मराठ्यांचे शौर्य जगाला दाखवायचे होते; गोवारीकरांनी सांगितल्या 'पानीपत'च्या आठवणी!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

पानीपत या चित्रपटाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाल्याचा आनंद आहे. मुळात हा चित्रपट व्यवसाय म्हणून नव्हे, तर 'पॅशन' म्हणून केला.

पुणे : ''पानीपत चित्रपटाद्वारे पराभवातही शुरवीरता काय असते, हे पडद्यावर दाखवायचे ठरविले होते. पानीपतच्या रणसंग्रामामधील मराठ्यांचे शौर्य आणि अशी लढाई कधीही झालेली नाही, हे जगाला दाखविण्याची गरज होती. म्हणून हा चित्रपट केला,'' असे मत चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी रविवारी (ता.12) व्यक्त केले. दरम्यान, 'पानीपत' चित्रपट आता चीनमध्येही प्रदर्शित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पानीपत रणसंग्रामाला 260 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हिंदवी स्वराज्य महासंघातर्फे पानीपत संग्रामातील योद्धा मराठी वीरांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याअंतर्गत 'पानीपत' चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची दिग्दर्शक योगेश्‍वर गंधे यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी चित्रपट निर्माते रोहित शेलटकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात कर्तारजी लालवानी व पानीपत चित्रपटाचे निर्माते डॉ. रोहीत शेलटकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पेशवे, मस्तानी व सरदार घराण्यांचे वशंज उपस्थित होते. 

- तान्हाजीपेक्षा 'या' चित्रपटाने केली पहिल्या दिवशी तिप्पट कमाई

गोवारीकर म्हणाले, ''पानीपत हा काहीसा चेष्टेचा विषय बनला होता. मात्र मराठ्यांचे पानीपतमधील शौर्य व अशी लढाई कधीही झालेली नव्हती, हेही जगाला दाखविण्याची गरज होती. पानीपत वाचल्यानंतर 15 तासांचा चित्रपट बनवावा लागेल, असे वाटत होते. म्हणूनच पराभवातही शुरवीरता काय असते हे पडद्यावर दाखविण्याचे ठरविले. चित्रपटामध्ये पराभवाचा इतिहास असला तरीही चित्रपट बनविण्याचा निश्‍चय केला होता. या चित्रपटासाठी पांडुरंग बलकवडे यांनी खुप मदत केली.'' 

- 'तानाजी'च्या टीमचे उदयनराजेंकडून कौतुक अन् व्यक्त केली 'ही' अपेक्षा

चित्रपटाला झालेल्या विरोधाबाबत गोवारीकर म्हणाले, ''उत्तरेत या चित्रपटाला विरोध झाल्याने तिथे चित्रपट प्रदर्शित करता आला नाही. त्यामुळे नुकसान झाले, मात्र महाराष्ट्रामध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. पानीपतचे चित्रीकरण करताना, संपादन करताना अनेकदा भावनिकही झालो.'' 

- मराठी अभिनेत्रीनं केली शिवसेना नेत्यांकडं माफीची मागणी; पाहा व्हिडिओ

डॉ. शेलटकर म्हणाले, ''पानीपत या चित्रपटाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाल्याचा आनंद आहे. मुळात हा चित्रपट व्यवसाय म्हणून नव्हे, तर 'पॅशन' म्हणून केला. पेशव्यांच्या वंशजांना हा चित्रपट आवडल्याचा आम्हाला आनंद झाला. मात्र आता हा चित्रपट चीनमध्येही प्रदर्शीत करणार आहोत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director Ashutosh Gowariker recounted the memories of the film Panipat in Pune