कोरोनाचा अजूनही धोका आहे, काळजी घ्या! चाचणी करण्याची सूचना | Coronavirus | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test
कोरोनाचा अजूनही धोका आहे, काळजी घ्या! चाचणी करण्याची सूचना

कोरोनाचा अजूनही धोका आहे, काळजी घ्या! चाचणी करण्याची सूचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्यांमध्ये उदासीनता आणू नका. कोरोना झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी करा, अशा स्पष्ट सूचना केंद्राने राज्यांना दिल्या आहेत.

देशात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. सध्या त्याच्या संसर्गाचे प्रमाण निश्चित कमी झाले आहे. पण, तो अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही. कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे अत्यवस्थ रुग्णांचे मृत्यूही होत आहेत. त्या पार्श्वभूमिवर केंद्रीय आरोग्य विभागाने राज्यांना कोरोनाच्या चाचण्यांमध्ये सातत्य ठेवण्याची सूचना केली आहे.

महाराष्ट्रासह सिक्कीम, नागालँड, केरळ, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि लडाख ही राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना ही सूचना दिली आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात गुरुवारी २४९ नवे कोरोना रुग्ण

दिवाळीपासून मोठ्याप्रमाणात नागरिक बाजारपेठ, पर्यटनस्थळे, मंदिरे, उद्याने, रेल्वे स्टेशन अशा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत आहेत. या ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे दिसते. यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. युरोप आणि आशियातील काही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे आपल्याकडे संसर्गाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी सातत्याने चाचण्या करणे आवश्यक असल्याचे केंद्राने नमूद केले आहे.

स्वॅब टेस्ट आवश्यकच

कोरोना रुग्णांची संख्या आणि राज्यांमध्ये झालेल्या चाचण्यांची सरासरी केंद्रीय आरोग्य विभागाने काढली. त्याची तुलना केल्यास चाचण्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत असल्याचे केंद्राने सांगितले. त्यामुळे कोरोनाबाधीताशी संपर्क आलेल्या प्रत्येक संशयिताची स्वॅब टेस्ट करणे आवश्यक असल्याची सूचनाही केंद्राने केली. कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णाची अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आली असली तरीही ‘आरटी-पीसीआर’ चाचणी करणे आवश्यक आहे.

काय करावे...

  • हिवाळ्यात सर्दी, खोकल्याला सुरुवात होईल.

  • काही भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवामानातील या बदलांचा थेट परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता.

  • श्वसनाच्या विकारांवर बारकाईने लक्ष ठेवा.

  • कोरोनाची लक्षणे दिसताच लवकर निदान करा.

  • हॉटस्पॉट ओळखण्यासाठी कोरोनाच्या नियमित चाचण्या करा.

loading image
go to top