esakal | कालवा समितीची बैठक डिसेंबरमध्ये; रब्बीच्या आवर्तनाचा निर्णय लांबणीवर
sakal

बोलून बातमी शोधा

Canal

सध्या खडकवासला प्रकल्पात 28.36 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी दोन टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन धरल्यास सुमारे 26 टीएमसीपेक्षा अधिक पाणी सिंचन आणि बिगर सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे.

कालवा समितीची बैठक डिसेंबरमध्ये; रब्बीच्या आवर्तनाचा निर्णय लांबणीवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : यंदा जिल्ह्यात झालेला चांगला पाऊस आणि निवडणुकीची आचारसंहिता यामुळे कालवा समितीची बैठक लांबणीवर पडली आहे. ही बैठक येत्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍यता असून, या बैठकीनंतरच खडकवासला प्रकल्पातून रब्बी आणि उन्हाळी पिकांच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. 

KBC मध्ये सुप्रिया सुळेंवर विचारला प्रश्न; लक्ष्मीने जिंकले साडेबारा लाख रुपये​

कालवा समितीची बैठक दरवर्षी साधारण ऑक्‍टोबर महिन्यात होते. परंतु या वर्षी तुलनेत चांगला पाऊस झाला. ऑक्‍टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहितेनंतर कालवा समितीची बैठक होईल, अशी शक्‍यता जलसंपदा विभागाकडून व्यक्‍त करण्यात आली. 
खडकवासला प्रकल्पांतर्गत वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या चार धरणांचा समावेश होतो. या प्रकल्पावर जिल्ह्यातील हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती या चार तालुक्‍यांमधील एकूण 62 हजार 146 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येते. तसेच, पुणे महापालिका, दौंड आणि इंदापूर नगरपालिकेसह औद्योगिक वापरासाठी पाणी दिले जाते. 

महिनाभरानंतरही गौतम पाषाणकरांचा ठावठिकाणा नाही; राजकीय व्यक्तीचं नाव गुलदस्त्यात​

सध्या खडकवासला प्रकल्पात 28.36 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी दोन टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन धरल्यास सुमारे 26 टीएमसीपेक्षा अधिक पाणी सिंचन आणि बिगर सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. त्यातून पुणे महापालिकेसह, दौंड, इंदापूर नगरपालिका, कुरकुंभ एमआयडीसी, जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना, सणसर कट आणि कालव्यातून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. 

लग्न करताय का? मग ही बातमी नक्की वाचाच!​

रब्बीसाठी 50 दिवसांचे आवर्तन 
रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी नवीन मुठा उजव्या कालव्यातून प्रत्येकी साधारण 50 दिवसांचे आवर्तन सोडले जाते. रब्बी पिकांसाठी ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आणि डिसेंबर महिन्यात अशी एकूण दोन आवर्तने दिली जातात. रब्बी पिकांचे क्षेत्र सुमारे 23 हजार हेक्‍टर असून, उन्हाळी पिकांचे क्षेत्र साडेनऊ हजार हेक्‍टर इतके आहे. खडकवासला प्रकल्पातून कालव्याद्वारे प्रत्येक आवर्तनात सुमारे चार टीएमसी पाणी सिंचनासाठी सोडण्यात येते. 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) : 
टेमघर - 3.49 
वरसगाव - 12.82 
पानशेत - 10.65 
खडकवासला - 1.40 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)