ऐक्याचे प्रतिक असलेल्या सुप्याच्या उरसाबाबत घेतलाय हा निर्णय  

जयराम सुपेकर
Thursday, 18 June 2020

सुप्याचा चार दिवसांचा उरूस राज्यात प्रसिद्ध आहे. या उरूसासाठी राज्याबाहेरूनही भाविक येतात. यंदा ८ ते ११ जुलै दरम्यान उरूस भरणार होता.

सुपे (पुणे) : हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या सुपे (ता.बारामती) येथील ख्वाजा शाहमन्सूर बाबांचा उरूस यंदा भरणार नसल्याचा निर्णय दर्गा समिती व ग्रामस्थांनी घेतला. कोरोना विषाणू बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेतल्याची माहिती दर्गा समितीच्यावतीने देण्यात आली.

- लॅक्टिक अॅसिडसाठी लागणाऱ्या किण्वाची पुण्यात होणार निर्मिती; 'प्राज'चा अमेरिकन कंपनीशी करार!

सुप्याचा चार दिवसांचा उरूस राज्यात प्रसिद्ध आहे. या उरूसासाठी राज्याबाहेरूनही भाविक येतात. यंदा ८ ते ११ जुलै दरम्यान उरूस भरणार होता. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पत्राद्वारे कळवले होते. त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना सुचना केल्या. त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी कोविड-१९ महासाथीमुळे यंदा ऊरूस भरवता येणार नसल्याचे कळवले. या पत्राचा संदर्भ घेऊन दर्गा समिती व ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत उरूस न भरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दर्गा समितीचे मुख्य विश्वस्त युनूस कोतवाल यांनी दिली.

- आधीच कडकी त्यात इंधन दरवाढीने भरतीय धडकी; सलग बाराव्या दिवशी इंधन दरवाढ

दर्ग्याच्या आवारात गुरूवारी झालेल्या बैठकीप्रसंगी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे, जिल्हा परिषदेचे सदस्य भरत खैरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, माजी सभापती शौकत कोतवाल, सरपंच स्वाती हिरवे, उपसरपंच ज्योती जाधव, दर्गा समितीचे युनूस कोतवाल, समीर डफेदार, अमीनुद्दीन मुजावर, कामगार तलाठी दीपक साठे, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर आदींसह आजी-माजी पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.

- काय सांगता! आता मोबाईलवरही करता येणार भाडेकरार

कोविड-१९ महामारीची साथ असताना पावसाळी हंगाम सुरू झाल्याने अन्य साथरोगांना आमंत्रण नको. सुपे व परिसरातील लगतची गावे अद्याप कोरोनामुक्त आहेत. खबरदारी म्हणून यंदाच्या उरूसात सरकारी नियम पाळून मोजक्या प्रमुख व मानकऱ्यांच्या उपस्थितीत फक्त धार्मिक कार्यक्रम होतील. भाविकांना यंदा बाबांच्या समाधीचे समक्ष दर्शन होणार नसल्याने भाविकांनी नाराज होऊ नये. फेसबुक लाईव्हसारख्या माध्यमातून धार्मिक विधीची माहिती भाविकांना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यंदा उरूस भरणार नसल्याने भाविकांनी सुप्याला येऊ नये, असे आवाहन दर्गा समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The decision not to celebrate Urus at Supe this year