पुणे : संक्रांतीच्या खरेदीसाठी गजबजली बाजारपेठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makar Sankranti
पुणे : संक्रांतीच्या खरेदीसाठी गजबजली बाजारपेठ

पुणे : संक्रांतीच्या खरेदीसाठी गजबजली बाजारपेठ

पुणे : मकर संक्रांतीनिमित्त (Makar Sankranti)वैविध्यपूर्ण हलव्याचे दागिने, वाण देण्यासाठी लागणारे सुगडे, गाजर, बोरे, लहान मुलांसाठी काळे कपडे (Black dress)आणि जोडीला तिळगूळाच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी गुरवारी बाजारपेठ गजबजली होती. संक्रांतीच्या सणाच्या पूर्वसंध्येला मंडई, तुळशीबाग परिसरात या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. यंदा सणावरच कोरोनाची ‘संक्रांत’ असली, तरी देखील नियम पाळत पण उत्साहाने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल होता.

हेही वाचा: भारत-पाकिस्तान फाळणीत झाली ताटातूट, तब्बल 74 वर्षांनंतर भेट!

मकर संक्रातीचा सणाला स्त्रिया एकमेकांना धान्याचे वाण देतात. यात हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, गाजर, मटारच्या शेंगा आदी गोष्टी सुगड्यात भरून दिल्या जातात. त्यामुळे बाजारात अनेक ठिकाणी हे वाण एकत्रित विक्रीसाठी उपलब्ध होते. ४० ते ५० रुपये किंमतीत हे वाण उपलब्ध होते. तर सुगडे ४० ते ५० रुपये किमतीला ५ नग, याप्रमाणे मिळत होते. या वाणासह देण्यासाठी हळदी-कुंकवाच्या कुयऱ्याही २० ते ३० रुपये नगाप्रमाणे उपलब्ध होत्या. याशिवाय वाणासह भेटवस्तू म्हणून देण्यासाठी रंगीबेरंगी पर्सेस, हातरुमाल, शोभेच्या वस्तू आदींच्या खरेदीलाही काही स्त्रियांनी पसंती दिली. संक्रांतीच्या सणाला काळ्या कपड्यांचे विशेष महत्त्व असते. विशेषतः लहान मुलांना या सणानिमित्त काळे कपडे भेट देऊन त्यांचे बोरन्हाण केले जाते. त्यासाठी काळ्या रंगांचे परकर पोलके आणि कुर्तेही बाजारात उपलब्ध होते. बोरन्हाणासाठी लागणाऱ्या बोरे, चुरमुरे, उसाचे तुकडे तसेच गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट यांचीही खरेदी केली जात होती. तर संक्रांतीला विशेष महत्त्व असणाऱ्या तिळगुळाच्या वड्या व लाडूंनाही मागणी होती.

हेही वाचा: PM मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु; ठाकरेंऐवजी टोपेंची हजेरी

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत माल अधिक असून भावही कमी झाल्याचे निरीक्षण विकी डिंबर या विक्रेत्यांनी नोंदवले. ‘‘गेल्या वर्षी मालच कमी आला होता. त्यामुळे जवळपास दीडपट-दुप्पट भावाने वस्तूंची विक्री होत होती. परंतु, यंदा मुबलक माल उपलब्ध आहे. परिणामी सर्वच वस्तू वाजवी दरात उपलब्ध आहे. ग्राहकांमध्ये कोरोनाची धास्ती असली, तरी सण साजरा करण्याचा उत्साह देखील आहे. त्यामुळे विक्रेतेही कोरोनासंबंधीची खबरदारी घेऊन व्यवहार करत आहेत’’, असे डिंबर यांनी सांगितले.(Pune News)

हेही वाचा: आरटीई प्रवेशासाठी निवासी पुरावा म्हणून 'गॅसबुक' रद्द

हलव्याच्या दागिन्यांची रेलचेल

संक्रांतीच्या सणाला नवविवाहित वधूचे आणि लहान मुलांचे हलव्याच्या दागिन्यांनी कौतुक करण्याचीही प्रथा आहे. त्यामुळे लहान मुले व स्त्रिया, अशा दोहोंसाठीच्या हलव्याच्या दागिन्यांचे सेट विक्रिसाठी उपलब्ध होते. लहान मुलांच्या दागिन्यांमध्ये गळ्यातले हार, लहानसा मुकूट, कानातले यांचा सेट उपलब्ध आहे. ८० ते १०० रुपये किमतीत हा सेट मिळतो आहे. तर स्त्रियांसाठी मंगळसूत्र, कानातले, गळ्यातील हार, अंगठी, बाजूबंद, ठुशी, बांगड्या, कंबरपट्टा यांचा समावेश असलेले सेट मिळत आहेत. हे सेट ३०० ते ३५० रुपये किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top