पुण्यात विकेंड लॉकडाऊन; जाणून घ्या कोठे काय परिस्थिती?

weekend lockdown
weekend lockdown

पुणे - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. पुण्यात शुक्रवारी सायंकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत वीकेंड लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनला नागरिकांसह व्यापारी व दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. यामुळे पुणे शहरातील अनेक महत्वाच्या मार्गावर शुकशुकाट दिसला. रस्त्यावर पोलिस थांबले असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. यात काही कारण नसताना फिरत असल्याचं आढळल्यास कारवाई देखील केली जातेय. खाजगी वाहनांनाही रस्त्यावर येण्यास बंदी असल्याने आज पेट्रोल पंपावर शुकशुकाट दिसून आला. एक ते दोन वाहने पंपावर दिसत होती. 

शनिवारी व रविवारी दोन दिवस विकेंड लॉकडाऊन आहे. शनिवारी अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, दवाखाने सुरू होते तर दुध डेअरीची दुकाने सकाळी सहा ते आकरा वाजेपर्यंत सुरू होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलीस प्रशासनाकडून विकेंड लॉकडाऊन कडक करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.०९ ) संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते  सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत रिक्षा, बस, टॅक्सी, खाजगी वाहने व सार्वजनिक वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या काळात ॲम्बुलन्स शिवाय एकही वाहन रस्त्यावर येणार नाही. याची पोलिस यंत्रणा काळजी घेणार आहे. 

वाघोलीत सर्व दुकाने बंद
वाघोली व परिसरात मेडिकल वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. लोणीकंद पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर म्हणाले, कोरोनाची साखळी तुटावी यासाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. नागरिकांनी खूपच गरज असेल तरच बाहेर पडावे. घराबाहेर पडताना कामाबाबतची आवश्यक ती कागदपत्रे बरोबर ठेवावी.अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. सर्वांनी साथ दिली तरच ही साखळी तुटेल. पोलीस प्रशासनही स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांना साथ द्यावी.

आंबेगव परिसरात सकारात्मक प्रतिसाद
पुणे महानगरपालिकेने घालून दिलेल्या निर्बंधानुसार दत्तनगर आंबेगाव परिसरात विकेंड लॉकडाउनला परिसरातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.

भारती विद्यापीठ परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीतील कात्रज डेअरी चौक, कात्रज मुख्य चौक आणि दत्तनगर चौक या तीन महत्वाच्या ठिकाणी पोलीस नाकाबंदी करून तपासणी सुरु आहे. परिसरातील नागरिकही विनाकारण घरा बाहेर पडत नाहीत. 

बाणेर बालेवाडीत चांगला प्रतिसाद
बाणेर बालेवाडी येथे लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मनपाकडून  बाणेर बालेवाडी येथे काही भागात रस्त्याकडेला खुली व्यायाम शाळा उपकरणे बसवली आहेत. तिथे रोजच गर्दी असते. मात्र आजच्या लॉकडाऊनमुळे कोणीच इथे फिरकले नाही. 

नगर रस्त्यावर तुरळक वाहने
शिरूर तालुक्यात पुणे- नगर रस्त्यावर शनिवारी शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनमुळे वाहतूक करणारी वाहने तुरळक दिसून आली. रांजणगाव गणपती, कोंढापुरी, कासारी फाटा, चोवीसवा मैल, तळेगाव ढमढेरे या पुणे- नगर रस्त्यावरील मुख्य गावात लॉकडाऊनमुळे शुकशुकाट दिसत होता. 
 

रामटेकडीतील औद्योगिक वसाहतीत लॉकडाऊन, कोरोनाचा विसर

रामटेकडीमध्ये विकेंड लॉकडाऊनला नागरिकां कडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. रामटेकडी औद्योगिक वसाहत मध्ये परीक्षा केंद्र आहे. या परिक्षाकेंद्रावर शेकडो विद्यार्थी आज परीक्षा देण्यासाठी आले आहेत. परीक्षा केंद्र चालकाने मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडविल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. शिवाय परीक्षा केंद्रावर बाहेर पालकांसहित प्रचंड गर्दी झालेली आहे.याच औद्योगिक वसाहत मध्ये छोटे छोटे हॉटेल देखील चालू आहेत. 


सिंहगड रस्त्यावर कडकडीत वीकेंड: वडगाव-धायरीतील नागरिकांचा प्रतिसाद 
सिंहगड रोड परिसरात मेडिकल आणि दूध विक्री वगळता सर्व दुकाने शनिवारी बंद होती. शिवाय परिसरातील नागरिकांनी घरातच थांबण्यास प्राधान्य दिले. तर, कामासाठी जे नागरिक घराबाहेर पडत होते, तेदेखील मास्क-सॅनिटायझर वापरताना दिसून आले. सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन हद्दीतील सिंहगड रस्त्यावर वडगाव उड्डाणपुलाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नवले पूल, उंबऱ्या गणपती मुख्य चौक या महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. 

औंध परिसरात लॉकडाऊनला प्रतिसाद.
विकेंड लॉकडाऊनला औंधमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. आज  औंध, बोपोडी, औंध रस्ता, सकाळ नगर, पंचवटी, पाषाण, सुतारवाडी परीसरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. उपनगरामधील या भागातील अत्यावश्‍यक सेवा वगळून संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. सकाळी थोड्या प्रमाणात तुरळक गर्दी दिसून आली परंतु दुपारनंतर औंधमध्ये शुकशुकाट  जाणवत होता.

सहकारनगरमध्ये वीकेंड लॉकडाउनला प्रतिसाद
सातारा रस्ता, स्वारगेट, महर्षीनगर, सहकारनगर, पद्मावती,अरण्येश्रर, संतनगर, तावरे कॉलनी, चव्हाणनगर, धनकवडी इ. परिसरात नागरिकांनी विकेंड लॉकडाउनला सकारात्मक प्रतिसाद दिला. रिसरातील अत्यावश्यक सेवेतील आस्थापने वगळता सर्व दुकाने बंद होती. सातारा रस्त्यावर नागरिक कामानिमित्त बाहेर पडत होते तर सहकारनगर मधील अंतर्गत रस्त्यावर शुकशुकाट होता. पोलिसांनी मात्र चौका चौकात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 


मुंढवा केशवनगर भागात वीकेंड लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद

मुंढवा केशवनगर भागातील सर्वत्र दुकानदारांनी स्वतः दुकाने बंद ठेवली होती. मेडिकल तसेच दुध विक्रीची दुकाने वगळता सर्वत्र शुकशुकाट होता. कोरोना उद्रेकामुळे नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केलेले दिसून आले. मुंढवा केशवनगर भागात पोलिसांचा बंदोबस्त जोरदार दिसून आला. जागोजागी चौकात पोलिस असल्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणा ऱ्यांची संख्या नगण्यच होती. मास्क लावतच काही जण बाहेर कामानिमित्त आलेले आढळून आले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com