शिरूर, वेल्हे, मुळशी, खेड, इंदापूरमध्ये कोरोनाचा धोका कायम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 July 2020

पुणे जिल्ह्यातील शिरूर, वेल्हे, मुळशी, खेड, इंदापूर या तालुक्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजही या तालुक्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, तर काही रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासा देणारी बाब म्हणजे भिगवणमधील 38 जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर, वेल्हे, मुळशी, खेड, इंदापूर या तालुक्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजही या तालुक्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, तर काही रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासा देणारी बाब म्हणजे भिगवणमधील 38 जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  

शिरूर : शिरूर शहर व तालुक्यात कोरोनाची व्याप्ती वाढत चालली असून, आज शहरात दहा, तर तालुक्याच्या ग्रामीण भागात १२ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यातच शहरातील ६२ वर्षीय बाधित व्यक्तीचा आणि नागरगाव येथील बाधित सत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने तालुका हादरून गेला आहे. 

जुन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची चिंता कमी होणार
    
शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागापेक्षा शहरातील बाधितांचा वेग गेल्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढला असून, तालुक्यात आतापर्यंत दहा मृत्यू झाले असून, त्यातील चार शहरातील आहेत. शहरातील जवळपास सर्वच भागात आता बाधित रूग्ण सापडू लागले असून, निम्म्याहून अधिक शहरात प्रतिबंधित क्षेत्राच्या पाट्या झळकू लागल्या आहेत. आज मुंबई बाजार, सोनार आळी, भाजी बाजार, सिद्धार्थ नगर, सय्यदबाबा नगर व भाजीबाजार या परिसरात प्रत्येकी एक़ तर सुभाष चौक परिसरात तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आणि त्यातच सकाळी एका ६१ वर्षीय बाधित नागरीकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने शहरवासिय हादरले आहेत. शहरात यापूर्वी ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यु झाला होता. 
आज कोरेगाव भीमा येथे दिवसभरात चौघांचे़, तर शिक्रापूरात तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून, कारेगाव, कोळगाव डोळस, तर्डोबाचीवाडीतील मौर्यपूरम, मांडवगण फराटा व सणसवाडी येथे प्रत्येकी एकजण पॉझिटीव्ह सापडला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली.

आता शुभमंगल सावधान म्हणा वीस लोकांमध्येच

भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील एका कोरोनाबाधित व्यवसायिकाच्या संपर्कातील तीन व्यावसायिकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे भिगवणकरांवरील कोरोनाचे संकट गडद झाले होते. परंतु, सबंधित तीन रुग्णांसह संपर्कातील 35 व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे भिगवणकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाची साखळी मात्र सुरुच राहिली आहे.
भिगवण येथील एका व्यावसायिकास रविवारी (ता. 19) कोरोनाची बाधा झाली होती कोरोनाबाधित व्यावसायिक एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील व्यावसायिकांच्या संपर्कात आला होता. संपर्कातील नऊ व्यावसायिकांनी तपासणी केली असता 3 व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे भिगवणकरांवर कोरोना संकट गडद झाले होते. त्यानंतर 3 व्यक्तींच्या संपर्कातील 35 व 3 कोरोनाबाधितांची पुन्हा तपासणी करण्यात आली. सर्व 38 व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे भिगवणकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, बारामती येथे उपचार घेत असलेल्या भिगवणमधील महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ. रोहन कुंभार यांनी दिली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

वेल्हे : वेल्हे तालुक्यात आज सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये वांगणीवाडी येथील २, ओसाडे येथील २, तर निगडे मोसे, कुरण बुद्रुक, पानशेत येथील प्रत्येकी १, असे मिळून सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या ९५ वर पोहचली असून, ४२ जणांनी कोरोनावर मात केली असून, दोन जेष्ठांचा मृत्यू झाला आहे, तर ५१ जणांवर उपचार चालू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.

राजगुरुनगर : खेड तालुक्‍यात शुक्रवारी 54 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्‍यातील रुग्णांच्या संख्येने नऊशेचा टप्पा ओलांडला असून, आकडा 932 वर पोचला आहे. तालुक्‍यात कोरोनामुळे एका ज्येष्ठाचा मृत्यू झाला असून, बळींची संख्या 17 झाली. तालुका आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे आणि गटविकास अधिकारी अजय जोशी यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी कोरोनामुक्त झाले आहेत. राजगुरूनगरला 2, आळंदीत 6, तर चाकणला 8, केळगाव, चिंबळीत प्रत्येकी 3, चऱ्होली खुर्द, खराबवाडी, महाळुंगे, वाडा येथे प्रत्येकी 2, निघोजे येथे 8, मेदनकरवाडी, नाणेकरवाडीत प्रत्येकी 5 कोरोनाबधित आढळले. बहुळ, भोसे, कडूस, दावडी, किवळे, होलेवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. 

पिरंगुट : मुळशी तालुक्‍यात कोरोनाचे 31 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या आता 460 झाली आहे. तालुक्‍यात पिरंगुट येथे 4, म्हाळुंगे, सूस, भूगाव व जांबे येथे प्रत्येकी 1, लवळे येथे 3, बावधन, कासार आंबोली व माण येथे प्रत्येकी 2, दारवली येथे 8, तर बोतरवाडी 6 रुग्ण सापडले. बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये 23 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्‍यात बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या 194 झाली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients have increased in these talukas of Pune district