मुळे मोठे नुकसान

पुण्यात 9 वर्षात वाढला साडे चार टीएमसी पाण्याचा वापर

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : शहरासाठी आवश्यक असणारा पाणी कोटा एकीकडे मंजूर होत नसताना दुसरीकडे दरवर्षी सरासरी अर्धा टीएमसी पाण्याची मागणी वाढत आहे. गेल्या नऊ वर्षात महापालिकेचा पाणी वापर साडे चार टीएमसीने वाढला आहे. पाणी चोरी व गळीत याची डोकेदुखी मात्र कमी झालेली नाही.

पुण्याची लोकसंख्या सुमारे ४५ लाख इतकी असून, या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणांमधून पूर्वीपासून पाणी पुरवठा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून भामा आसखेड धरणातील २.६५ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. पाटबंधारे विभागासोबत महापालिकेचा २००१ मध्ये ११.५० टीएमसी पाण्याचा करार झाला आहे. पण शहराची लोकसंख्या वाढत असताना २० वर्षापूर्वी केलेल्या करारात बदल झालेला नाही. खडकवासला धरण प्रकल्पातील पाणी शहर व ग्रामीण भागासाठी वापरले जाते. पाणी साठा कमी झाल्याने यापूर्वी शहराला पाणी कपातीला देखील तोंड द्यावे लागले आहे.

हेही वाचा: पुणे : धरण परिसरात २४ तास संततधार पाऊस; वाढला सव्वा TMC पाणीसाठा

पुण्यात उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षण आदी कारणांनी होणारे स्थलांतर मोठे आहे, त्यामुळे लोकसंख्येचा भार वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी पाण्याची मागणी देखील वाढत आहे. २०१२-१३ मध्ये शहरासाठी १३.८८ टीएमसी इतके पाणी लागले होते, तेव्हा रोजचा पाणी वापर हा सरासरी १२०० दशलक्ष लिटर (एमएलडी) होता. त्यानंतर २०१५ ते २०१७ या कालावधीत धरणात पाणी कमी असल्याने शहरात जवळपास वर्षभर पाणी कपात लागू होती. त्यानंतर पाणी वापर वाढत गेला, आता २०२१ हा सरासरी पाण्याचा वापर १४५० एमएलडी इतका झाला आहे. गेल्या नऊ वर्षात पुणे महापालिकेत येवलेवाडीसह ३५ गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढत आहे. २०२१ मध्ये पुणे शहरासाठी १८.५७ टीएमसी पाणी आवश्‍यक आहे असे सांगितले जात असताना दरवर्षी पाण्याचा वापर किमान अर्धा टीएमसीने वाढत गेलेला आहे. हा पाणी वापर कमी करता येणे शक्य नसल्याने पालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा दंड पाटबंधारे विभागास भरावा लागत आहे.

हेही वाचा: कोयत्याचा गुन्हेगारांकडून पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वापर

अजून दोन वर्ष होणार पाणी गळती

महापालिकेच्या जल वितरण व्यवस्थेतून तब्‍बल ३५ टक्के पाणी गळती वर्षानुवर्षे सुरू आहे. ही पाणी गळती कमी करण्यासाठी महापालिकेला संपूर्ण वितरण व्यवस्था सुधारावी लागणार आहे. शहरात सध्या २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे, त्यामध्ये जलवाहिन्या

बदलल्या जाणार असल्याने पाणी गळतीचे प्रमाण हे ३५ टक्‍क्यांवरून २० टक्के पर्यंत येणार आहे, असा दावा महापालिका करत आहे. ही सुधारणा झाल्यास पुण्याला लागणाऱ्या पाण्याची गरज १५ टक्क्यांनी कमी होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: पुण्याच्या मैथिलीची हार्वर्डमध्ये निवड

असा वाढला पाणी वापर

वर्ष पाणी वापर (टीएमसी)

२०१२-१३ - १३.८८

२०१३-१४ - १५.०७

२०१४-१५ - १५.४८

२०१५-१६ - १३.३७

२०१६-१७ - १४.५३

२०१७-१८ - १७.३२

२०१८-१९ - १७.१९

२०१९-२० - १७.३८

२०२०-२१ - १८.३८

loading image