कचऱ्यापासून वीज अन्‌ प्लॅस्टिकपासून इंधन

Pune-Zp
Pune-Zp

पुणे - जिल्ह्यातील गावां-गावांत निर्माण होणारा कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी महापालिकांच्या धर्तीवर मोठ्या गावांमध्ये कचऱ्यापासून वीज अन्‌ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती करणारे प्रकल्प पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात येणार आहेत. यामुळे गावातच वीज आणि इंधन उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड्यांची स्वयंपुर्णतेकडे वाटचाल सुरू होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारने राज्याताली चार जिल्ह्यांची हागणदारी मुक्तोत्तर गाव मोहिमेसाठी (ओडीएफ प्लस) निवड केली आहे. त्यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याची निवड झाली आहे. या मोहिमेअंतर्गत हागणदारीमुक्त गावांमध्ये स्वच्छता आणि आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या विकासांच्या योजना राबविल्या जाणार आहेत. खास करून घनकचरा, सांडपाणी, प्लॅस्टिकमुक्त गाव, पिण्याचे पाणी यावर विशेष भर दिला जाणार आहे. खेडी स्वयंपूर्ण करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असणार आहे.

या मोहिमेअंतर्गत 2020 ते 2024 या पाच वर्षाच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात गावां-गावांत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे, सर्व कुटुंबीयांना शौचालय सुविधा उपलब्ध करून देणे, जुन्या शौचालयांची दुरुस्ती करणे, सर्व गावांमध्ये सार्वजनिक शौचालयांची उभारणी करणे, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने आदी सरकारी कार्यालयांमध्ये शौचालय बांधणे आदी पंचसूत्रीचा अवलंब केला जाणार आहे.

या प्रकल्पांसाठी 15 वा वित्त आयोग, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींचा स्वनिधी (सेस फंड), स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर फंड) आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आदींच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रकल्प
- यांत्रिकीकरणाद्वारे कचऱ्याची विल्हेवाट.
- गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारणे.
- जैवइंधन निर्मिती (बायोगॅस).
- सिवेज ट्रीटमेंट प्लॅंट (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प).
- कचऱ्यापासून वीज निर्मिती.
- प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती.

गावांमार्फत केल्या जाणाऱ्या उपाययोजना
- कचऱ्याचे वर्गीकरण करणे.
- ओल्या व सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करणे.
- गावातील परिसर स्वच्छता करणे.
- प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती.
- सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन.
- कचरा कुंड्यांची सोय उपलब्ध करणे.
- कचरा वाहतुकीसाठी वाहन सुविधा
- कचरा साठवणूक व खतांसाठी गोदाम निर्मिती

जिल्ह्याचा 218 कोटींचा आराखडा - निर्मला पानसरे
गावां-गावातील स्वच्छता, कचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने चालू वर्षातील प्रकल्पांचा 218 कोटी 69 लाख 89 हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये, कचरा, प्लॅस्टिक व गाळ व्यवस्थापन प्रकल्पांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.

कृती आराखड्यातील समाविष्ट प्रकल्प
- वैयक्तिक शौचालये ---16 हजार 213.
- सार्वजनिक शौचालये --- 1 हजार 388
- घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प --- 1 हजार 877.
- सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प --- 1 हजार 877.
- प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन --- 13
- मैला गाळ व्यवस्थापन --- 250.
- गोबरधन प्रकल्प --- 1.

गावांच्या विकासासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उपयुक्त ठरत असतात. टिकेकरवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्वीपासून हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. टिकेकरवाडीचाच गोबरधन हा प्रकल्प आता पथदर्शी प्रकल्प म्हणून देशभरात राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एकाचवेळी वीज, गॅस आणि खत निर्मिती केली जात आहे.
- संतोष टिकेकर, माजी सरपंच, टिकेकरवाडी, ता. जुन्नर.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com