
सासवड : मद्यधुंद तरुणांची नाकाबंदीतील पोलिसांना धक्काबुक्की
सासवड (Pune): लाॅकडाऊन सुरु असताना वाहनात मद्यपान करुन मोकार हिंडणाऱया तरुणांनी सासवड (ता. पुरंदर) येथील पोलिस ठाण्याच्या पोलिस शिपाई व दोन गृह रक्षक जवानांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुरंदर तालुक्याच्या पश्चिमेकडील मरीआईचा घाट येथे काल दुपारी ही घटना घडली. रात्री उशिरा मद्यपी तरुणांच्या वैद्यकीय तपासणीनंतर कोविड 19 संसर्ग पसरविण्याबाबतसह सरकारी कामात अडथळा आणण्याचा गु्न्हा दाखल केला आहे.
याबाबत मरीआई घाटात काल (ता. 11) दुपारी चारच्या सुमारास नाकाबंदीवर असलेले सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई राजीव सापळे यांनी फिर्याद दिली. त्यांच्यासह दोन गृह रक्षक जवान कामठे व जगदाळे यांनाही या मद्यधुंद युवकांनी धक्काबुक्की करीत त्यांच्याशी हुज्जत घातल्याचा गुन्हा दाखल आहे. यातील संशयित आरोपी केदार शंकर लोहकुर (वय 26, रा. माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे), विराज रविंद्र डावखरे (वय 26, रा. आंबेगाव बुद्रुक, ता. हवेली), मयूर जगदीश पाटे (वय 27, रा. आंबेगाव), अतुल निलकंठ आहेर (वय 39, रा. सिंहगड रोड, पुणे) यांच्या विरुद्ध हा गुन्हा काल रात्री पावणेबारा वाजता दाखल झाला आहे. याबाबत सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी ही माहिती आज दिली.
हेही वाचा: कृषी पंपाच्या केबल चोरणाऱ्या टोळीला अटक; तीन वर्षांनी पोलिसांना यश
मरीआई घाटामार्गावर वरच्या टप्प्यात नाकाबंदीच्या बंदोबस्तात असताना सासवडकडून खेडशिवापूरकडे या तरुणांची गाडी (एमएच 12 एचव्ही 1366) जात होती. त्यांना लाॅकडाऊन व निर्बंध असताना फिरता कोठे म्हणून थांबविले, तेंव्हा गाडीत ते गोंधळ करीत होते. काहींच्या हातात प्लॅस्टीक ग्लासात दारु होती. बहुतेकजण दारुच्या नशेत होते. वास येत होता. त्यांना थांबविलेले आवडले नाही, त्यामुळे खाली उतरुन वाद घालू लागले. गाडीतील एकाने पोलीस शिपाई श्री. सापळे यांचा गळा पकडला. शिवाय ढकलत बाजूला नेले. बाकी तरुणांनी इतर जवानांना धक्काबुक्की करीत वाद घातला. त्याच वेळी डीवायएसपी धनंजय पाटील यांची गाडी तेथून चालली होती. त्यांच्या समवेतच्या पोलीस कर्माचाऱयांच्या मदतीने या मद्यपी तरुणांना बळेच सासवड पोलीस ठाण्यात आणून त्यांची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. मग त्या आधारे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांना ताब्यात घेतले व गाडीही जप्त केली आहे.
Web Title: Disputes Between Drunk Boys With Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..