महत्वाची बातमी : पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोना किती पसरला आहे, वाचा सविस्तर

coro-j.jpg
coro-j.jpg

पुणे : कोरोनाचे जिल्ह्यातील संकट गडद होत असल्याने आता अधिक खबरदारीची गरज निर्माण झाली आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ जिल्ह्यातला आकडाही वाढू लागल्याने सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. एकीकडे लॉकडाऊनचा कालावधी वाढलेला असला तरी आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी व्यापार व उद्योग चक्राला गती देण्याचे तर दुसरीकडे कोरोनाची साखळी तोडण्याचेही आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. 

बारामती शहर व तालुक्यात आजवर दहा कोरोनाबाधित रुग्ण सापडले. या पैकी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर उर्वरित आठ रुग्ण बरे झाले आहेत. बारामती शहरात 14 एप्रिल रोजी शेवटचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर आज महिना उलटून गेल्यानंतर बारामतीत कोरोनाबाधित एकही रुग्ण सापडलेला नसल्याने बारामतीतील कोरोनाची साखळी तोडण्यात आता यश आले आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

मावळ तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळून आले असून, त्यातील एका रुग्णाचा दुसरा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरित मावळ तालुक्यात अद्याप रूग्ण आढळले नाहीत. दौंड तालुक्यात  32 कोरोना रूग्ण सापडले होते, त्यापैकी 9 जण बरे झाले आहेत. राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ) 8 पोलिस आणि दहिटणे (ता. दौंड) येथील ज्येष्ठ नागरिक बरे झाले आहेत. गट क्रमांक सातचे 19 पोलिस, रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) 3 पोलिस आणि एक वयस्कर दूध विक्रेते असे एकूण 23 रूग्ण आहेत. मुंबईतून बंदोबस्त करून परतलेले एसआरपीएफ गट क्रमांक पाच व सात आणि आयआरबीच्या पोलिसांना खबरदारीचा उपाय म्हणून दौंड तालुक्यातील विविध विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

भोर तालुक्यात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले होते, यामध्ये दोन पुरुष एक महिला व एका मुलीचा समावेश आहे. भोर शहराजवळील नेरे येथील दोन आणि पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर येथीन दोन असे चार रुग्ण आढळले होते. कोरोनाबाधीत चारही रुग्ण उपचारानंतर पुन्हा घरी आले आहेत. सध्या भोर तालुका करोनामु्क्त झाला आहे. 
वेल्ह्यात आतापर्यत 23 जणांना कोरोनाची लागण झाली असून नऊ जणांनी कोरोनावर मात केली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. 

उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पुर्व हवेलीमध्ये नऊ कोरोना बाधीत रुग्न आढळून आले आहेत. नऊपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सातपैकी सहा जनांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. शिरुर तालुक्यात आत्तापर्यंत दहा कोरोना बाधित रुग्ण सापडले असून, दोघांचा  मृत्यू झाला आहे.  तीन जणांनी कोरोनावर मात केली असून, सातपैकी पाच जणांची प्रकृती स्थिर आहे. 

इंदापूर तालुक्यात आतापर्यत फक्त तीन कोरोना रुग्ण आढळले होते. पैकी भिगवण परिसरातील जेष्ठ महिला रुग्णाचा पुण्यात औषधोपचार सुरू असताना मृत्यू झाला. तसेच 16 मे रोजी दोन रुग्ण कोरोना बाधित असल्याचे चाचणीवरून स्पष्ट झाले आहे. तालुक्यात आतापर्यंत 40 परदेशी नागरिक आले होते, पैकी 30 नागरिकांच्या घश्याच्या स्त्रावाची तपासणी करण्यात आली, मात्र ते सर्व कोरोना निगेटिव्ह होते.

जुन्नर तालुक्यात आज रविवार अखेर गेल्या दोन महिन्यात कोरोना बाधित एक रुग्ण आढळून आला असून, तो उपचारानंतर पूर्णपणे बरा झाला आहे. आज अखेर तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com