esakal | ‘प्लाझ्मा’साठी पाऊल पडते पुढे

बोलून बातमी शोधा

Plasma
‘प्लाझ्मा’साठी पाऊल पडते पुढे
sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे - शहरातील प्लाझ्माचा वाढता तुटवडा रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांच्याकडून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची माहिती शहरातील २१ रक्तपेढ्यांना द्यावी, असे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) दोन्ही महापालिकांना दिले आहेत.

शहरात प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागत आहे. हा तुटवडा कमी करण्यासाठी ‘एफडीए’ने दोन्ही महापालिकांनी त्यांच्याकडे नोंद असलेल्या आणि घरी सोडलेल्या रुग्णांची माहिती रक्त पेढ्यांना द्यावी, असे सांगितले आहे. त्यानुसार रक्तपेढ्या संबंधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांना प्लाझ्मा दानाबद्दल समजावून सांगतील, असे ‘एफडीए’चे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच कोरोना रुग्णांना घरी सोडताना त्यांना प्लाझ्मादानाचे महत्त्व समजावून सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांच्याकडील डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची माहिती रक्तपेढ्यांना दिली आहे. याबाबत पुणे महापालिकेत विचारणा केली असता, एफडीएकडून पत्र आले आहे. मात्र, त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्णय झाला नाही, असे सांगण्यात आले.

हेही वाचा: तरूणाचा अनोखा विक्रम; सोळा वेळेस रक्तदान आणि आता प्लाझ्मा दान

२० टक्केच मागणी पूर्ण

सध्या प्लाझ्माचा प्रचंड तुटवडा आहे. आमच्याकडे येणाऱ्या कॉलपैकी फक्त २० टक्के लोकांनाच आम्ही प्लाझ्मा देऊ शकतो. डोनर काही प्रमाणात पुढे येत आहेत, पण त्यांची संख्या अत्यल्प आहे. प्लाझ्मा मागण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांनाच अनेकदा डोनर शोधावा लागतो. प्लाझ्मा दानासाठी येणाऱ्या नागरिकांची अॅंटीबॉडीज आणि अन्य चाचण्या रक्त पेढ्यांतच केल्या जातात, अशी माहिती सह्याद्री रूग्णालय रक्त पेढीच्या प्रमुख डॉ. स्मिता जोशी यांनी सांगितले.

प्लाझ्मा थेरपी ठरते प्रभावी

कोरोना रुग्णांवर इंजेक्शनपेक्षा प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत असल्याचे दिसत असल्यामुळे प्लाझ्माची मागणी वाढली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त प्लाझ्मा दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून प्लाझ्मादान करण्याची मानसिकता समाजात रुजविण्याची गरज असल्याचे मत रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड यांनी व्यक्त केले.

यावर उपाय काय?

महापालिकेने रक्तपेढ्यांना बरे झालेल्या रुग्णांची माहिती तातडीने दिल्यास रक्तपेढ्या, स्वयंसेवी संस्था त्यांच्याशी संपर्क साधू शकतील. त्यातून प्लाझ्मादानासाठी गती येईल आणि गरजू रुग्णांना दिलासा मिळेल.

हेही वाचा: .. आणि ‘जोकर’च्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू

प्लाझ्मादान असे कराल? प्लाझ्मा म्हणजे काय?

उत्तर : प्लाझ्मा हा रक्तातील एक पिवळसर द्रव घटक असून, त्याचे रक्तातील प्रमाण सुमारे ५५ टक्के इतके असते. त्यात जीवनावश्यक घटकद्रव्ये, पेशी आणि विशेषतः प्रथिने असतात.

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

उत्तर : कोरोनातून संपूर्णतः बऱ्या झालेल्या व्यक्तीचा सुमारे २८ दिवसांनंतर प्लाझ्मा काढून तो कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या व्यक्तीला देण्याची प्रक्रिया म्हणजे प्लाझ्मा थेरपी होय.

प्लाझ्मादान कोण करू शकते?

उत्तर : ज्यांचे वय १८ ते ६० दरम्यान आहे, ज्यांचे वजन ५० किलोपेक्षा जास्त आहे, जी व्यक्ती कोरोना आजारातून पूर्ण बरी झालेली असून, डिस्चार्ज किंवा होम क्वारंटाईनच्या सुमारे २८ दिवसांनंतर प्लाझ्मादान करू शकतात. डोनरच्या ॲंटिबॉडीज आधी टेस्ट केल्या जातात. प्रमाण योग्य असल्यास प्लाझ्मा घेतला जातो.

एक रक्तदाता किती मिली प्लाझ्मा दान करू शकतो?

उत्तर : साधारणपणे ४०० मिली प्लाझ्मा दान करू शकतात.

एका गरजू व्यक्तीला किती मिली प्लाझ्मा देण्यात येतो?

उत्तर : एका रुग्णाला एकावेळी २०० मिली प्लाझ्मा देण्यात येऊ शकतो.

हेही वाचा: बारामतीत 20 तलवारी, एक गावठी कट्टा जप्त

प्लाझ्मा दान केल्यावर पुन्हा कधी प्लाझ्मा दान करू शकतो?

उत्तर : सुमारे ७ ते १५ दिवसांनंतर पुन्हा प्लाझ्मा दान करू शकता.

प्लाझ्मा दान केल्यामुळे दुष्परिणाम होतात का?

उत्तर : कोणतेही दुष्पपरिणाम होत नाहीत. रक्तदात्याने दान केलेला प्लाझ्मा शरीरात काही तासांत पुन्हा तयार होतो.

प्लाझ्मा दान करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?

उत्तर : योग्य पौष्टिक आहार, पुरेशी झोप, शक्यतो द्रव पदार्थांचे सेवन जास्त असावे. स्वतःला सध्या आणि तत्पूर्वी असलेल्या आजाराबद्दल आणि सध्या सुरू असलेल्या औषधांबद्दल डॉक्टरांना संपूर्ण माहिती द्यावी.

कोरोनातून बरी झालेली व्यक्ती किती दिवसांपर्यंत प्लाझ्मा दान करू शकते?

उत्तर : कोरोनातून संपूर्णतः बरी झालेली व्यक्ती सुमारे ३- ४ महिन्यांपर्यंत प्लाझ्मा दान करू शकते. (पहिले १४ दिवस आणि बरे झाल्यानंतरचे २८ दिवस सोडून नंतर)