कोरोनाने मानसिक नाही तर आमची आर्थिक स्थितीही ढासळली; रोजीरोटीचा प्रश्‍नही झाला गंभीर

Corona-Virus
Corona-Virus

पुणे - 'मंदाकिनी राऊत या त्यांच्या घरात गेल्या 18 वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी मेस चालवत आहेत. पती रिक्षाचालक आणि मुलगा नोकरीला जात होता. लॉकडाऊनमुळे रिक्षा बंद झाली, काही दिवसात मुलाची नोकरी गेली, त्याचसोबत मेस जवळपास बंद झाली. काही मोजके विद्यार्थी पुण्यात होते, ते जेवायला येत असल्याने त्यांचा तेवढा आधार लाभला. कोरोनाने मानसिक नाही तर आमची आर्थिक स्थितीही ढासळली आहे, यातून लवकर बाहेर पडावे अशी अपेक्षा करत दुःखाला वाट मोकळी करून दिली. तर मोहन शिंदे हे चहाचा स्टॉल चालवत आहेत, पूर्वी सकाळी पासून संध्याकाळपर्यंत चहाची तलफ भागविण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे मुल-मुली येत होते. सहा महिन्यात मोठे आर्थिक नुकसान झाले, आता पुन्हा स्टॉल सुरू केला पण विद्यार्थी नसल्याने हवा तसा धंदा नाही, अशी कैफियत शिंदे व्यक्त करत होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे स्पर्धा परीक्षेचे हब बनले असताना केवळ क्‍लासचीच संख्या वाढली असे नाही. तर त्यासोबत मेस, चहा, नाष्ट्याचे स्टॉल, पुस्तक विक्री, अभ्यासिका, हॉस्टेल हे व्यवसायही बहरले. विशेष म्हणजे सदाशिव पेठ, नारायण पेठ, नवी पेठ, कसबा पेठ, शुक्रवार पेठ, स्वारगेट, दत्तवाडी, पर्वती, डेक्कन जिमखाना, बुधवार पेठ या परिसरात एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत 80 टक्के विद्यार्थी रहात. त्यामुळे येथील हॉस्टेल असो की कॉट बेसिस याचे दर वाढले, मोठ्या मेसससह घरोघरी काकू, माऊशींनीही मेस सुरू केल्या. यातून कुटुंबासाठी मोठा हातभार लागत होता. विद्यार्थी संख्या वाढल्याने अनेकांनी फ्लॅट भाड्याने घेऊन मेस, हॉस्टेल सुरू केले. क्‍लासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चहा, व नाष्ट्यांचे स्टॉल सुरू झाले. दिवसभर तेथे विद्यार्थ्यांचा राबता असायचा. पुण्यातील सुमारे 10 हजार कुटुंबाचा व्यवसाय या विद्यार्थ्यांमुळे सेट झालेला होता.

'कोरोना'चा रुग्ण शहरात आढळल्यानंतर क्‍लासेस बंद झाले, पुणे बंद होत असल्याने विद्यार्थी गावाकडे जाऊ लागले आणि मेस, चहाचे स्टॉल, अभ्यासकांमधील गर्दी ओसरली. महिन्याभरात पुन्हा सगळे व्यवस्थित होईल असे अनेकांना वाटले, पण आता सहा महिने उलटून गेले तरी फक्त चहाचे स्टॉल, तुरळक मेस सुरू झाले. लॉड्री, केसकर्तनाल यासह व्यावसायिकांचे हक्काचे गिऱ्हाईक नसल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाल्याने कंबरडे मोडले आहे.

भविष्य ई-वाहनांचेच! खरेदीत होणार वाढ

अभ्यासिकांचे भाडे थकले
संपूर्ण पुण्यात साधारणपणे लहान मोठ्या मिळून सुमारे 600 साडे तीनशे अभ्यासिका आहेत. त्यातील 250 ते 300 अभ्यासिका मध्यवस्तीत आहेत. महिन्याला 700 रुपयांपासून ते 2 हजारापर्यंत विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतात. पण लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अभ्यासिका चालक आर्थिक अडचणीत आले आहेत. जागा मालकांनी भाडे मागितल्याने अभ्यासिका बंद केल्या आहेत. तर, काहींनी भाड्यात सवलती घेऊन जागा सोडलेली नाही. आर्थिक ताण वाढत असल्याने अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली जात होती, पण अद्यापही त्यास परवानगी दिलेली नाही.

थांबलेली गुन्हेगारीही पुण्यात ‘अनलॉक’

'गेल्या 5 वर्षापासून वर्ष मी मेस चालवत आहे, माझे कुटुंबही याच व्यवसायात आहेत. रोज सकाळ-संध्याकाळी किमान 250 विद्यार्थी जेवणासाठी येत, पण लॉकडाऊनमुळे विद्यार्थी नसल्याने आमच्याच रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला होता, आता फक्त 25 डबे आहेत ही स्थिती कधी सुधारणार माहिती नाही''
- विजय हारदडे, मेस चालक

Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

'आमचे मुलींचे हॉस्टेल असून, पूर्वी तेथे 70 मुली रहात होत्या, मार्च पासून हॉस्टेल बंद झाल्याने उत्पन्न बुडालेच पण जागा मालकाला पैसे द्यावे लागले. त्यामुळे डबल नुकसान झाले. मागच्या महिन्यापासून दहा मुली रहात आहेत, त्यातून काही भागत नाही, पण व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी हा तोटा सहन करावा लागत आहे. यातून लवकर सुटका व्हावी एवढीच अपेक्षा आहे.''
- विक्रम गायकवाड, हॉस्टेल चालक

कचऱ्यापासून वीज अन्‌ प्लॅस्टिकपासून इंधन

मार्च महिन्याआधी दिवसाला सव्वाशे लिटर दुधाचा चहा करून तो विकत होतो. आता 15 लिटर दूध देखील जास्त होते. लॉकडाऊनचा मोठा तोटा सहन करावा लागला. माझ्याकडे चहा पिण्यासाठी येणारे बहुतांश जण हे विद्यार्थी होते. आता ते पुण्यात नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे.''
- संतोष शास्तुरकर, चहा विक्रेता

लॉकडाऊनपूर्वी अशी होती स्थिती
मेस, खानावळ संख्या - सुमारे 700
अभ्यासिका संख्या - सुमारे 600
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी - 1 लाख
मेससाठी पैसे - 2 हजार ते 4 हजार
हॉस्टेल - सुमारे 3500

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com