Breaking : 'कोविशिल्ड'च्या भारतातील चाचण्या थांबणार; सिरम इन्स्टिट्यूटचा मोठा निर्णय

Corona_Covishield
Corona_Covishield

पुणे : ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या 'कोविशिल्ड' या कोरोनावरील लसीच्या भारतात चालू असलेल्या अंतिम टप्प्यातील मानवी चाचण्याही थांबविण्यात येणार आहेत. जागतिक स्तरावरील स्थगित झालेल्या चाचण्या आणि औषध नियंत्रकांच्या निर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

ऍस्ट्राझेनेका आणि सिरम इन्स्टिट्यूट उत्पादन करणार असलेल्या या लशीच्या अंतिम टप्प्यातील मानवी चाचण्या जगभरात चालू आहे. इंग्लंडमधील स्वयंसेवकावर विपरीत परिणाम जाणवू लागल्याने तेथील चाचण्या स्थगित करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्येही चाचण्यांना स्थगिती दिली असल्याचे 'नेचर'ने म्हटले आहे. भारतातील चाचण्यांसंदर्भात औषध नियंत्रकांनी (डीसीजेआय) सिरमकडे विचारणा केली असता त्यांनी पुढील मानवी चाचण्या घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. 

अग्रेसर 'कोविशिल्ड' : 
- ऑक्‍सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली ही लस जगात सर्वात अग्रेसर लस आहे. जगभरात ऍस्ट्राझेनेका कंपनीच्या माध्यमातून मानवी चाचण्या घेण्यात येत आहे. 
- देशातील मानवी चाचण्या सहउत्पादक कंपनी असलेली सिरम इन्स्टिट्यूट घेत आहे. दुसऱ्या टप्प्यात पुण्यासह देशभरातील 100 स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात आली आहे. हा दुसरा टप्पा सुरक्षितपणे पार पडला आहे. आता अंतिम टप्प्यातील चाचण्यांची प्रतीक्षा होती. 

चाचण्या का थांबल्या? 
- इंग्लंडमधील लस टोचलेल्या स्वयंसेवकांमध्ये विपरीत परिणाम दिसले. 
- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे तेथील औषध नियंत्रकांवर दबाव असण्याची शक्‍यता आहे. पर्यायाने चाचण्यांच्या दर्जाकडे दुर्लक्ष केल्याची शक्‍यता 'नेचर'या विज्ञान नियतकालिकात व्यक्त करण्यात आली आहे. 
- सामान्यतः मानवी चाचणीदरम्यान असे प्रकार पहायला मिळत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

आता पुढे काय? 
- एका तटस्थ समितीकडून ऍस्ट्राझेनेकाकडील वैद्यकीय माहितीची तपासणी करण्यात येईल. 
- विपरीत परिणाम जाणवलेल्या स्वयंसेवकाची योग्य तपासणी करण्यात येईल. 
- लस टोचलेल्या स्वयंसेवकांना इतर आजार झाला का? त्याचे परिणाम काय होणार हे तपासण्यात येईल. 
- संपूर्ण अहवाल आल्यानंतर पुढील चाचण्यांचा निर्णय घेण्यात येईल.

जागतिक स्तरावरील परिस्थितीचा आम्ही आढावा घेत आहे. ऍस्ट्राझेनेका चाचण्या पुन्हा सुरू करेपर्यंत भारतातील चाचण्या स्थगित करण्यात येत आहे. डीसीजेआयच्या सूचनांनुसार आम्ही पुढील कार्यवाही करू. 
- सिरम इन्स्टिट्यूट, पुणे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com