corona
corona

मंचरमध्ये कोरोनाचा कहर, प्रशासनाने घेतलाय मोठा निर्णय  

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात शुक्रवारी (ता. ३) कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या एकूण सहा झाली आहे.  शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय म्हणून शहरात रविवार (ता. ५) ते रविवार (ता. १२) अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवणार आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या चारही महिला असून, त्यामध्ये कोरोनाबाधित प्रतिष्ठीत व्यक्तीची पत्नी, डॉक्टर, हॉटेल चालक व परदेशातून आलेल्या एका तरुणीचा समावेश आहे. डॉक्टर व हॉटेल व्यवसायिक महिलेच्या संपर्कात  आलेल्यांची संखेने १०० पार केली आहे. संपर्क आलेल्यांची धडकन वाढली असून संबंधितांचा शोध घेण्याचे काम मंचर ग्रामपंचायत व आरोग्य खात्याने सुरू केले आहे.
   
मंचर शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला आठ दिवसांपूर्वी कोरोना प्रादुर्भाव झाला होता. त्यांच्यावर पुण्याला औंध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. संबंधित व्यक्तीच्या पत्नीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पिंपळगाव फाट्यानजीक असलेल्या एका दवाखान्यात पती-पत्नीने प्राथमिक उपचार घेतले होते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्याकडे उपचार घेतलेल्या अन्य रुग्णांही काळजीत पडले आहेत. 

मंचर खिंडीत हॉटेल व्यावसायिक महिलेच्या दुकानात दररोज शंभरहून अधिक तरुण चहापाणी व सिगारेट ओडण्यासाठी येत होते. ती महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे संबंधित तरुणांची चलबिचल सुरू झाली आहे. महिलेचे घर एकलहरे येथे आहे. तसेच, परदेशात शिक्षण घेणाऱ्या तरुणीचे दहा दिवसांपूर्वीच विमानाने पुण्यात आगमन झाले होते. तिलाही कोरोनाची लागण झाल्याने ती राहत असलेल्या मुळेवाडी परिसरातील नागरिकांच्याही चिंतेत भर पडली आहे. 

मंचर शहरात कोरोनाची लागण झाल्याची संख्या एकूण सहा झाली आहे. त्यापैकी मुंबईहून आलेली महिला उपचार घेऊन पूर्णपणे बरी झाली आहे. तिला घरी सोडण्यात आले आहे. सध्या असलेल्या पाचपैकी एक पुरुष पुणे येथे उपचार घेत असून, अन्य चार महिलांना उपचारासाठी वडगाव काशिंबेग फाटा येथील भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकूण चार रुग्ण स्थानिक आहेत, अशी माहिती आंबेगावचे गट विकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश ढेकळे  यांनी दिली.

कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ताबडतोब खबरदारीचे उपाय योजना हाती घेतल्या आहेत. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करून त्यांचा शोध घेऊन होम कवारंटाइन करण्याची प्रक्रिया आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी सुरू केली आहे, असे गांजाळे यांनी सांगितले.

मंचर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय म्हणून शहरात रविवार (ता. ५) ते रविवार (ता. १२) अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद राहतील. दुधाची दुकाने, अत्यावश्यक सेवेतील किराणा मालाची दुकाने सकाळी ९ ते दुपारी एक व दुध विक्री सकाळी ८ ते ९ व संध्याकाळी साडेपाच ते संध्याकाळी सातपर्यंत सुरु राहील. दूध विक्रेत्यांनी दूध सोडून अन्य पदार्थ विकू नये, असे आवाहन मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले आहे. 

मंचर हे आंबेगाव तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. दररोज १०४ गावांतील नागरिकांची येथे वर्दळ असते. बटाटा व कांद्याची बाजारपेठ प्रसिद्ध असल्याने अन्य तालुक्यातील शेतकरी व व्यापारी यांचे ये जा सुरु असते. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांच्या सहमतीने मंचर शहरातील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात मास्क वापरण्याविषयी व परिसर स्वच्छ ठेवण्याविषयी जनजागृतीचे काम आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे,  असे आव्हान ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे यांनी केले आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com