esakal | बारामतीत 20 तलवारी व एक गावठी कट्टा जप्त

बोलून बातमी शोधा

crime
बारामतीत 20 तलवारी, एक गावठी कट्टा जप्त
sakal_logo
By
- मिलिंद संगई

बारामती : समाजविघातक प्रवृत्तींना विकण्यासाठी आणलेल्या तब्बल 20 तलवारी आणि एक गावठी कट्टा बारामती शहर पोलिसांनी आज जप्त केला. नितीन मल्हारी खोमणे (रा. पिंपळी, ता. बारामती) यास या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 20 पोलादी तलवारी व एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

बारामतीचे पोलिस निरिक्षक नामदेव शिदे यांनी या बाबत माहिती दिली. पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार शिवाजी निकम यांना गोपनीय बातमीदाराकडून पिंपळीतील नीरा डावा कालव्यानजिक एक जण तलवारी विक्रीसाठी आणणार असल्याची बातमी मिळाली होती. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या सूचनेनुसार नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक प्रकाश वाघमारे, शिवाजी निकम, अकबर शेख, तुषार चव्हाण, दशरथ इंगोले, अतुल जाधव होमगार्ड साळुंके यांच्या पथकाने सापळा लावला होता.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी तीन हजार २४८ रेमडेसिव्हीर; ऑक्सिजनच्याही मागणीत वाढ

नितीन खोमणे त्याच्या दुचाकीवरुन एक पोते घेऊन आल्यानंतर पोलिसांना पाहून पळू लागला मात्र पोलिसांनी त्याला पकडून पोते तपासले असता त्यात 20 तलवारी व एक गावठी कट्टा मिळाला. या तलवारी कोणाला विकण्यासाठी आणल्या होत्या, त्याचे कोणाशी या बाबत बोलणे झाले होते, या पूर्वीही त्याने अशीच हत्यारे विक्री केली आहेत का याचा सखोल तपास पोलिसांनी सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वीच बारामतीत पिस्तूल विकणारी टोळी पोलिसांनी पकडली होती, आज तलवारी विक्रीसाठी आणल्याचे पाहून पोलिसही चक्रावून गेले आहे. पंजाबमधील अमृतसरमधून या तलवारी खोमणे याने विक्रीसाठी आणल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

हेही वाचा: प्लाझ्मा तुटवडा रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांना एफडीएचे आदेश