राहणीमानात ‘अव्वल’; सुविधांत मात्र उणेच!

पुण्यातील वाहतूक कोंडी अशा पद्धतीने नित्याचीच झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)
पुण्यातील वाहतूक कोंडी अशा पद्धतीने नित्याचीच झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)

देशात वास्तव्यास सुलभ असणाऱ्या शहरांच्या यादीत पुण्याने देशात दुसरा क्रमांक पटकाविला. प्रत्येकाला आनंद वाटावा अशीच ही बातमी; पण दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षभरात पुण्यासारख्या या उत्तम शहरात केवळ कोरोनाने तब्बल ४,८८१ जणांचा बळी घेतला. त्यामुळे एका बाजूला आपण सुंदर शहरात राहतो याचा अभिमान बाळगायचा, की येथील कुचकामी आरोग्य व्यवस्था, वाहतूक यंत्रणा याबद्दल सतत काळजी वाहायची, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित झाला असेल यात शंका नाही. 

अवघ्या देशभरातील लोक  पुण्याला पहिली पसंती देतात. पुण्यात राहायला त्यांना जाम आवडते. याची कारणेही सर्वश्रुत आहेत. येथील आल्हाददायक हवामान, मुबलक पाणीपुरवठा, निर्भय वातावरण, उत्तमोत्तम शिक्षणसंस्था, रोजगाराच्या संधी, सांस्कृतिक घडामोडींची रेलचेल आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा अशा साऱ्या बाबींमुळे पुणे लोकांना भावते. ज्यांना तरुणपणी किंवा नोकरीनिमित्त पुण्यात राहण्याची संधी मिळत नाही ते लोक सेवानिवृत्तीनंतर का होईना पुण्यात स्थायिक होण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे म्हटले तर यात काही बातमी नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने त्यांच्या काही विशिष्ट निकषांवर राहण्यास उत्तम शहरांची यादी बनविली. त्यात दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांत बंगळूरने पहिला, तर पुण्याने दुसरा क्रमांक पटकाविला. मंत्रालयाच्या निकषांत राहणीमानाच्या दर्जाला सर्वाधिक म्हणजे ३५ टक्के वेटेज आहे. त्याचप्रमाणे विकासकामे, शाश्वतता, आरोग्य व्यवस्था, वाहतूक, गृहनिर्माण, घनकचरा व्यवस्थापन अशा काही पूरक बाबींचा समावेश होता. या साऱ्या निकषांत पुण्याने बाजी मारली हे उत्तमच आहे; पण सध्या येथे राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याची कितपत नवलाई असेल याबाबत शंकाच आहे. त्यामुळे या यशाने हुरळून जाण्याची त्याचप्रमाणे आत्मसंतुष्ट होण्याची गरज नाही.

कारण रोजच्या जगण्यात पुणेकरांना जी यातायात करावी लागते, त्याचा विचार करता आपल्याला आणखी बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. सध्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा जरी विचार केला, तरी गेल्या वर्षभरात कोरोनाने सर्वाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे. राज्यभरात क्षेत्रफळाने सर्वांत मोठे शहर बनलेल्या या पुण्यात महापालिकेकडे लक्षावधी नागरिकांसाठी अवघे सात डॉक्टर उपलब्ध आहेत. कारण गेली अनेक वर्षे आरोग्य व्यवस्थेली पदे रिक्तच आहेत. मेडिकल टुरिझमसाठी नावारूपाला आलेल्या पुण्याची आरोग्य व्यवस्था किती तकलादू आहे याची जाणीव गेल्या वर्षभरात सर्वसामान्य नागरिकांना पदोपदी आली असेल. दवाखाने आहेत तर बेड नाहीत, औषधे नाहीत, डॉक्टर नाहीत, रुग्णवाहिका- ऑक्सिजन सुविधा नाही. या साऱ्या बाबींमुळेच शहरात कोरोना रुग्णांची संख्या अतोनात वाढली आणि त्यांच्यावर उपचार करता करता प्रशासनाची दमछाक झाली. यातून मग असंख्य प्रश्नांची मालिकाच निर्माण झाली. हे प्रश्न सोडवायचे, तर त्यावर दीर्घकालीन धोरण आखण्याची व त्याची तितक्याच कठोऱपणे अंमलबाजावणी करण्याची गरज आहे. दहा वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूच्या साथीतून ज्या समस्या पुढे आल्या होत्या, आज दहा वर्षांनी कोरोनाच्या साथीतही त्या तशाच कायम राहिल्या असतील तर शहराचे कारभारी व प्रशासन कशाप्रकारे नियोजन करतात हे लक्षात येते.

शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीतही असेच काहीसे आहे. पन्नास लाख लोकसंख्येच्या या शहरात तब्बल तीस लाख दुचाकी, तर दहा लाख चारचाकी वाहने आहेत. यातील निम्मी वाहने जरी रोज रस्त्यावर आली, तर वाहतुकीचा बोजवारा उडणार हे सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नाही. त्यामुळे घरातून बाहेर पडले, की दिवसभरात एकदा तरी प्रत्येकाला वाहतूक कोंडीचा सामना करावाच लागतो. हे सारे घडते ते अपुऱ्या व अयोग्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे. इतकी प्रचंड खासगी वाहने असूनही रोज किमान सात लाख प्रवासी महापालिकेच्या बसमधून प्रवास करतात. मात्र, त्यांच्यासाठी पुरेशा बसेसही नाहीत. पुणे- पिंपरीसाठी किमान तीन हजार बसेस रोज रस्त्यावर असल्या पाहिजेत. मात्र, सध्या ही संख्या अवघी पंधराशेच्या आसपासच आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही अजून हे मूलभूत प्रश्न जर तसेच राहत असतील, तर त्याला काहीच अर्थ नाही. याचबरोबर कचरा व्यवस्थापन, अनियमित पाणीपुरवठा, अस्वच्छता असे असंख्य प्रश्न पुणेकरांना रोजच्या जगण्यात भेडसावतात. ही यादी म्हटले तर फार मोठी आहे.

इतक्या साऱ्या समस्यांना रोज भिडण्याची वेळ येत असतानाही सर्वसामान्य नागरिक शहरांत वास्तव्य करण्यासाठी आसुसलेले असतात. कारण त्यांना स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची प्रगती करायची असते. आज कष्ट उपसले, तर उद्याचा दिवस चांगला जाईल या आशेने ते अविरत कष्ट उपसत असतात. अशा वेळी त्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांना योग्य त्या मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन व राजकीय पक्षांच्या कारभाऱ्यांनी प्रामाणिकपणे सामूहिक इच्छाशक्ती दाखविली तरच खऱ्या अर्थाने हे शहर वास्तव्यास सर्वोत्तम बनेल यात शंका नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com