राष्ट्रवादीच्या खासदारावर शिवसैनिकांकडून व्यंग्यचित्रांचे बाण

Kolhe_Adhalrao
Kolhe_Adhalrao

शिरूर (पुणे) : महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात एकत्र नांदत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शिरूर मतदारसंघात मात्र धुसफूस चालूच आहे. डॉ. अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव पाटील या आजी- माजी खासदारांच्या समर्थकांत ऐन कोरोनाकाळात "सोशल वॉर' सुरू झाले आहे. या आरोप- प्रत्यारोपांच्या चिखलफेकीने मतदारसंघ मात्र गढूळला आहे. 

शिरूर लोकसभेची निवडणूकच मुळात आरोप- प्रत्यारोप, जुगलबंदी, वैविध्यपूर्ण व्यंग्यचित्रे आणि खटकेबाज संवादांनी गाजली होती. "थापाड्या- सोंगाड्या' अशा शेलक्‍या विशेषणांनी प्रतिस्पर्ध्यांना नामोहरण करण्याचा त्यावेळी सुरू झालेला यज्ञ कट्टर शिवसैनिक आणि राष्ट्रवादीच्या दिलेर कार्यकर्त्यांनी अखंड पेटता ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागलेल्या शिवसेनेने खासदार डॉ. कोल्हे यांना "टार्गेट' करत बाणांचा मारा चालूच ठेवला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर घड्याळाचे सारेच काटे उलटे फिरल्याने आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीही काहीशा थंडावल्या होत्या. राज्याच्या सत्तेत एकत्र आल्याने परस्पर विरोधाची धारही काहीशी बोथट झाली होती. 

परंतु, वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अन्‌ शिवसैनिक पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. खासदार कोल्हे यांच्या अकार्यक्षमतेचा डंका पिटत शिवसेनेने त्यांच्याविषयी एक टीकात्मक व्यंग्यचित्र सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. या चित्रात, खासदार हे कोरोना काळातही मालिकांच्या चित्रीकरणातच गुंतले असून, त्यांनी मतदारसंघ वाऱ्यावर सोडला असल्याचा संदेश दिला आहे. 

सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झालेले हे चपखल कार्टून राष्ट्रवादीला चांगलेच झोंबले आहे. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी "जशास तसे' उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या चित्राला राष्ट्रवादीने जोरदार आक्षेप घेत, जे 15 वर्षात नाही झाले, ते 15 महिन्यात डॉ. कोल्हे यांनी करून दाखविले. मतदारसंघातील अनेक प्रश्‍नांची अभ्यासपूर्ण मांडणी संसदेत केल्यानेच त्यांना "संसदरत्न' पुरस्काराने सन्मानित केले गेले. परंतु, पराभवाने पछाडलेले लोक सातत्याने त्यांची बदनामी करीत आहेत. ही बदनामी यापुढे सहन केली जाणार नाही, जशास तसे उत्तर देऊ, अशा आशयाचे पोस्टर सोशल मिडीयावर झळकत आहेत. डॉ. कोल्हे यांचे कार्टून शिवसैनिकांच्या; तर "जशास तसे'च्या इशाऱ्याचे फलक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर झळकत आहेत. भविष्यात हा वाद वाढण्याची शक्‍यता आहे. 

लोकसभा निवडणुकीपासून एकमेकांना पाण्यात पाहणारे डॉ. अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव पाटील या आजी- माजी खासदारांत अभिनेत्री कंगणा राणावत प्रकरणावरून मात्र कमालीचे मतैक्‍य दिसून येत आहे. एकमेकांत आणि एकमेकांच्या कार्यकर्त्यांत कायमच खटके उडत असताना कंगणाला मात्र दोन्ही बाजूंनी फटके पडण्याची भाषा वापरली जात आहे. आक्षेपार्ह व्यंग्यचित्र शेअर करणाऱ्या नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांच्या टोकाच्या रोषाला सामोरे जावे लागले असल्याच्या पार्श्‍वभूमीवर, शिरूर मतदारसंघात रंगलेल्या व्यंगचित्र वादात कुणाचा डोळा सुजणार, याकडे मतदारसंघातील सामान्य मतदारांचे डोळे लागले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com